Fri, Jul 19, 2019 01:30होमपेज › Kolhapur › क्षमतेपेक्षा जादा प्रवेश दिल्यास कारवाई 

क्षमतेपेक्षा जादा प्रवेश दिल्यास कारवाई 

Published On: Aug 25 2018 1:15AM | Last Updated: Aug 24 2018 11:12PMकोल्हापूर : प्रवीण मस्के

शहरालगतच्या ग्रामीण भागातील उच्च माध्यमिक विद्यालय, कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश क्षमतेपेक्षा जादा प्रवेश होत असल्याच्या तक्रारी शिक्षण विभागास प्राप्त झाल्या आहेत. या पार्श्‍वभूमीवर आता शिक्षण विभागाकडून उच्च माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयांची तपासणीच्या माध्यमातून झाडाझडती होणार आहे.  

उच्च माध्यमिक विद्यालय, कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थी प्रवेश घेऊन क्लासला जातात, अशी ओरड होते. शिक्षण विभागाने याबाबत कडक पाऊले उचलली आहेत. प्राप्त तक्रारींच्या अनुषंगाने कार्यवाही करण्याचे निेर्देश शिक्षण विभागाच्या सहसचिव डॉ. सुवर्णा खरात यांनी दिले आहेत. 

महापालिका क्षेत्रातील जवळच्या ग्रामीण भागातील परिसरातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्रवेश क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थी प्रवेशित झाले आहेत किंवा कसे, हे तपासण्यासाठी विभागीय शिक्षण उपसंचालक, माध्यमिक शिक्षणाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली चार भरारी पथके स्थापन करण्यात आली आहेत. यात तीन प्राचार्यांचा समावेश 
आहे. 

भरारी पथक भेटी देऊन ज्या कनिष्ठ महाविद्यालय, उच्च माध्यमिक विद्यालयात प्रवेश क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थ्यांना प्रवेश दिला आहे, अशांची यादी शिक्षण उपसंचालकांना सादर करतील. त्यानंतर ही यादी शासनाकडे पाठविली जाणार आहे. सर्व उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांनी त्यांची माहिती दि. 30 सप्टेंबरपर्यंत ‘सरल’ मध्ये अपडेट करणे आवश्यक आहे. 

मंजूर प्रवेश क्षमता, प्रवेशित विद्यार्थी संख्या आणि विद्यार्थ्यांची सरलमधील माहिती विचारात घेऊनच राज्य मंडळाकडून बारावी परीक्षेचे अर्ज स्वीकारले जातील. शिक्षण विभागाच्या सूचना, निर्देशाप्रमाणे कार्यवाही न करणार्‍या उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांवर कारवाई करण्यात येणार आहे.