Mon, Jun 17, 2019 05:07होमपेज › Kolhapur › पीक पेर्‍याची होणार अचूक नोंदणी

पीक पेर्‍याची होणार अचूक नोंदणी

Published On: Jul 23 2018 1:08AM | Last Updated: Jul 23 2018 12:43AMकोल्हापूर : डी. बी. चव्हाण

पेरणीचे सूक्ष्म नियोजन व त्याच्या खर्चाचे अचूक संकलन होण्यासाठी गावनिहाय गट स्थापना करण्याच्या सूचना  राज्य कृषिमूल्य आयोगाने शासनाला दिल्या आहेत. यामुळे कोणत्या पिकाचे किती उत्पादन होणार आणि शेतकरीनिहाय प्रत्येक पिकाच्या उत्पादनाला किती खर्च आला, याची अचूक माहिती आयोगाला मिळणार आहे. ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पंधरा दिवस हा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. 

पीक पेर्‍याच्या खर्चाचे अचूक संकलन होण्यासंदर्भात कृषिमूल्य आयोगाने राज्यात तीन ठिकाणी विविध विषयांवरील तज्ज्ञांच्या बैठक घेतल्या. या बैठकीत तज्ज्ञांनी मांडलेली मते आणि त्यातून निघालेला निष्कर्ष  यासंदर्भात आयोगाने राज्य शासनाला काही सूचना केल्या. शासनाने या सूचनांनुसार पुढील कार्यवाही करण्यासाठी कृषी विभागाला आदेश दिले आहेत. त्यासाठी गावनिहाय गाव नमुना पत्रक व नमुना 12 पत्रक अशी दोन पत्रके तयार करून पेरलेल्या पिकाचा प्रकार व आंतरपीक याची अचूक नोंदी घेण्याचे सांगण्यात आले आहे. त्यासाठी प्रत्येक गावनिहाय स्वतंत्र गट स्थापना करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. याची जबाबदारी जिल्हाधिकारी व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्यावर सोपवण्यात आली आहे. तसेच कृषी विभागाच्या क्षेत्रीय कर्मचार्‍यांनी तलाठ्यांना मदत करून या नोंदी करावयाच्या आहेत. या कामासाठी कर्मचार्‍यांची कमतरता भासू लागली तर कृषी विद्यापीठाच्या चतुर्थ वर्षाच्या विद्यार्थ्यांची मदत घ्यावी, अशी सूचनाही करण्यात आली.

 हे काम ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पूर्ण करून त्याची जमा केलेली माहिती गाव नमुना बारामध्ये भरून याची आयोगाकडे ऑनलाईन नोंद करावयाची आहे. जिल्हाधिकार्‍यांनी या कामाची देखरेख ठेवून प्राप्त माहिती मंडल, तालुका व जिल्हास्तरावर पीकनिहाय विविध खात्यांना द्यावी, अशी सूचनाही करण्यात आली आहे.