Mon, Aug 19, 2019 05:27होमपेज › Kolhapur › ३६ ‘बीएलओं’वर होणार फौजदारी

३६ ‘बीएलओं’वर होणार फौजदारी

Published On: Jul 20 2018 1:11AM | Last Updated: Jul 20 2018 12:33AMआजरा : प्रतिनिधी

मतदान पुनरिक्षण कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी आजरा तालुक्यात नेमण्यात आलेल्या 131 मतदान केंद्रस्तरीय अधिकार्‍यांपैकी (बीएलओ) 36 अधिकार्‍यांनी माहिती संकलित न केल्याने कामात कसूर झाल्याचा ठपका ठेवत त्यांना नोटिसा लागू करण्यात आल्या आहेत. त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याच्या हालचाली सुरू झाल्याची माहिती आजरा तहसीलदार यांनी दिली. 

निवडणूक आयोगाने 15 मे पासून 1 जानेवारी 2019 या अर्हता दिनांकावर आधारित विशेष मतदार पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे.  या कामासाठी तालुक्यातील ग्रामसेवकांसह शिक्षकांची मतदार केंद्रस्तरीय अधिकारी म्हणून नेमणूक केली आहे. तालुक्यातील 131 ग्रामसेवक व शिक्षक ही जबाबदारी पार पाडत आहेत. वारंवार सूचना देऊनही बीएलओंनी संबंधित माहिती तहसील कार्यालयाकडे सादर केलेली नाही. यामुळे अनेक मतदारांची नावे मतदार यादीत अद्याप समाविष्ट झालेली नाहीत. 

लोकप्रतिनिधित्व अधिनियम 1950 अन्वये संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याच्या पार्श्‍वभूमीवर नोटिसा लागू करण्यात आल्या आहेत. अधिकार्‍यांना याबाबत गांभीर्य नसेल तर त्यांना कारवाईला सामोरे जावेच लागेल, असेही देशमुख यांनी स्पष्ट केले.

माहिती संकलित करण्याचे काम

तालुक्यातील 61 अंगणवाडीसेविका, 13 तलाठी, 35 ग्रामसेवक, 21 प्राथमिक शिक्षक व एका लिपिकाची मतदार पुनरिक्षण कार्यक्रम अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. यापैकी  अंगणवाडीसेविकांसह ग्रामसेवकांकडून वेळेत काम होत नसल्याचे पुढे येत आहे.