जिल्हा बँकेकडून शेतकर्‍यांचा 2 लाखांचा अपघात विमा

Last Updated: Jun 06 2020 1:10AM
Responsive image
File Photo


कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने 85 वर्षे वयापर्यंतच्या जिल्ह्यातील सर्व विकास सेवा संस्थांच्या सर्व सभासद शेतकर्‍यांना दोन लाख रुपये भरपाई देणारा व्यक्तिगत अपघाती विमा उतरला आहे. या विम्याच्या हप्त्याची 91 लाखांची रक्कम जिल्हा बँक नफ्यामधून भरणार असल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष व ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.

जिल्हा बँकेच्या मुख्य कार्यालयात  मंत्री मुश्रीफ आणि संचालक मंडळाच्या हस्ते विमा कंपनीला धनादेश देण्यात आला. याबाबत बँकेने दिलेली माहिती अशी की, या योजनेबाबत वृत्तपत्रांमध्ये जाहिराती देऊन स्पर्धात्मक निविदा मागवल्या होत्या. 85 वर्षे वयापर्यंत विमा सुरक्षा देणारी भारती एक्सा जनरल इन्श्युरन्स कंपनी ही पुढे आली. वयाने जादा असलेल्या शेतकर्‍यांना याचा अधिक फायदा होईल,  या उद्देशाने संचालक मंडळाने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. विमा कंपनीला धनादेश देऊन सुरुवात केलेली आहे, मुदत एक वर्षापर्यंत आहे. 

गेल्या आर्थिक वर्षातील 135 कोटी नफ्यातून बँकेने ही योजना आणली. अतिवृष्टी व महापूरबाधित शेतकर्‍यांना व महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अनुक्रमे सात व सहा महिन्यांच्या व्याजाची 16 कोटी रुपये व्याजाची रक्कम बँक भरणार आहे. उसाशिवाय भात, सोयाबीन, भुईमूग, कापूस आदी पिकांसाठी कर्ज घेतलेल्यांना रुपये एक लाखापर्यंतच्या कर्जास व्याज माफ आहे. एक लाखापासून तीन लाखांपर्यंत कर्जाला फक्त दोन टक्के व्याज आकारणी केली जाते. शेतकर्‍यांचे हे व्याजही कोरोना महामारीमुळे बँकच भरणार आहे. म्हणजेच इतर पिकांच्या कर्जदार शेतकर्‍यांना दोन वर्षे व्याज भरावे लागणार नाही.

यावेळी बँकेचे संचालक आ. राजेश पाटील, माजी खासदार श्रीमती निवेदिता माने, भैया माने, असिफ फरास, सर्जेराव पाटील-पेरिडकर, पी. जी. शिंदे, विलासराव गाताडे, अनिल पाटील, उदयानीदेवी साळोखे, बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ए. बी. माने, जी. एम. शिंदे आदी उपस्थित होते.