Sat, Jul 20, 2019 21:20होमपेज › Kolhapur › पोलिसांमुळेच वाढतोय महामार्गावर अपघाताचा धोका

पोलिसांमुळेच वाढतोय महामार्गावर अपघाताचा धोका

Published On: Apr 18 2018 1:42AM | Last Updated: Apr 17 2018 11:35PMकागल : प्रतिनिधी

महाराष्ट्र - कर्नाटक सीमेवर दुधगंगा नदीजवळ चौपदरी महामार्गावर अतिशय धोकादायक ठिकाणी उजळाईवाडी महामार्ग पोलिस स्टेशनच्या पोलिस पथकांकडून भरधाव वाहनांच्या तपासणीची मोहीम दररोज सुरू आहे. त्यामुळे महामार्गावर वाहतुकीची कोंडी होऊन अपघाताचा धोका वाढला आहे. 

यापूर्वी तपासणीसाठी थांबविण्यात आलेल्या वाहनांना ठोकरून अपघात झाले आहेत. तरीदेखील फारशी दखल घेण्यात आली नाही. कोल्हापुरात अंबाबाई, जोतिबा, कणेरी मठावर येणार्‍या भाविकांची अडवणूक  पोलिसांकडून करण्यात येत आहे. तसेच स्थानिक शेतकर्‍यांना, नागरिकांना देखील याचा होत आहे, त्यामुळे वाहनधारक हैराण झाले आहेत.

गेल्या अनेक वर्षांपासून पोलिस पथकांकडून वाहनांची नियमित तपासणी केली जाते. तरीदेखील या पथकाला अद्याप फारसे यश आले नाही. कर्नाटकातील कोगनोळी टोल नाक्यापासून ते उजळाईवाडी पोलिस स्टेशनपर्यंत आठ ठिकाणी वाहनांना तपासणीसाठी तोंड द्यावे लागत आहे. या सर्व प्रकारामुळे महामार्गावर वाहतुकीची कोंडी होऊन अपघात वाढत आहेत. 

थांबविण्यात आलेल्या वाहनाच्या कागदपत्रांची तपासणी करण्याकरिता वाहनांच्या रांगा लागलेल्या असतात. थांबविलेल्या वाहनांमधून घाईने कागदपत्रे घेऊन चालक पळत येत असतात. त्यांची कागदपत्रे तपासणीचे काम बराच वेळ सुरू राहते. काहींना दंड आकारला जातो तर काहींना सोडून दिले जाते. दंडाची रक्‍कम ठेवण्यासाठी खास लाकडी पेटी सरकारी गाडीच्या बॉनेटवर ठेवलेली असते. इशारा करूनही न थांबणार्‍या वाहनाचा पाठलाग केला जातो. असा हा प्रकार दिवसभर महामार्गावरच सुरू असतो. त्यामुळे वाहतुकीची कोंडी निर्माण होते. याकडे कोणाचेच लक्ष नसते शिफ्टनुसार पोलिस कर्मचारी थांबलेले असतात.

शेतातून भाजीपाला व इतर माल आणणार्‍या स्थानिक शेतकर्‍यांना, शेताकडून येणार्‍या मोटारसायकल स्वारांना, कर्नाटकातून देवदर्शनाासाठी महाराष्ट्रात येणार्‍या भाविकांना, नातेवाईकांकडे आणि इतर कामासाठी  जाणार्‍या स्थानिक नागरिकांची अडवणूक केली जात आहे. याबाबत कोणी विचारणा केली तर त्यांना कायद्याची भीती दाखविली जात असते. या सर्व प्रकारामुळे लोक हैराण झाले आहेत. याकडे वरिष्ठ पोलिस अधिकारी यांनी लक्ष देण्याची मागणी होत आहे.

पोलिस नामानिराळेच!

उजळाईवाडी महामार्ग पोलिस स्टेशनचे पोलिस पथक कागल जवळ दिवसभर थांबून वाहनांची तपासणी करीत असते. ज्या ठिकाणी तपासणी करण्यासाठी पोलिस पथक थांबलेले असते. त्या ठिकाणी यापूर्वी अनेक वेळा अपघात झालेले आहेत. कर्नाटकातून कोगनोळी नाका पास करून वाहने भरधाव वेगाने महाराष्ट्रात येत असतात. दुधगंगा नदी ओलांडल्यानंतर लगेचच पोलिस पथकाकडून तपासणी करता वाहने थांबविली जातात. वेगाने येणार्‍या वाहनांना लगेचच पोलिस असल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे एकमेकांना ठोकर देऊन थांबतात. यापूर्वी असे प्रकार अनेक वेळा घडले आहेत. मात्र, याची अधिक वाच्यता होऊ नये म्हणून आपापसांत प्रकरणे मिटवून पोलिस नामानिराळे राहिले आहेत.

 

Tags : kolhapur, kolhapur news, Accident, highway,