Sun, May 19, 2019 22:14होमपेज › Kolhapur › विमानसेवा : बुकिंगसाठी चौकशी; नागरिकांत उत्सुकता

विमानसेवा : बुकिंगसाठी चौकशी; नागरिकांत उत्सुकता

Published On: Dec 16 2017 2:06AM | Last Updated: Dec 16 2017 1:36AM

बुकमार्क करा

कोल्हापूर : प्रतिनिधी

गेल्या सहा वर्षांनंतर कोल्हापूर-मुंबई विमानसेवा पुन्हा सुरू होत आहे. या विमानसेवेबाबत नागरिकांत उत्सुकता आहे. कमी दरात विमान प्रवासाची संधी उपलब्ध झाल्याने बुकिंगसाठी नागरिकांची चौकशी सुरू झाली आहे. यामुळे बुकिंगच्या दिवशीच महिन्याभराच्या प्लाईट बुक होण्याची शक्यता आहे.

धावपट्टी खराब झाल्याने 16 जून 2011 पासून कोल्हापूर-मुंबई या मार्गावरील विमानसेवा बंद झाली होती. धावपट्टीची दुरुस्ती झाल्यानंतर काही दिवस पुन्हा विमानसेवा सुरू झाली. मात्र, त्यानंतर आजअखेर ही प्रवासी विमानसेवा बंदच आहे. केंद्र शासनाने ‘उडान’ योजनेत कोल्हापूरचा समावेश केला आहे. या योजनेंतगत कमी तिकीट दरात कोल्हापूर-मुंबई विमानसेवा सुरू होणार आहे. याकरिता एअर डेक्कन या कंपनीची नियुक्ती करण्यात आली आहे. कंपनीचे 17 आसनी विमान या मार्गावर वापरले जाणार आहे.

आठवड्यातून तीन वेळा असणार्‍या या सेवेला दि. 24 रोजी प्रारंभ होत आहे. याकरिता दि.21 पासून बुकिंग सुरू करण्यात येईल, असे कंपनीच्या वतीने स्पष्ट केले आहे. कमी तिकीट दरात विमानसेवेचा आनंद घेता येणार असल्याने अनेकांनी सहकुटुंब कोल्हापूर-मुंबईसाठी बुकिंंग करण्याचे प्लॅन केले आहेत. गेल्या दोन दिवसांपासून बुकिंगबाबत अनेक टुर्स अँड ट्रॅव्हल्स एजन्सीकडे चौकशी केली जात आहे. या कंपनीच्या संकेतस्थळावरही नागरिकांचा सर्च सुरू आहे. यामुळे बुकिंग सुरू झाल्यानंतर काही वेळातच महिन्याभरातील फ्लाईट बुक होतील.