Wed, May 22, 2019 10:32होमपेज › Kolhapur › आजरा नगरपंचायतीवर चराटी यांचा झेंडा

आजरा नगरपंचायतीवर चराटी यांचा झेंडा

Published On: Apr 13 2018 1:20AM | Last Updated: Apr 13 2018 1:20AMआजरा : प्रतिनिधी

संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून असलेल्या आजरा नगरपंचायत निवडणुकीमध्ये आजरा कारखान्याचे अध्यक्ष अशोकअण्णा चराटी यांनी आजरा शहर विकास आघाडीच्या माध्यमातून भाजप तालुकाध्यक्ष अरुण देसाई यांच्या सोबतीने लढत देत 17 पैकी नऊ जागांवर विजय मिळवित बहुमत सिद्ध केले. ज्योत्स्ना अशोक चराटी-पाटील यांनी आजरा नगरपंचायतीच्या पहिल्या नगराध्यक्षा होण्याचा बहुमान पटकावला. राष्ट्रवादी, राष्ट्रीय काँग्रेस व शिवसेना आघाडीला सहा जागांवर विजय मिळाला, तर परिवर्तन आघाडीला एक जागा व अपक्ष शकुंतला सलामवाडे यांनी धक्‍कादायकरीत्या विजय पटकावला. 

सकाळी 10 वाजता अतिरिक्‍त जिल्हाधिकारी नंदकुमार काटकर, निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. संपत खिलारी व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी मनीषा कोल्हे यांच्या उपस्थितीत मतमोजणी प्रक्रिया पार पडली. अवघ्या 15 मिनिटांत पहिली फेरी होऊन यामध्ये नऊ प्रभागांचे निकाल जाहीर झाले. प्रभाग दोनमधून संभाजी पाटील व नाथा देसाई यांना समान मते पडल्याने हा निकाल राखून ठेवण्यात आला होता. त्यानंतर चिठ्ठीद्वारे संभाजी पाटील निवडून आल्याचे जाहीर करण्यात आले. पहिल्या फेरीतच नगराध्यक्षपदासाठी ज्योत्स्ना चराटी यांनी प्रतिस्पर्धी अलका शिंपी व स्मिता टोपले यांच्यावर भक्‍कम आघाडी घेतली. दुसर्‍या फेरीत ही आघाडी कायम राहून त्यांना विजयापर्यंत पोहोचता आले. 

नगरपंचायत निवडणूक गांभीर्याने घेत राष्ट्रवादी, राष्ट्रीय काँग्रेस व शिवसेना आघाडीने जोरदार वातावरण तयार केले होते. आ. हसन मुश्रीफ, आ. सतेज पाटील यांनी प्रचाराचे रान उठवले होते. एकीकडे या आघाडीचे वातावरण तर दुसरीकडे आ. प्रकाश आबिटकर यांच्या परिवर्तन विकास आघाडीने प्रचारात मारलेली मुसंडी पाहता, चराटी यांना ही निवडणूक जड जाईल, असे वाटत होते. परंतु एकाकी पडलेल्या चराटींना नगरपंचायत मंजूर करून आणल्याबद्दल मतदारांनी चांगलेच उचलून धरले असल्याचे आजच्या निकालावरून स्पष्ट झाले आहे. निवडणुकीत काँग्रेसने प्रथमच अधिकृत पक्षाच्या चिन्हाद्वारे मतदारांचा कौल मागितला होता. यामध्ये किरण कांबळे, यास्मिन बुड्डेखान या दोन जागांवर विजय मिळविला. तर मयुर त्रिभुवने यांना शहर विकास आघाडीच्या अनिरुद्ध केसरकर यांच्याकडून निसटत्या पराभवाला सामोरे जावे लागले.

रासपची मात्र या निवडणुकीत हवा निघून गेली. तीन प्रभागातील उमेदवारांना 118 मते मिळाली. राष्ट्रवादीला प्रभाग 3, प्रभाग 8 व प्रभाग 17 मध्ये मतदारांनी चांगली साथ दिली. तर शिवसेनेने संभाजी पाटील यांच्या रूपाने नगरपंचायतीमध्ये आपले प्रतिनिधित्व राखले आहे. विजयानंतर चराटी समर्थकांनी जोरदार आतषबाजी करत गुलालाची उधळण करत जल्लोष साजरा केला. शहरामधून विजयी मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीमध्ये स्वतः अशोक चराटी, विजयकुमार पाटील, डॉ. अनिल देशपांडे, विलास नाईक, भाजपचे तालुकाध्यक्ष अरुण देसाई, मल्लिककुमार बुरुड, प्रा. सुधीर मुंज, आनंदा कुंभार, बापू टोपले यांच्यासह शहर विकास आघाडीचे समर्थक सहभागी झाले होते. 

मतमोजणी प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासनाने नेटके नियोजन केले होते. कोणताही गोंधळ न उडता सुरळीत मतमोजणी प्रक्रिया पार पडली. तसेच पोलिस प्रशासनाच्या वतीनेही शहरात सर्वत्र चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. संभाजी पाटील चिठ्ठीवर विजयीशिवसेनेचे संभाजी पाटील व शहर विकास आघाडीचे नाथा देसाई यांच्यात प्रचंड चुरशीने लढत होऊन दोघांनाही 240 मते पडली. चिठ्ठीवर मात्र संभाजी पाटील यांना नशिबाने साथ दिली. संभाजी पाटील यांनी विजयी घोषित करण्यात आले. पती-पत्नी पराभूतपरिवर्तन विकास आघाडीतून नगराध्यक्षपदाकरिता सौ. स्मिता जनार्दन टोपले व प्रभाग 11 मधून जनार्दन टोपले निवडणुकीला सामोरे गेले होते. ते दोघेही पराभूत झाले. तर प्रभाग दोनमधून संजय इंगळे व प्रभाग तीनमधून सौ. शीतल संजय इंगळे निवडणुकीला सामोरे गेले होते. हे पती-पत्नीही पराभूत झाले. तर मैमुनबी पठाण व रहिमतबी खेडेकर या दोघा सख्ख्या बहिणींना पराभवाला सामोरे जावे लागले. तब्बल पाचवेळा निवडून आलेल्या मैमुनबी पठाण यांना यावेळी मात्र पराभवाला सामोरे जावे लागले.

Tags : Kolhapur, Ajara, Municipality, election