Fri, Jul 19, 2019 15:49होमपेज › Kolhapur › आजरा घनसाळच्या उत्पादनात दुप्पट वाढ; उत्पादक सुखावले

आजरा घनसाळच्या उत्पादनात दुप्पट वाढ; उत्पादक सुखावले

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

आजरा : ज्योतिप्रसाद सावंत 

आजरा तालुक्यात घनसाळ भाताच्या दृष्टीने यावर्षी समाधानकारक पाऊस झाला असून, पावसाने दिलेली साथ, तालुका कृषी विभाग, आजरा अ‍ॅग्रो प्रोड्युसर कंपनी व ‘आत्मा’च्या संयुक्त प्रयत्नांमुळे उत्पादनात तब्बल दुपटीने वाढ झाली असून, भौगोलिक उपदर्शक म्हणून मानांकन मिळाल्यानंतर उत्पादकाला यावर्षी घसघशीत उत्पन्न मिळणार असून, तालुक्यातील घनसाळच्या या सुगंधाने उत्पादक शेतकरी सुखावून गेला आहे. तब्बल 300 टन घनसाळ यावर्षी खवय्यांकरिता उपलब्ध होणार आहे. 

राज्य स्पर्धात्मक कृषी विकास प्रकल्प (एमएसीपी) कार्यक्रमांतर्गत यावर्षी हेतुपुरस्सर घनसाळ उत्पादन वाढीसाठी प्रयत्न केले गेले. गेली 10 वर्षे आजरा तालुका शेतकरी मंडळाच्या वतीने घनसाळ उत्पादन वाढीचा जागर सुरू आहे. दरम्यान, मध्यंतरीच्या कालावधीमध्ये आजरा घनसाळला जीआय मानांकन मिळाल्याने शेतकरीवर्गाने घनसाळ पीक घेण्यास प्राधान्य देण्यास सुरुवात केली; मात्र निसर्गाने दगा दिल्याने अपेक्षित उत्पन्न मिळू शकले नाही. त्यामुळे काही शेतकर्‍यांसमोर घनसाळचे पीक घ्यावयाचे की नाही, असा प्रश्‍नही निर्माण झाला होता. यावर्षी मात्र ज्या पद्धतीने उत्पादन वाढीसाठी आवश्यक आहे. त्याच पद्धतीने पाऊस झाल्याने संपूर्ण तालुकाभर घनसाळचा घमघमाट पसरला आहे. 

तालुक्यातील पेरणोली, पोळगाव, देवर्डे, दर्डेवाडी व मसोली या पाच गावांमधील 50 शेतकर्‍यांसाठी सेंद्रिय घनसाळचा पायलट प्रकल्प राबविण्यात आला. एमएसीपीच्या माध्यमातून सुरुवातीपासूनच योग्य पद्धतीने मार्गदर्शन होत गेल्याने उत्पादनात भरीव वाढ दिसत आहे.