Mon, Jun 17, 2019 14:14होमपेज › Kolhapur › जन्मानंतर तासाभरातच ‘तो’ आधारकार्डधारक

जन्मानंतर तासाभरातच ‘तो’ आधारकार्डधारक

Published On: Feb 23 2018 1:19AM | Last Updated: Feb 23 2018 12:41AMगडहिंग्लजः प्रवीण आजगेकर

जन्माला आल्यानंतर अवघ्या एका तासातच गडहिंग्लजमधील अर्भकाच्या नावे आधारकार्ड बनवण्यात आले आहे. या अर्भकाच्या नावे पॅनकार्डसाठीही अर्ज करण्यात आला असून जन्मानंतर तासाभरातच आधारकार्ड आणि पॅनकार्ड काढण्याचा हा विक्रमच म्हणावा लागेल. 

कोरगाव पार्कमध्ये राहणार्‍या उदय चोथे यांची आपल्या मुलाने जन्माला येताच आधारकार्डधारक व पॅनकार्डधारक व्हावे, अशी इच्छा होती. त्यामुळे बाळ जन्माला आल्यावर लगेचच त्याचे नामकरण करून त्यांनी आधारकार्ड काढण्याची प्रक्रिया सुरू केली. विशेष म्हणजे सर्व यंत्रणा वेगाने पार पडल्याने अवघ्या तासातच सार्थक उदय चोथे या नावानेे आधारकार्ड तयार झाले.

सार्थकच्या नावे पॅनकार्डही काढण्यासाठी आम्ही तातडीने प्रयत्न केले असून पॅनकार्डसाठी लागणार्‍या सर्व आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून त्याला आधारकार्डाचे लिंकिंग करून त्याला पॅनकार्डधारक करण्याचाही वेगाने प्रयत्न केला आहे. आधारकार्डप्रमाणे फक्‍त तातडीने पॅनकार्ड मिळाले नसले तरी ऑनलाईन नोंदणी यशस्वी पूर्ण झाली आहे. त्यामुळे 15 दिवसांत त्याला पॅनकार्ड मिळण्याचाही मार्ग मोकळा झाला आहे.

एकीकडे आधारकार्ड, पॅनकार्ड काढण्याबाबत अनेक जण चालढकल करीत असतात. अचानकपणे शासकीय कामासाठी दोन्ही ओळखपत्रे लागतात, मग लोकांची धावपळ सुरू होते. यामध्ये वेळ जातो अन् अडचणींचा सामना करावा लागतो. याउलट गडहिंग्लज येथील सार्थकच्या वडिलांनी मात्र तातडीने सजगता दाखवित आपल्या मुलाचे तातडीने आधारकार्ड व पॅनकार्ड काढून एक वेगळा आदर्श सर्वांसमोर ठेवला आहे.