Sun, Jul 21, 2019 16:14
    ब्रेकिंग    होमपेज › Kolhapur › इच्छुकांकडून आतापासूनच मोर्चेबांधणी सुरू

इच्छुकांकडून आतापासूनच मोर्चेबांधणी सुरू

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

आजरा : प्रतिनिधी 

आजरा ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीमध्ये रूपांतर झाल्यानंतर प्रथमच होणार्‍या नगरपंचायत निवडणुकीचे नगारे वाजू लागले असून, सध्या प्रशासक म्हणून असणार्‍या तहसीलदार श्रीमती अनिता देशमुख व कर्मचार्‍यांकडून एकीकडे प्रभागरचना व प्रभागवार आरक्षणाची जय्यत तयारी सुरू असतानाच दुसरीकडे इच्छुकांनीही मार्चपर्यंत नगरपंचायत निवडणूक होणारच, असे गृहीत धरून आतापासूनच जोरदार फिल्डिंग लावण्याचे काम सुरू केले आहे. राजकीय पक्षांनीही निवडणुकीची व्यूहरचना करण्यास सुरुवात केली आहे. 

नगरपंचायतीच्या प्रभागरचनेचा कच्चा आराखडा तयार करण्यात आला आहे. यामध्ये 17 प्रभाग निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनानुसार तयार करण्यात आले आहेत. ही प्रभागरचना जिल्हाधिकार्‍यांच्या अंतिम मंजुरीनंतर अंमलात आणली जाणार आहे. प्रभागरचना पार्श्‍वभूमीवर नगरपंचायतीच्या प्रमुख कर्मचार्‍यांच्या जिल्हाधिकारी कार्यालयाकडे वारंवार फेर्‍या होऊ लागल्या आहेत. बुधवारी दि. 29 रोजी प्रभागरचना, लोकसंख्या क्षेत्र, सीमांकन, नकाशा यासह जिल्हाधिकार्‍यांकडे मान्यतेसाठी सादर करण्यात आला असून, 2 डिसेंबरअखेर याला मान्यता दिली जाणार आहे. तर प्रभागनिहाय आरक्षण सोडत 8 डिसेंबर रोजी काढण्यात येणार आहे. 

प्रभागरचना व प्रभागनिहाय आरक्षण यावर अनेक इच्छुकांचे भवितव्य अवलंबून आहे. राजकीय पक्षांच्या द‍ृष्टीनेही नगरपंचायत निवडणूक ही महत्त्वाची ठरणार असल्याने नगरपंचायतीवर आपलेच वर्चस्व राहावे यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस व मित्रपक्ष प्रयत्नशील असतानाच भाजपच्या मदतीने ग्रामपंचायतीची नगरपंचायत झाली असल्याने भाजप व त्यांच्या सहकार्‍यांनी नगरपंचायतीवर आपला झेंडा फडकवण्याच्या द‍ृष्टीने हालचाली सुरू केल्या आहेत. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमधील आघाड्या विचारात घेता राष्ट्रवादीच्या जयवंतराव शिंपी, मुकुंदराव देसाई, सुधीर देसाई, उदय पवार, बशीर खेडेकर यांच्यासोबत शिवसेनेचे संभाजीराव पाटील, युवराज पोवार, प्रा. सुनील शिंत्रे यांच्यासह राष्ट्रीय काँग्रेसचे नामदेव नार्वेकर, श्रीमती अंजना रेडेकर या एका बाजूला, तर भाजपचे अशोकअण्णा चराटी, प्रा. सुधीर मुंज, जनार्दन टोपले, अरुण देसाई, मलिक बुरुड व त्यांच्यासोबत शिवसेनेचे आमदार प्रकाश आबीटकर यांचे विजय थोरवत, राजेंद्र सावंत व अन्य कार्यकर्ते राहण्याची चिन्हे आहेत. 

नगरपंचायतीच्या नगरसेवकांना नगरपरिषदेकरिता मतदानाचा अधिकार असल्याने जिल्हा पातळीवरूनही या निवडणुकीमध्ये वरिष्ठ नेत्यांचे केवळ लक्षच नाही, तर रसददेखील पुरविली जाणार आहे. त्यामुळे पक्षीय पातळीवरील वरिष्ठ नेत्यांकडूनही उमेदवार निवडीमध्ये हस्तक्षेप राहणार आहे. काही इच्छुकांनी तर आपणाला पक्षाची उमेदवारी मिळणारच नाही, असे गृहीत धरून व्यूहरचना करण्यास सुरुवात केली आहे.