Wed, Jul 24, 2019 05:51होमपेज › Kolhapur › नियोजित डिस्टिलरी प्रकल्पाकरिता  15 दिवसांत जनसुनावणी

नियोजित डिस्टिलरी प्रकल्पाकरिता  15 दिवसांत जनसुनावणी

Published On: Feb 13 2018 2:04AM | Last Updated: Feb 13 2018 12:20AMआजरा : प्रतिनिधी

सभासदांच्या विश्‍वासाला पात्र राहून आजरा साखर कारखान्याचा कारभार सुरु असून कारखान्याची आर्थिक स्थिती अतिशय उत्तम आहे. सुदैवाने साखरेचे दर वाढत असल्याने कारखान्यासमोर कोणतीही अडचण नाही. कारखान्याच्यावतीने उभारण्यात येणार्‍या डिस्टलरी प्रकल्पाचे सर्व्हेक्षण पुर्ण झाले असून येत्या 15 दिवसात त्याबाबत जनसुनावणी होईल असे कारखान्याचे अध्यक्ष अशोक चराटी यांनी सांगितले. कारखान्यातून उत्पादित झालेल्या 3 लाख 11 हजार 111 साखर पोत्यांच्या पूजनप्रसंगी ते बोलत होते. स्वागत कार्यकारी संचालक पी. एल. हरेर यांनी केले. कारखान्याचे अध्यक्ष अशोक चराटी, उपाध्यक्ष आनंदराव कुलकर्णी, संचालक दशरथ अमृते, मलिक बुरुड, जनार्दन टोपले, राजू सावंत, रमेश रेडेकर यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते पोती पूजन करण्यात आले.

यावेळी बोलताना चराटी म्हणाले जिल्हा बँकेचे अध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ यांनी डिस्टलरी प्रकल्पाकरिता आवश्यक तो बँकेमार्फत अर्थपुरवठा करणार असल्याचे सांगितले आहे. जनसुनावणीनंतर प्रत्यक्ष प्रकल्पउभारणीत कामकाजात सुरुवात होईल असेही स्पष्ट केले. यावेळी सचिव व्यंकटेश ज्योती, संभाजी सावंत यांच्यासह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. विरोधी दहा संचालकांनी मात्र या कार्यक्रमाकडे पाठ फिरवली. आभार संचालक दिगंबर देसाई यांनी मानले.