Fri, May 29, 2020 10:16होमपेज › Kolhapur › विमानसेवा सकाळच्या सत्रातच हवी

विमानसेवा सकाळच्या सत्रातच हवी

Published On: Dec 22 2017 1:26AM | Last Updated: Dec 22 2017 12:46AM

बुकमार्क करा

कोल्हापूर : प्रतिनिधी

संसदेच्या हिवाळी अधिवेशनात लोकसभेत प्रश्‍नोत्तराच्या तासात खा. धनंजय महाडिक यांनी कोल्हापूरच्या नागरी विमानसेवेचा प्रश्‍न उपस्थित करून आठवड्यातून सहा दिवस ही सेवा सकाळच्या सत्रात सुरू करण्याची जोरदार मागणी केली. यावर नागरी उड्डाण मंत्री अशोक गजपती राजू यांनी सविस्तर निवेदन केले.

खा. महाडिक यांनी सभागृहाचे लक्ष वेधून घेत सांगितले की, केंद्र सरकारच्या उडान योजनेंतर्गत कोल्हापूरचा समावेश झाला आहे. 24 डिसेंबरपासून कोल्हापूरची हवाई सेवा सुरू करण्याची घोषणा झाली होती; पण आठवड्यातील केवळ तीन दिवस आणि तेही दुपारच्या सत्रात कोल्हापूर-मुंबई अशी सेवा देण्यासाठी परवानगी मिळाली. कोल्हापुरातील उद्योग व्यवसायाचा विस्तार, पर्यटनवाढीची क्षमता या बाबींचा विचार करून आठवड्यातून सहा दिवस विमानसेवा तीही सकाळच्या सत्रात सुरू होण्याची अत्यंत गरज आहे. दुपारची वेळ ही प्रवासी आणि हवाई वाहतूक कंपन्या दोन्ही घटकांसाठी योग्य आणि व्यावहारिक नसल्याकडेे खा. महाडिक यांनी लक्ष वेधले. खा. महाडिक यांच्या प्रश्‍नावर नागरी उड्डाण मंत्री 

अशोक गजपती राजू यांनी सविस्तर निवेदन केले. उडान योजनेतून 31 शहरांना नव्याने हवाई नकाशावर आणल्याचे सांगितले. 14 ठिकाणची सेवा सुरू झाली आहे. दुसर्‍या टप्प्यात आणखी 41 शहरे जोडली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कोल्हापूरचा समावेश पहिल्या टप्प्यात आहे. कोल्हापूर-मुंबई सेवा सुरू करण्यामध्ये मुंबई विमानतळावरील प्रचंड एअर ट्रॅफिक आणि त्यामुळे सकाळच्या सत्रात स्लॉट उपलब्धतेचा मुद्दा अडचणीचा ठरत आहे. 

आवश्यक ती कार्यवाही करणार 

खा. महाडिक यांनी उपस्थित केलेले मुद्दे, संबंधित विमान कंपनी आणि मुंबई विमानतळ व्यवस्थापनापर्यंत पोहोचवून त्यांना आवश्यक ती कार्यवाही करण्याची सूचना आपण देणार असल्याचे ना. राजू यांनी सांगितले.