होमपेज › Kolhapur › अतिरिक्‍त साखरेचा प्रश्‍न मिटणार

अतिरिक्‍त साखरेचा प्रश्‍न मिटणार

Published On: Sep 13 2018 1:44AM | Last Updated: Sep 13 2018 1:32AMकोल्हापूर ः प्रतिनिधी

इथेनॉलच्या दरात केंद्र सरकारने घसघशीत वाढ केल्याने पुढील हंगामातील अतिरिक्‍त साखरेचा प्रश्‍न मिटणार आहे. कोल्हापूर विभागात 14 कारखान्यांत मोलॅसिसपासून इथेनॉल करण्याची सोय आहे. उसापासून इथेनॉल करण्याची प्रक्रिया कोणत्याही कारखान्यात नाही. 

इथेनॉल दरात झालेल्या वाढीची अंमलबजावणी यावर्षी डिसेंबरपासून होणार आहे. इथेनॉल निर्मितीसाठी देशभरातून किमान 40 ते 50 लाख टन साखर किंवा तेवढा ऊस गेला तरी पुढील हंगामातील अतिरिक्‍त साखरेचा प्रश्‍न मिटणार आहे. याशिवाय, साखरेलाही चांगला दर मिळणार आहे. त्यातून एकरकमी एफआरपी देणे साखर कारखान्यांना शक्य होईल. या निर्णयाबरोबरच किमान 50 लाख टन साखर निर्यातीचा निर्णय होऊन त्यासाठी सरकारने अनुदान देण्याचा निर्णय घेण्याची गरज आहे. 

अंबानीसारख्या उद्योगपतींसाठीच निर्णय ः मुश्रीफ

इथेनॉलच्या दरात वाढ केली असली तरी उसापासून इथेनॉल निर्मिती करण्याची सोय कारखान्यांकडे नाही. ही सोय करायची झाल्यास त्याला तीन-चार महिन्यांचा कालावधी लागणार, कर्ज बँका देतील का, ना हरकत प्रमाणपत्र लगेच मिळेल का, अशा अनेक अडचणी आहेत. त्यापेक्षा कच्ची साखर निर्यातीचे धोरण निश्‍चित व्हायला हवे होते, त्यासाठी अनुदानही दिले पाहिजे, हमीभाव प्रतिक्‍विंटल 2900 रुपयांवरून 31 रुपये केला पाहिजे. हे निर्णय बाजूला राहिले आणि हा निर्णय घेतला आहे. पूर्वी मुकेश अंबानी यांनी उसाच्या रसापासून इथेनॉल तयार करणारे प्रकल्प उभा करण्याची तयारी दर्शवली होती, त्यासाठीच हा निर्णय घेतला का, अशी शंका कारखानदार म्हणून मला येते, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ यांनी व्यक्‍त केली.