Tue, Feb 18, 2020 05:27होमपेज › Kolhapur › अल्पवयीन मुलांकडे वाहने देण्याची हौस नडली

अल्पवयीन मुलांकडे वाहने देण्याची हौस नडली

Published On: Mar 15 2018 1:18AM | Last Updated: Mar 15 2018 1:03AMकोल्हापूर : प्रतिनिधी

अल्पवयीन मुलांकडे दुचाकी, चारचाकी वाहने देण्याची हौस पाच पालकांना बुधवारी महागात पडली. न्यायालयाने संबंधित पालकांना कोर्ट उठेपर्यंत शिक्षा व प्रत्येकी एक हजार रुपये दंड ठोठावला. कारवाईची मोहीम आणखी तीव्र करण्याच्या सूचना वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांनी जिल्ह्यातील पोलिस यंत्रणेला दिल्या आहेत.

अल्पवयीन मुलांना वाहने देण्याच्या प्रकारामुळे शहरासह जिल्ह्यात अपघातांच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. अशा घटनांमध्ये अनेक लहान मुले जायबंदी झाल्याचे एका पाहणीत आढळून आल्याने विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे- पाटील, पोलिस अधीक्षक संजय मोहिते यांनी बुधवारपासून शहर व जिल्ह्यात कारवाईचे आदेश दिले होते. त्यानुसार पाच पालकांना ताब्यात घेऊन त्यांना नोटिसा देण्यात आल्या होत्या.

मुख्य न्यायदंडाधिकार्‍यांसमोर पाचही पालकांना हजर करण्यात आले असता, त्यांना कोर्ट उठेपर्यंत शिक्षा व प्रत्येकी एक हजार रुपये दंड ठोठावला. या गुन्ह्यात 3 महिने शिक्षा होऊ शकते,अशी न्यायालयाने संबंधित पालकांना समज दिली. दरम्यान, वाहतूक अधिनियम कायद्याचे उल्लंघन करणार्‍या 350 वाहनधारकांवर जिल्ह्यात कारवाई करून 72 हजार 700 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे, असे शहर वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक अशोक धुमाळ यांनी सांगितले.