Mon, Jul 22, 2019 05:02होमपेज › Kolhapur › जिल्ह्यात ‘एसीबी’चा दे धक्का!

जिल्ह्यात ‘एसीबी’चा दे धक्का!

Published On: May 18 2018 1:21AM | Last Updated: May 17 2018 11:36PMकोल्हापूर : दिलीप भिसे

टेबलाखालून विनासायास, घसघशीत ‘कमाई’ला सोकावलेल्या ‘झारीतल्या शुक्राचार्यां’ना कायद्याची भीती राहिली नाही की, होणार्‍या परिणामांचे गांभीर्य राहिले नाही. अधिकाराचा गैरवापर आणि शॉर्टकट मार्गाने संपत्तीच्या राशी रचणार्‍या सरकारी बाबूविरुद्ध ‘एसीबी’ने जिल्ह्यात ‘दे धक्का’ तंत्र अवलंबिले आहे. गतवर्षात लाचखोरीत अव्वल राहिलेल्या महसूल विभागातील अनेक बड्या बाबूंना यंदाही जोरात झटका दिल्याने प्रशासनावर नामुष्की ओढावत आहे की काय?

लाचखोरीच्या कारवाईत पश्‍चिम महाराष्ट्रात कोल्हापूरसह सांगलीचा क्रम अव्वल ठरतो आहे. महसूल, पोलिस, शिक्षण, कृषी, उद्योग, ऊर्जा, उच्च व तंत्रशिक्षण, जिल्हा परिषद, नगरपालिका या विभागांतर्गत झारीतील अनेक शुक्राचार्य लाचलुचपत प्रतिबंधात्मक पथकाच्या जाळ्यात अलगद सापडले आहेत.

आर्थिक पिळवणुकीचा कळस

अधिकाराचा गैरवापर करून सर्वसामान्यांना खिंडीत गाठून आर्थिक पिळवणुकीचे प्रकार वाढीला लागले आहेत. महसूल आणि पोलिस दलात आर्थिक छळवणुकीच्या घटना प्रकर्षाने जाणवतात. भरभक्क्म वजन ठेवल्याशिवाय फाईलीला हात लावायचे नाही, अशीच नीती सरकारी कचेर्‍यात दिसून येते. पन्हाळा येथील दुय्यम निबंधकाच्या कचेरीत घडलेली घटना खाबूगिरीचेच उदाहरण म्हणावे लागेल.

पन्हाळा कार्यालयच लाचखोरीत!

पन्हाळा कार्यालयातील अधिकार्‍यापासून शिपायापर्यंत पंटरच्या साखळीला ‘एसीबी’ने रंगेहाथ पकडून कोठडीत बंद केले. अख्खं कार्यालय लाचखोरीत सापडल्याने घटनेची राज्यभर चर्चा होऊनही महसूल यंत्रणेने कोणताही धडा घेतल्याचे दिसून येत नाही. त्यातच आज पुन्हा कागल येथील तहसीलदार किशोर घाडगे, तलाठी मनोज भोजे (एकोंडी), श्रीमती शमशाद मुल्ला (सुळकूड) या तिघांना ‘एसीबी’ने रंगेहाथ पकडल्याने प्रशासनावर मोठी नामुष्की ओढावली आहे.

लाचखोरी वाढता वाढे...

गतवर्षात ‘एसीबी’ने महसूल (10), पोलिस (5), नगरविकास (4), ग्रामविकास (3), शिक्षण (3), उद्योग, ऊर्जा (1) तर चालू जानेवारी ते 17 मे अखेर महसूल (10), पोलिस (2), कृषी (1) खात्यांतर्गत अधिकारी, कर्मचारी लाचखोरीच्या जाळ्यात सापडले आहेत.

2017 मध्येही लाचखोरीत महसूल विभाग आघाडीवर!

श्रीमती स्मिता रघुनाथ कुपटे, शिवाजी कोंडिबा सकटे, सागर संभाजी लोहार, सुनील महादेव भंडारे, अवधूत उत्तम रानभरे, सुशील विठ्ठल माने, श्रीमती लक्ष्मी ज्ञानू वगरे, श्रीमती अनुराधा हावळ, अशोक अर्जुन बसवणे, शिवाजी तुकाराम सुतार, मिलिंद रामचंद्र कांबळे.

लाचप्रकरणी ‘महसूल’मधील  जेरबंद अधिकारी, कर्मचारी

राजेश आप्पासाो माळी (तलाठी सज्जा चोकाक), नितीन दादासाहेब कांबळे (चोकाक), प्रदीप शिवाजीराव कदम (डेप्युटी चिटणीस, जिल्हाधिकारी कार्यालय), भीमराव कृष्णा मगदूम (तलाठी, जरळी, ता.गडहिंग्लज), यशवंत सदाशिव चव्हाण (दुय्यम निबंधक, पन्हाळा), गीता पांडुरंग बोटे (लिपिक, दुय्यम निबंधक,पन्हाळा), प्रकाश यशवंत सणगर (शिपाई, दुय्यम निबंधक,पन्हाळा), नितीन कोंडिबा काटकर (संगणक तंत्रज्ञ), सुशांत दत्तात्रय वणिरे (शिवाजी पेठ), शहाजी बळवंत पाटील (उत्रे, पन्हाळा).