Thu, Apr 25, 2019 12:05होमपेज › Kolhapur › जिल्हा परिषदेचा  कार्यभार ‘प्रभारीं’वर

जिल्हा परिषदेचा  कार्यभार ‘प्रभारीं’वर

Published On: Jul 19 2018 1:37AM | Last Updated: Jul 18 2018 11:29PMकोल्हापूर : विकास कांबळे

मिनी विधानसभा म्हणून ओळखल्या जाणार्‍या जिल्हा परिषदेत भारतीय जनता पक्षाने मित्र पक्षांच्या मदतीने  झेंडा फडकविला, पदाधिकारी निवडले. दुसरीकडे जिल्हा परिषदेचा प्रशासकीय कारभार मात्र प्रभारींवर सुरू आहे.  शिक्षणाधिकार्‍यांचा कार्यभार उपमुख्य कार्यकारी अधिकार्‍यांकडे आणि प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांकडे तीन, तीन विभागांचा कार्यभार देण्याचा प्रसंग कधी आला नव्हता. यावेळी मात्र हा प्रकार जिल्हा परिषदेत घडला आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेचा कारभार सध्या रामभरोसे सुरू असल्याचे बोलले जाते.

जिल्हा परिषदेत गेल्या वर्षभरापासून विविध विभागांतील रिक्‍त असलेल्या पदांकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. पदाधिकारी बदलाच्या वार्‍यामुळे काहीसे अस्थिर झालेले पदाधिकारीच मुळात आपल्या खुर्च्या कशा टिकतील, याचाच विचार करण्यात मग्‍न असल्याने त्यांना असल्या गोष्टींकडे लक्ष देण्यास वेळ नसल्याचे बोलले जाते. गेल्यावर्षी सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे यांच्या बदलीनंतर कित्येक महिने रिक्‍त राहिले होते. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांची बदली झाल्यामुळे त्याचा कार्यभार श्रीमती सुषमा देसाई यांच्याकडे देण्यात आला आहे.

मुळात त्यांच्याकडे ग्रामसवेक प्रशिक्षण केंद्राचा पूर्णवेळ कार्यभार आहे, असे असताना प्रकल्प संचालक डॉ. हरिष जगताप यांची बदली झाल्यामुळे त्यांच्या पदाचा कार्यभार श्रीमती देसाई यांच्याकडे देण्यात आला. ही दोन पदे असतानाच आता सेवाज्येष्ठतेच्या निकषानुसार मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचाही कार्यभार त्यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. ही तीनही पदे महत्त्वाची आहेत. त्या सर्वांचा एकाच व्यक्‍तीकडे कार्यभार दिल्यामुळे सर्व विभागांना ती व्यक्‍ती न्याय कशी देऊ शकणार, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे. त्यानंतरचे पद म्हणजे अतिरिक्‍त मुख्य कार्यकारी अधिकारी. इंद्रजित देशमुख याठिकाणी काम पाहत होते. त्यांनी स्वेच्छा निवृत्तीचा अर्ज दिला आहे, त्याला तीन महिने होत आली आहेत; राजीनामा दिल्यानंतर ते रजेवर गेले आहेत. राजीनामा मागे घेण्याबाबत काहीजणांनी त्यांचे मन वळविण्याचा प्रयत्न केला; पण ते आपल्या निर्णयावर ठाम आहे. 31 जुलै रोजी त्यांचा राजीनामा मंजूर होईल, त्यानंतर हे पद अधिकृतरीत्या रिक्‍त होईल. त्यामुळे सध्या हे पद तांत्रिकद‍ृष्ट्या रिक्‍त नसले तरी या पदावरही सध्या कोणीही नाही, अशी स्थिती आहे.

मागासवर्गीयांच्या उन्‍नतीसाठी विविध योजना राबविणार्‍या समाजकल्याण विभागही रिकामा आहे. समाजकल्याण अधिकारी  भोगले यांची बदली झाल्यानंतर अद्याप याठिकाणी दुसर्‍या अधिकार्‍याची नियुक्‍ती न केल्याने हे पद रिक्‍त आहे. याचा कार्यभार कृषी अधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांच्याकडे दिला आहे. ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता एस. एस. शिंदे यांची बदली झाली आहे. त्यांच्या ठिकाणी बसरगेकर यांची नियुक्‍तीही झाली आहे. मात्र, ते अद्याप हजर न झाल्याने या पदाचा कार्यभार मनीष पोवार यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला आहे.

शिक्षण उपसंचालकपद रिक्‍त असल्याने त्याचा कार्यभार जिल्हा परिषदेतील माध्यमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांच्याकडे सोपविण्यात आहे. प्रभारी शिक्षण उपसंचालक म्हणून काम करत असताना लोहार आपल्या मूळ नियुक्‍तीच्या ठिकाणाला विसरूनच गेले. जिल्हा परिषदेपेक्षा त्यांना हत्तीमहल रोड अधिक आवडू लागल्याने जिल्हा परिषदेतील कामेही ते तेथे बसूनच करू लागल्याची चर्चा माध्यमिक विभागातील कर्मचारीच करू लागले आहेत.

प्राथमिक शिक्षण विभागाची अवस्था तर अतिशय वाईट आहे. शिक्षणाधिकारी नाही आणि एकही उपशिक्षणाधिकारी नाही. त्यामुळे या विभागाचा कारभार शिपाई आणि कारकुनावरच सुरू असल्याचे बोलले जाते. प्राथमिक शिक्षणाधिकार्‍यांचा कार्यभार उपमुख्य कार्यकारी अधिकार्‍यांकडे देण्याचा प्रकार यापूर्वी कधी जिल्हा परिषदेत घडला नसल्याचे सांगितले जाते. मात्र, उपशिक्षणाधिकार्‍यांची सर्व पदे रिक्‍त असल्याने या पदाचा कार्यभार उपमुख्य कार्यकारी अधिकारी अरविंद आडसूळ यांच्याकडे देण्यात आला आहे. जिल्हा परिषदेत सर्वात मोठा विभाग शिक्षण विभाग आहे. असेे असतानाही या विभागाची अशी परिस्थिती असल्याने या विभागावर सध्या कोणाचेही लक्ष नाही.

गटविकास अधिकार्‍यांची निम्मी पदे रिक्‍त...

गटविकास अधिकार्‍यांची जवळपास निम्मी पदे रिक्‍त आहेत. आजरा, राधानगरी, शाहूवाडी व पन्हाळा तालुक्यातील पदे रिक्‍त आहेत. राधानगरी व शाहूवाडी गटविकास अधिकार्‍यांची बदली झाली आहे. मात्र, त्यांना अद्याप कार्यमुक्‍त केले नाही. त्यामुळे या तालुक्यांचा कार्यभार अन्य गटविकास अधिकार्‍यांकडे सोपविण्यात आला आहे. निरंतर शिक्षण अधिकारीपदही रिक्‍त आहे. महिला व बालविकास विभागातील जिल्ह्यातील बहुतेक सर्व पदे रिक्‍त आहेत. यासंदर्भात पदाधिकारी आणि नेत्यांनी लक्ष घालून सर्व पदे भरावीत, अशी मागणी होत आहे.