Tue, Apr 23, 2019 23:42होमपेज › Kolhapur › कोल्हापूर-मुंबई विमानसेवा आजपासून

कोल्हापूर-मुंबई विमानसेवा आजपासून

Published On: Apr 22 2018 1:16AM | Last Updated: Apr 22 2018 1:16AMकोल्हापूर : प्रतिनिधी

कोल्हापूर-मुंबई नियमित विमानसेवेला रविवारपासून (दि. 22) प्रारंभ होत आहे. दुपारी तीन वाजून पाच मिनिटांनी विमान मुंबईच्या दिशेने झेपावणार आहे. पहिलीच फेरी पूर्ण भरली आहे. गेली सहा वर्षे खंडित असलेली विमानसेवा नव्याने सुरू होत असून, त्याला प्रवाशांचाही चांगला प्रतिसाद मिळत आहे, यामुळे कोल्हापूरच्या विकासाचा वेग वाढण्यास मदत होईल, असा विश्‍वास व्यक्‍त होत आहे.केंद्र शासनाच्या उडान योजनेंतर्गत कोल्हापूर-मुंबई या मार्गावर एअर डेक्‍कन कंपनीने विमानसेवा सुरू केली आहे.

या मार्गावर ‘ट्रायल रन’ घेतल्यानंतर कंपनीने रविवारपासून नियमित सेवा सुरू करत असल्याचे यापूर्वीच जाहीर केले होते. कंपनीच्या 18 सीटर असलेल्या या विमानातील पहिल्या नऊ सीटस्साठी उडान योजनेंतर्गत 1 हजार 970 रुपये भाडे आकारले जात आहे. उर्वरित सीटस्चे भाडे 4 हजारांवरून अगदी सहा हजारापर्यंत जात आहे. असे असतानाही या विमानसेवेच्या पहिल्या दिवसाच्या मुंबई-कोल्हापूर व कोल्हापूर-मुंबई या दोन्ही फ्लाईट फूल झाल्या आहेत. प्रवाशांचा या सेवेला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र असून, जूनच्या दुसर्‍या आठवड्यापर्यंतच्या फ्लाईटची  बहुतांशी तिकिटे बुक झाली आहेत.

आठवड्यातून सहा दिवस सेवा चालू राहण्यासाठी प्रयत्न : खा. महाडिक

आठवड्यातून रविवार, मंगळवार आणि बुधवार अशी तीन दिवसच सुरू राहणारी ही विमानसेवा आठवड्यातून किमान सहा दिवस सलग सुरू रहावी, यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे खा. धनंजय महाडिक यांनी सांगितले. याबाबत तत्त्वत: मान्यता मिळाली असून, लवकरच ही विमानसेवा दररोज सुरू राहील, असा विश्‍वास त्यांनी व्यक्‍त केला. या विमानसेवेसाठी सकाळच्या सत्रातील ‘टाईम स्लॉट’ मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्याबाबतही सकारात्मक प्रक्रिया सुरू आहे. कोल्हापूर विमानतळाचे विस्तारीकरणाचे काम सुरू आहे, त्याबरोबरच विमानतळावर नाईट लँडिंगचेही काम लवकरच सुरू करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

महिन्याभरानंतर होणार उद्घाटन सोहळा

विमानसेवेचे उद्घाटन केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते होणार होते. मात्र, प्रभू या सोहळ्यासाठी सोमवारी (दि. 23) कोल्हापूर दौर्‍यावर येणार होते. या दिवशी फ्लाईट नसल्याने हा उद्घाटन सोहळा रद्द करण्यात आला आहे. तसेच विमानसेवा सुरळीत सुरू होऊ दे, त्यानंतर उद्घाटन सोहळा करू, अशी भूमिका पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतल्याने उद्या विमानसेवेला उद्घाटनाच्या कोणत्याही कार्यक्रमाविना प्रारंभ होत आहे. मात्र, या विमानसेवेचा महिन्याभरानंतर उद्घाटन सोहळा होईल, असेही यावेळी सांगण्यात आले.

Tags : Kolhapur, Air, services, starts, today