होमपेज › Kolhapur › विमानसेवा आजपासून पूर्ववत : खा. महाडिक

विमानसेवा आजपासून पूर्ववत : खा. महाडिक

Published On: Jul 10 2018 1:02AM | Last Updated: Jul 10 2018 12:29AMकोल्हापूर : प्रतिनिधी

कोल्हापूर-मुंबई मार्गावरील खंडित झालेली विमानसेवा उद्या, मंगळवार (दि. 10) पासून पूर्ववत सुरू होणार आहे. खासदार धनंजय महाडिक यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती दिली. ‘उडान’ योजनेंतर्गत सुरू झालेली ही सेवा एअर डेक्‍कन कंपनीने कोणतेही भरीव कारण न देता 24 जूनपासून बंद केली होती. ती उद्यापासून सुरू होत असल्याची ग्वाही कंपनीने दिल्याचे या पत्रकात म्हटले आहे.

कंपनीने अचानक विमानसेवा बंद केली. त्याविरोधात सर्व स्तरांतून प्रतिक्रिया उमटल्या. या कंपनीची सेवा बंद करून त्याऐवजी दुसर्‍या कंपनीला ही सेवा चालवण्यास द्यावी, अशी मागणी राज्य शासनाने नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाकडे केली. याबाबत दिल्लीत वरिष्ठ अधिकार्‍यांची बैठकही झाली. या बैठकीत कोल्हापूर-मुंबई सेवा सुरू राहण्याबाबत आग्रही भूमिका मांडण्यात आली. या सर्व पार्श्‍वभूमीवर कंपनीने पुन्हा सेवा सुरू करण्याची ग्वाही दिली. त्यानुसार 1 जुलैपासून ही सेवा सुरू होणार होती. मात्र, तांत्रिक कारणास्व ती सुरू झाली नाही. कोल्हापूर-मुंबई मार्गावर उद्या, मंगळवारपासून मात्र, नियमित सेवा सुरू होईल, अशी ग्वाही कंपनीच्या वतीने ई-मेलद्वारे दिल्याचे या पत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे. सेवेत सातत्यही राखले जाईल, असेही कंपनीने स्पष्ट केले आहे.दरम्यान, कंपनीकडून हमी घ्यावी, अशी विनंती केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री सुरेश प्रभू यांना  करण्यात आली होती. त्याला त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. यामुळे खंडित सेवा तातडीने सुरू होत असून लवकरच या सेवेचा विस्तार करून सकाळच्या सत्रात सेवा सुरू होण्याबाबत वरिष्ठ पातळीवर प्रयत्न सुरू असल्याचेही यावेळी त्यांनी सांगितले.