Tue, Jul 16, 2019 01:41होमपेज › Kolhapur › कृषिपंपांना दिवसा दहा तास वीज द्या

कृषिपंपांना दिवसा दहा तास वीज द्या

Published On: Dec 03 2017 1:32AM | Last Updated: Dec 03 2017 12:02AM

बुकमार्क करा

कोल्हापूर : प्रतिनिधी

सध्या ऊस लागणीचे व रब्बी पेरणीचे काम जोरात सुरू असल्याने कृषिपंपांसाठी रात्रीऐवजी दिवसा सलग दहा तास वीज द्यावी, अशी मागणी महाराष्ट्र इरिगेशन फेडरेशनतर्फे जिल्ह्यातील सहकारी व खासगी पाणीपुरवठा संस्थांनी महावितरणकडे केली. आमदार चंद्रदीप नरके,  बाबासाहेब पाटील-भुयेकर, इरिगेशन फेडरेशनचे विक्रांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने महावितरणचे मुख्य अभियंते परदेशी यांना मागण्यांचे निवेदन दिले. येत्या दहा दिवसांत निर्णय न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला. 

महावितरणने ऑक्टोबरपासून कृषिपंपांसाठी सुरू केलेले भारनियमन अन्यायी आहे. याआधी कृषिपंपांना दिवसा 8 व रात्री 10 तास असा चार दिवस, दिवसा व तीन दिवस रात्री याप्रमाणे वीजपुरवठा होत होता. पण आता महावितरणने शेेड्यूल बदलल्यामुळे दररोज रात्री साडेनऊ वाजता वीजपुरवठा सुरू होतो, पहाडे साडेपाच वाजता बंद होतो. या पद्धतीमुळे शेतकर्‍यांना रात्रीच पाणी पाजावे लागत आहे. रात्रीचे पाणी पाजणे हे शेतकर्‍यांसाठी गैरसोयीचे आणि अडचणीचे आहे. यातून पाण्याची व विजेचीही नासाडीच होत आहे. त्यामुळे सकाळी 10 ते रात्री 8 या वेळेत सलग 10 तास वीजपुरवठा सुरू करावा, अशी आग्रही मागणी असल्याचे शिष्टमंडळाने महावितरणच्या अधिकार्‍यांना सांगितले. 

येत्या दहा दिवसांत यासंबंधी निर्णय झाला नाही तर उग्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही फेडरेशनतर्फे देण्यात आला. महावितरणने कृषिपंपांना लागू केलेले एईसी चार्जेस कोणत्याही परिस्थितीत भरणार नसल्याचा पुनरुच्चारही यावेळी करण्यात आला. हे चार्जेस महावितरणने शासनाकडूनच घ्यावेत, तो भुर्दंड शेतकर्‍यांवर लादू नये. ग्राहकांना दिली जाणारी बिले योग्य आणि तपासूनच द्यावीत, असे सांगण्यात आले. यावेळी इरिगेशन फेडरेशनचे सचिव मारुती पाटील, आर.के.पाटील यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.