Sun, May 26, 2019 18:39होमपेज › Kolhapur › ...प्रसंगी तडीपारीची कारवाई होणार

...प्रसंगी तडीपारीची कारवाई होणार

Published On: Mar 06 2018 12:38AM | Last Updated: Mar 06 2018 12:18AMकोल्हापूर : सचिन टिपकुर्ले 

कायद्याला न जुमानता गुटखा, सुगंधी तंबाखू व सुगंधी सुपारीची विक्री करणार्‍या उत्पादकांवर आता तडीपारीची कारवाई होऊ शकते. अन्‍न औषध प्रशासनाने कोल्हापूर  जिल्ह्यातील दहा जणांची नावे वरिष्ठ कार्यालयाला पाठवली आहेत. 

राज्यात काही पदार्थांच्या उत्पादन व विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे.  अन्‍न औषध प्रशासनाच्या वतीने शरिराला अपायकारक अशा वस्तूंची यादी तयार करून त्यांच्या उत्पादनावर बंदी घालण्यात आली आहे. अशी प्रतिबंधीत पदार्थांचे उत्पादन करणार्‍यांवर या विभागाकडून कडक  कारवाई केली जाते; पण या कारवाईला न जुमानता राजरोस अनेक ठिकाणी प्रतिबंधात्मक वस्तूंचे उत्पादन  केले जात आहे. 

अन्‍न औषध प्रशासनाच्या वतीने असे उत्पादन करणार्‍यांच्या विरोधात न्यायालयात खटले चालवले जात आहेत. न्यायालयीन प्रक्रिया सुरू असतानाच यातीलच काही लोक अन्य ठिकाणी अशाच प्रकारचे बेकायदेशीर पदार्थांचे उत्पादन करीत आहेत.  अलीकडेच इचलकरंजी येथील चंदूर गावात गुटख्याचे बेकायदेशीर उत्पादन करणार्‍यांवर अन्‍न औषध प्रशासनाने कारवाई केली. या कारवाईत सापडलेल्या आरोपींवर यापूर्वीही कारवाई झाल्याचे  प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले होते. असे असतानाही संबंधिताकडून बेकायदेशीर गुटख्याचे उत्पादन सुरूच होते. 

जिल्ह्यात अजूनही छुप्या पद्धतीने सुगंधी सुपारी व सुगंधी तंबाखूचे बेकायदेशीर उत्पादन सुरू आहे. त्याची विक्रीही राजरोसपणे सुरू आहे. यापूर्वी विविध पक्ष व संघटनांनी अन्‍न औषध प्रशासनाच्या विरोधात आंदोलन करून बेकायदेशीर गुटखा उत्पादन करणार्‍यांवर कारवाई करण्याची मागणी केली होती. परंतु, वारंवार कारवाई करूनही पुन्हा अशा बेकायदेशीर पदाथार्र्चे उत्पादन करणार्‍यांना तडीपारीची शिक्षा होऊ शकते. कोल्हापूर विभागाने अशा दहा जणांची नावे वरिष्ठ कार्यालयाला पाठवली आहेत. त्यांच्या मान्यतेनंतर संबंधितावर कारवाई होऊ शकते. यामुळे किमान असे बेकायदेशीर उत्पादन करणार्‍यांवर शासनाचा वचक बसेल.

कोल्हापूर शहर व जिल्ह्यात शासनाने प्रतिबंध घातलेली उत्पादने केली जाऊ नयेत यासाठी या विभागाच्या वतीने योग्य ती दक्षता घेण्यात आली आहे. यापूर्वी अशा उत्पादकांवर कारवाई केली आहे; पण त्यातूनही त्यांच्याकडून उत्पादन होत असेल तर नवीन कायद्याने त्यांच्यावर तडीपारीची कारवाई होऊ शकते. वरिष्ठांच्या आदेशानंतर प्रांत अधिकार्‍यांमार्फत ही प्रक्रिया केली जाणार आहे.    - सुकुमार चौगुले, सहायक आयुक्‍त अन्‍न औषध विभाग