Fri, Mar 22, 2019 05:44
    ब्रेकिंग    होमपेज › Kolhapur › आव्हानांचे शिवधनुष्य पेलणार : अभिनव देशमुख 

आव्हानांचे शिवधनुष्य पेलणार : अभिनव देशमुख 

Published On: Aug 05 2018 1:29AM | Last Updated: Aug 05 2018 12:53AMकोल्हापूर : प्रतिनिधी

शांतता-सुव्यवस्था अबाधित ठेऊन संघटित गुन्हेगारीची पाळेमुळे उखडून टाकण्यासाठी प्रयत्न केले जात असतानाच समाजातील सर्वच घटकांच्या हितासाठी आव्हानांचे शिवधनुष्य निश्‍चित प्रभावीपणाने पेलू शकेन यात शंका नाही, असा ठाम विश्‍वास नूतन पोलिस अधीक्षक अभिनव देशमुख यांनी शनिवारी व्यक्त केला. ज्येष्ठ पुरोगामी नेते कॉ. गोविंद पानसरे हत्येप्रकरणी चौकशीची व्याप्ती वाढविण्यात येईल, असेही ते म्हणाले. 

मावळते पोलिस अधीक्षक संजय मोहिते यांची नाशिक येथे पदोन्नतीवर बदली झाल्याने डॉ.  देशमुख यांची कोल्हापूरच्या पोलिस अधीक्षकपदी नियुक्ती झाली आहे.  शनिवारी सकाळी मोहिते यांच्याकडून त्यांनी पदभार स्वीकारला. यावेळी पत्रकारांशी डॉ. देशमुख बोलत होते. 

पोलिस दलात कार्यरत असताना कमी वयात कोल्हापूरला पोलिस अधीक्षक पदावर काम करण्याची संधी मिळाली आहे.  ऐतिहासिक, सामाजिक व पुरोगामी चळवळीचा वारसा लाभलेल्या कोल्हापूरची जगभरात ख्याती आहे. राजर्षी शाहू महाराजांच्या जिल्ह्यात नशिबाने संधी मिळाली आहे. विश्‍वासाला पात्र राहून संधीचे सोने करण्याचा आपला प्रयत्न राहील, असेही ते म्हणाले.

गुंडागर्दीला थारा नाही, काळे धंदेवाल्यांना हद्दपार करणार
पोलिस ठाण्यात येणार्‍या समाजघटकांना सन्मानाने वागणूक मिळावी, यावर प्राधान्याने भर असेल, असे स्पष्ट करून डॉ. देशमुख म्हणाले, शांतता सुव्यवस्थेला सर्वोच्च प्राधान्य देत असताना गुंडागर्दीला थारा मिळणार नाही याची खबरदारी घेतली जाईल, संघटित टोळ्यांविरुद्ध कठोर कारवाईचा पवित्रा राहील. काळेधंदे, तस्करी टोळ्यांना निश्‍चित हद्दपार केले जाईल.

शहर, ग्रामीण भागात स्वत: गस्त घालणार
तत्कालीन पोलिस अधीक्षक संजय मोहिते यांनी दीड वर्षात गुन्हेगारी टोळ्यांविरुद्ध केलेल्या कारवाईची मोहीम यापुढेही तीव्र केली जाईल, असे स्पष्ट करून ते म्हणाले, समाजात अस्थिरता निर्माण करणार्‍या समाजकंटकांवर पोलिसांचा वचक राहील. प्रसंगी कठोर कारवाईचा बडगा उगारला जाईल. घरफोडी, जबरी चोरी, चेनस्नॅचिंग, दरोड्याच्या गुन्ह्यांना निश्‍चित आळा बसेल. रात्रंदिवस नाकाबंदी, वाहन तपासणी मोहीम सुरू केली जाईल, महामार्गासह प्रमुख चौकांत पेट्रोलिंग दिसेल. शहर, ग्रामीण भागात आपण स्वत:च रात्रीची गस्त सुरू करणार आहे, असेही ते म्हणाले. पोलिस दलातील लाचखोरीच्या घटना रोखण्यासाठी ठोस प्रयत्न करण्यात येतील, असेही ते म्हणाले.

यंत्रणेला विश्‍वासात घेऊन आव्हान पेलणार
शांतता-सुव्यवस्थेच्या अनुषंगाने पोलिस दलासमोर अनेक आव्हाने आहेत, याची जाणिव आहे. अधिकारी, कर्मचार्‍यांना विश्‍वासात घेऊन निर्माण होणार्‍या आव्हानांना पोलिस दल समोरे जाईल, आव्हानांचे शिवधनुष्य निश्‍चितपणे पेलू, यावर आपला विश्‍वास आहे, असेही ते म्हणाले.

पानसरे हत्या : कर्नाटक ‘सीआयडी’च्या संपर्कात
कॉ. गोविंद पानसरे हत्येचा तपास एसआयटी यंत्रणेमार्फत सुरू आहे. अद्यापही दोन संशयितांसह महत्त्वाचे पुरावे यंत्रणेच्या हाती लागले नाहीत. यावर पत्रकारांनी विचारले असता, ते म्हणाले, दोन-तीन दिवसांत तपासाचा आढावा घेण्याचा प्रयत्न आहे. तपासाची व्याप्ती वाढविण्यासाठी प्रयत्न केले जातील. त्यासाठी कर्नाटक सीआयडीच्या वरिष्ठाधिकार्‍यांशी संपर्क साधण्यात येईल.

जिल्ह्यातील पोलिस ठाण्यात स्वागत कक्ष उभारणार
पोलिस ठाण्यात कामासाठी येणार्‍या नागरिकांना सन्मानपूर्वक वागवणूक मिळावी, लवकरात लवकर न्याय देण्याचा प्रयत्न व्हावा, यासाठी पोलिस ठाण्यांतर्गत स्वागतकक्ष उभारण्याचा प्रयत्न आहे.
शाळा, कॉलेज युवतींची छेडछाडीविरुद्ध जिल्ह्यात विशेष मोहीम राबविण्यात येईल. अशा घटना घडणार नाहीत, याची दक्षता घेण्याबाबत अधिकार्‍यांना
सूचना देण्यात येतील, असेही ते म्हणाले.

कोल्हापूरकरांनी भरभरून प्रेम, जिव्हाळा दिला
ज्या कोल्हापुरात वाढलो, शिकलो, त्याच ठिकाणी पोलिस अधीक्षक या नात्याने दीड वर्षे सेवा केली, असे सांगून मावळते पोलिस अधीक्षक संजय मोहिते म्हणाले, आपण स्वत:ला अतिशय नशीबवान समजतो. फार लोकांच्या आयुष्यात ही संधी येते. अनेक कठीण प्रसंगात कोल्हापूरची जनता पोलिसांच्या मदतीला धाऊन आल्याने शांतता-सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण झाला नाही. कोल्हापूरकरांनी केलेल्या अलोट प्रेमामुळे आणि जिव्हाळ्यामुळे आपणाला समाधानाने काम करता आले. आठवणीचे ओझे खांद्यावर घेऊन नाशिकला रवाना होताना मन भरून येते.