Sun, May 19, 2019 22:16होमपेज › Kolhapur › पाच टोळ्यांमधील ३४ गुंडांवर ‘मोका’ प्रस्ताव

पाच टोळ्यांमधील ३४ गुंडांवर ‘मोका’ प्रस्ताव

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

कोल्हापूर : प्रतिनिधी

कोल्हापूर, इंचलकरंजीसह जिल्ह्यातील पाच संघटित टोळ्यांचे म्होरके व 34 गुंडांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण (मोका) कायद्यांतर्गत कारवाईसाठी विशेष पोलिस महानिरीक्षकांकडे प्रस्ताव दाखल करण्यात आले आहेत, अशी माहिती पोलिस अधीक्षक संजय मोहिते यांनी गुरुवारी पत्रकारांना दिली.

भूखंड माफिया, महामार्गावरील दरोडेखोरी, वस्त्रनगरीतील खंडणी वसुलीसह संघटित गुन्हेगारी टोळ्यांची दहशत मोडून काढण्यासाठी कठोर कारवाईचा बडगा उगारण्यात येत आहे. जिल्ह्यातील पाच संघटित टोळ्यांतील गुन्हेगारांवर लवकरच मोका कारवाई अपेक्षित आहे, असेही ते म्हणाले.

महामार्गावर पर्यटकांच्या वाहनांना टार्गेट करून दरोडा टाकणार्‍या सराईत टोळ्यांसह पंचतारांकित औद्योगिक वसाहतीच्या ठिकाणी किंबहुना वस्त्रनगरी इचलकरंजीतील उद्योजक, व्यावसायिकांवर दहशत निर्माण करून प्रोटेक्शन मनीच्या नावाखाली खंडणी वसुली करणार्‍यांवर पोलिस यंत्रणेने लक्ष केद्रित केले आहे, असेही मोहिते यांनी स्पष्ट केले.

कोल्हापूर पोलिसांनी आर्या, जर्मनी, गुंड्या ऊर्फ मुसा जमादार याच्या मुन्‍ना मुसाची भाईजान, संतोष ऊर्फ सनी अनंता बगाडेच्या एस. बी. बॉईज, शाम लाखेसह त्याच्या गँगविरुद्ध कठोर कारवाईचा बडगा उगारला आहे. समाजात अस्थिरता निर्माण करणार्‍या टोळ्यांतील साथीदारांवर ‘मोका’ कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली आहे, असेही त्यांनी सांगितले.

शहरासह इचलकरंजी, शहापूर, जयसिंगपूर येथील पाच टोळ्यांतील 34 गुंडांवर मोका कायद्यांतर्गत कारवाईचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात आहे. विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील यांनी प्रस्तावाला मंजुरी देताच संमाजकंटकांची उचलबांगडी होईल, असे त्यांनी यावेळी सांगितले.

वाहतूक शाखा पोलिसांवर लवकरच कारवाई होणार

दुचाकीस्वार तरुणाला भरचौकात शिवीगाळ करून उद्धट वर्तन करणार्‍या शहर वाहतूक नियंत्रण शाखेतील ‘त्या’ पोलिसावर लवकरच कारवाई केली जाईल, असे स्पष्ट करून मोहिते म्हणाले, पोलिसांनी नागरिकांशी सौजन्याने वागायला हवे, याबाबत सूचना देऊनही आदेशाचे पालन न करणार्‍यांची गय केली जाणार नाही. सोशल मीडियावर व्हायरल झालेली चित्रफित उपलब्ध झाली आहे. हा प्रकार शोभादायक नाही. संबंधित पोलिसावर कडक कारवाई होईल. 


  •