Thu, Jun 27, 2019 13:44होमपेज › Kolhapur › लॉटरीत मिळालेल्या शाळेतच घ्यावा लागणार प्रवेश

लॉटरीत मिळालेल्या शाळेतच घ्यावा लागणार प्रवेश

Published On: Jan 09 2018 1:33AM | Last Updated: Jan 09 2018 12:31AM

बुकमार्क करा
कोल्हापूर : प्रतिनिधी

खासगी प्राथमिक शाळांमधील 25 टक्के जागांवर प्रवेश मिळविण्यासाठी राबविण्यात येणार्‍या शिक्षण हक्क कायद्याच्या (आरटीई) प्रवेश प्रक्रियेला 24 जानेवारीपासून सुरुवात होणार आहे. यंदा प्रवेश प्रक्रियेत पालकांना पसंतीक्रमाच्या ऑनलाईन अर्जात दहा शाळांची नावे भरावी लागणार असून लॉटरीत पहिल्या क्रमांकावर लागणार्‍या शाळेतच प्रवेश घ्यावा लागणार आहे. त्या शाळेत प्रवेश न घेतल्यास विद्यार्थी प्रवेश प्रक्रियेच्या बाहेर जाणार आहे.

शिक्षण विभागाकडून गेल्या चार वर्षांपासून आर्थिक दुर्बल व वंचित घटकांसाठी 25 टक्के (आरटीई) प्रवेश प्रक्रिया राबविली जात आहे. जिल्ह्यात आतापर्यंत शंभर टक्के प्रवेश झालेले नाहीत. गतवर्षी आरटीई प्रवेशाच्या 321 शाळा होत्या. त्यामधील सुमारे 3269 प्रवेश जागांपैकी 850 प्रवेश झाले. यावर्षी प्राथमिक शिक्षण विभागाने प्रवेशाचे वेळापत्रक तयार केले आहे. मात्र, अद्याप शाळांसाठी ऑनलाईन नोंदणीसाठी संकेतस्थळ सुरू झाले नसल्याचे अडचणी येत आहेत.

आरटीई प्रवेश वेळापत्रकानुसार शाळा प्रशासनाला 3 ते 20 जानेवारीपर्यंत नोंदणी करावी लागणार आहे. 22  व 23 जानेवारी रोजी नोंदणी केलेल्या शाळांची पडताळणी करण्यात येणार आहे. प्रवेश प्रक्रियेंतर्गत 24 जानेवारीपासून पालकांना आपल्या मुलाचा ऑनलाईन अर्ज भरता येणार असून 10 फेब्रुवारीपर्यंत मुदत आहे. प्रवेश प्रक्रियेची पहिली लॉटरी 12 व 13 फेब्रुवारी रोजी काढली जाणार आहे. त्यानंतर 14 ते 22 फेब्रुवारी दरम्यान लॉटरीद्वारे मिळालेल्या शाळेत प्रवेश घ्यायचा आहे. अशाप्रकारे शिक्षण विभागाने आरटीई प्रवेशाच्या सहा फेर्‍यांचे नियोजन केले आहे. अंतिम फेरीची लॉटरी 16 व 17 एप्रिल रोजी काढण्यात येणार असून 18 ते 24 एप्रिल या कालावधीत प्रवेश घ्यावा लागणार आहे. 

पालकांच्या सोयीसाठी पोर्टल 

आरटीई प्रवेशांतर्गत पालकांच्या सोयीसाठी आरटीई पोर्टल सुरू करण्यात आले आहे. त्यात प्रवेशासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, कागदपत्रे, वयाची अट, शाळा मार्गदर्शन केंद्र, हेल्पलाईन क्रमांक आदी सर्व गोष्टींची माहिती पालकांना  https://rte25admission.maharashtra.gov.in या पोर्टलवर मिळेल. आरटीई प्रवेश प्रक्रियेत होणारे बदल व सूचनांची माहिती माहिती पोर्टलवर प्रकाशित करण्यात येणार आहे.