Tue, Jul 07, 2020 20:51होमपेज › Kolhapur › सहा जिल्ह्यांतील वकिलांच्या मेळाव्यानंतर आंदोलनाची दिशा

सहा जिल्ह्यांतील वकिलांच्या मेळाव्यानंतर आंदोलनाची दिशा

Published On: Jul 19 2018 1:37AM | Last Updated: Jul 19 2018 1:10AMकोल्हापूर : प्रतिनिधी 

खंडपीठ कृती समितीचे निमंत्रक व जिल्हा बारचे अध्यक्ष प्रशांत चिटणीस तसेच माजी अध्यक्ष विवेक घाटगे यांच्यासह जिल्हा बारचे पदाधिकार्‍यांनी सांगली जिल्हा बारला भेट दिली. सांगली जिल्हा बार असोसिएशनच्या वतीने पदाधिकार्‍यांचा सत्कार करण्यात आला . सांगली जिल्हा बारचे अध्यक्ष यांनी प्रास्ताविक केले. खंडपीठ लढायांमध्ये सांगली जिल्ह्याने नेहमीच पुढाकार घेतला आहे तसेच तो यापुढेही अग्रभागी राहील. सहा जिल्ह्यांच्या पदाधिकारी व वकील वर्गाचा मेळावा लवकरात लवकर घेऊन आंदोलनाचा निर्णायक लढा सुरू करावा, असे मत त्यांनी मांडले. 

सांगली जिल्हा बारचे ज्येष्ठ वकील एच. के. पाटील, प्रताप हारुगडे, सुरेश भोसले, महेश जाधव, किरण रजपूत, यांनी मत मांडले. नुकत्याच झालेल्या बार कौन्सिलचे निवडणुकीवेळी सहा जिल्ह्यांची एकी व समन्वय राहिला नसल्याची खंत काहींनी व्यक्‍त केली. 

जिल्हा बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष विवेक घाटगे यांनी बार कौन्सिलची निवडणूक व खंडपीठाचा प्रश्‍न या दोन स्वतंत्र बाबी असल्याने त्याबाबत स्वतंत्र विचार होणे जरुरीचे आहे. तसेच खंडपीठाच्या प्रश्‍न निर्णायक टप्प्यावर आहे, असे मत त्यांनी व्यक्‍त केले. कोल्हापूर जिल्हा बारचे अध्यक्ष प्रशांत चिटणीस यांनी खंडपीठाचा प्रश्‍न हा प्रामुख्याने पक्षकारांशी निगडित आहे. सहा जिल्ह्यांतील वकिलांचे या खंडपीठाबाबत कोणतेही दुमत नाही. खंडपीठाचा प्रश्‍न येत्या काही महिन्यांत पूर्णतः मार्गी लागणार आहे, असा आशावाद व्यक्‍त केला. तसेच सर्व जिल्ह्यांतील वकिलांचा मेळावा लवकरच घेऊ व निर्णायक लढा सुरू करू, असे सांगितले. यावेळी कोल्हापूर जिल्हा बारचे उपाध्यक्ष आनंद जाधव , कार्यकारिणी सदस्य ओंकार देशपांडे, युवराज शेळके, विजय पाटील तसेच सांगली जिल्ह्यातील बहुसंख्य वकील उपस्थित होते.