Wed, Mar 20, 2019 08:58होमपेज › Kolhapur › तब्बल महिन्यानंतर राजाराम बंधारा खुला

तब्बल महिन्यानंतर राजाराम बंधारा खुला

Published On: Sep 04 2018 1:17AM | Last Updated: Sep 04 2018 12:16AMकोल्हापूर : प्रतिनिधी

जिल्ह्यात पावसाचा जोर पूर्णतः ओसरला आहे. ऊन-पावसाच्या खेळात अधूनमधून पावसाची कोसळणारी सर वगळता सर्वत्र कडकडीत उघडीप आहे. यामुळे सोमवारी पंचगंगेची पातळी 16 फुटांपर्यंत खाली आली. गेल्या महिनाभर पाण्याखाली असलेला पंचगंगेवरील राजाराम बंधारा सोमवारी खुला झाला. जिल्ह्यातील तीन बंधार्‍यांवर अद्याप पाणी आहे.

जिल्ह्यात काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली आहे. गेले चार दिवस कडकडीत ऊन पडत आहे. सोमवारीही पावसाची उघडीप असली तरी वातावरण काहीसे ढगाळ होते. अधूनमधून तुरळक सरींसह मोठ्या सरीही कोसळल्या. शहर आणि परिसरात सायंकाळी जोरदार पाऊस झाला. येत्या दोन-तीन दिवसांत पावसाचा जोर वाढेल, अशीही शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. 

पावसाचा जोर कमी झाल्याने धरणांतील विसर्ग कमी झाला आहे. राधानगरीतून वीज निर्मितीसाठी विसर्ग सुरू आहे. यामुळे नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्याने घट होत आहे. पंचगंगेची पातळी तब्बल एक महिन्याने सोमवारी 15 फुटांवर आली. दि. 3 ऑगस्ट रोजी पंचगंगेची पातळी 17.6 फुटांवर गेली होती. सोमवारी दुपारी ती 15.7 फुटांवर आली. यामुळे पंचगंगेवरील राजाराम बंधाराही तब्बल एका महिन्याने खुला झाला. त्यावरील वाहतूक बंद असली तरी पाणी आज पूर्णपणे ओसरले. 

दरम्यान, जिल्ह्यात सरासरीच्या 84 टक्के पाऊस झाला आहे. अद्याप पावसाचे 27 दिवस बाकी आहेत. यामुळे वार्षिक सरासरी गाठण्याची शक्यता आहे.