Fri, Nov 16, 2018 01:06होमपेज › Kolhapur › कुरूंदकरच्या फार्म हाऊसवर छापा

कुरूंदकरच्या फार्म हाऊसवर छापा

Published On: Mar 05 2018 1:42AM | Last Updated: Mar 05 2018 12:18AMआजरा : प्रतिनिधी

सहायक पोलिस निरीक्षक अश्‍विनी बिंद्रे-गोरे यांच्या हत्येप्रकरणी नवी मुंबई गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने रविवारी पोलिस निरीक्षक अभय कुरूंदकर याच्या हाळोली (ता. आजरा) येथील फार्म हाऊसवर छापा टाकला. कुरूंदकरचा चालक व गुन्ह्यातील आणखी एक संशयित कुंदन भंडारीला सोबत घेऊन टाकलेल्या छाप्यामध्ये गुन्ह्याशी संबंधित महत्त्वपूर्ण माहिती हाती लागल्याचे समजते.

अश्‍विनी बिंद्रे-गोरे यांच्या  हत्येप्रकरणातील संशयित आरोपी कुरूंदकरचा येथील मित्र महेश फळणीकर याचा सहभाग स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी आजरा परिसरावर तपास केंद्रित केला आहे. हाळोली येथील कुरूंदकर याच्या फार्म हाऊसवर बिंद्रे यांच्यासह कुरूंदकर व त्याच्या मित्रपरिवाराचे येणे-जाणे होते. बिंद्रे-गोरे यांच्या हत्येनंतर त्यांच्या मृतदेहाचे तुकडे करण्यासाठी वापरलेला कटर आजरा येथूनच उपलब्ध करण्यात आल्याचा पोलिसांचा संशय आहे. आजरा परिसरातच गुन्ह्यातील काही पुराव्यांची विल्हेवाट लावल्याचे पुढे येत असल्याने पोलिसांनी कुरूंदकरचा चालक कुंदन भंडारी याच्यासोबत फार्म हाऊसवर छापा टाकून कसून झडती घेतली.

सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास टाकलेल्या या छाप्यामध्ये महत्त्वाची माहिती मिळाली असल्याने या प्रकरणाच्या पुढील तपासाचा उलगडा होण्यास मदत होणार असल्याचे पोलिस अधिकार्‍यांनी सांगितले. ज्या ठिकाणी कुरूंदकरचे फार्म हाऊस आहे, तेथे हत्तीचा वावर असल्याने फारसे कोणी फिरकत नाही. बिंद्रे-गोरे खूनप्रकरणी आजरा येथील आणखी दोघांवर लक्ष केंद्रित करण्यात आले असून त्यादिशेनेही तपास करण्यात येत आहे. खुनाच्या प्रकरणाचा उलगडा झाल्यानंतर रजेवर असताना कुरूंदकर आजरा येेथे आला होता. त्यावेळीही नवी मुंबई पोलिसांनी परस्पर त्याच्या फार्म हाऊसला भेट देऊन कुलूप तोडून आवश्यक ती माहिती घेतल्याचे रविवारी स्थानिक शेतकर्‍यांनी सांगितले.

छाप्याबाबत गोपनीयता

नवी मुंबई पोलिसांनी कुरूंदकर याच्या फार्म हाऊसवर टाकलेल्या छाप्याबाबत अत्यंत गोपनीयता पाळण्यात आली. स्थानिक पोलिसांनाही फार्म हाऊसवरून पोलिस परतल्यानंतर या छाप्याची माहिती मिळाली. पथकामध्ये दोन पोलिस उपनिरीक्षकांसह पाच जणांचा समावेश होता.