Sun, Nov 18, 2018 09:09होमपेज › Kolhapur › शेतीचे उत्पन्‍न वाढले शेतकर्‍यांचे नाही : खोत

शेतीचे उत्पन्‍न वाढले शेतकर्‍यांचे नाही : खोत

Published On: Jan 08 2018 1:13AM | Last Updated: Jan 07 2018 10:57PM

बुकमार्क करा
कोल्हापूर : प्रतिनिधी

शेतीचे उत्पन्‍न वाढविण्यासाठी रासायनिक खतांचा वापर करा, असे सांगण्यात आले. शेतीत अनेक प्रयोग झाले. शेतीचे म्हणजे राष्ट्राचे उत्पन्‍न वाढावे यासाठी हे प्रयोग करण्यात आले. शेतीचे उत्पन्‍न वाढले. मात्र, शेतकर्‍याचे उत्पन्‍न वाढले नाही. आजही दोन सदरे घेण्याची अनेक शेतकर्‍यांची एैपत नाही, अशी खंत लेखक कृष्णात खोत यांनी व्यक्‍त केली.
करवीरनगर वाचन मंदिर येथे कै. वि. स. खांडेकर व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. या व्याख्यानमालेत ‘बदलता गाव- एक चिंतन’ या विषयावर ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नंदकुमार मराठे होते. 

यावेळी खोत यांनी गावातील बदलती परिस्थिती, बदललेली रचना, संस्कृती आणि राजकारणाचे गावावर झालेले दूरगामी परिणाम यांचा आढावा घेतला. गावातील शेतकर्‍यांना वनस्पती, बहुपीक पद्धती, शरीरशास्त्र यांचे चांगले ज्ञान होते. मात्र, गेल्या पंचवीस वर्षांत गाव ही संकल्पनाच बदलत आहे. रस्त्यावरच्या जमिनीला महत्त्व आले आहे. ज्याला शेतीचे ज्ञान नाही, असे लोक जमिनी खरेदी करीत आहेत. शहरी धनदांडग्यांनी गावातील जमिनी, डोंगर खरेदी केले आहेत. शहरी प्रतिमेचा प्रभाव खेड्यावर पडत आहे. घरांची रचना बदलली आहे. आढ्यावर -आढे असल्यामुळे शेजारील घरात काही समस्या तर नाही ना? याची जाणीव होत होती.

सध्या घर संरक्षक भितींनी बंदिस्त केले जात आहे. शेजार्‍याला  आपल्या घरातील काहीही कळता कामा नये, अशी  घराची रचना माणसांनी केली आहे. खूप बेगडी स्वरूप आज याला आले आहे. अन्‍न, वस्त्र, निवारा यांच्या इतकेच खेड्यातील माणसाला राजकारण महत्त्वाचं वाटत आहे. सभातून चांगले काही ऐकायला मिळत नाही. जात- पात, धर्म यांचे घाणेरडे राजकारण खेड्यातही  शिरले आहे. अनेक तरुण राजकीय नेत्यांच्या हातातील बाहुले बनले आहेत. यामुळे समूहभाव नावाची गोष्ट नष्ट होत आहे. याप्रसंगी प्रा. डॉ. रमेश जाधव, दीपक गाडवे, अश्‍विनी वळीवडेकर, मनीषा शेणई आदींची उपस्थिती होती.