Thu, Apr 25, 2019 22:04होमपेज › Kolhapur › वर्षभरानंतरही अनेकांना कर्जमाफीची प्रतीक्षाच

वर्षभरानंतरही अनेकांना कर्जमाफीची प्रतीक्षाच

Published On: Jun 22 2018 2:08AM | Last Updated: Jun 22 2018 12:30AMकोल्हापूर ः प्रतिनिधी 

भाजप-शिवसेना सरकारने 22 जून 2017 रोजी शेतकर्‍यांसाठी ‘छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजना 2017’ जाहीर केली. 1 लाख 50 हजार रुपये थकीत असणार्‍यांना कर्ज माफ, तर नियमित कर्ज भरणार्‍यांना कमीत कमी 15 हजार व जास्तीत जास्त 25 हजार रुपयांपर्यंत अनुदान देण्याचे जाहीर केले होते. जिल्ह्यातील 1 लाख 68 हजार 204 शेतकर्‍यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला आहे. वर्षपूर्तीनिमित्त जिल्ह्यातील शेतकरी कर्जमाफीचा घेतलेला हा आढावा...

राज्य शासनाच्या कर्जमाफी योजनेत पहिल्या टप्प्यात अर्ज केलेल्या 3 हजार 913 शेतकर्‍यांची यादी तपासणीसाठी तालुकास्तरीय कमिटीकडे प्राप्त झाली आहे. यापूर्वीही पहिल्या टप्प्यातच अर्ज केलेल्या 2,438 शेतकर्‍यांची यादी तपासणीसाठी दिली होती. या दोन्ही याद्यांतील शेतकर्‍यांची माहिती जिल्हा बँकेने यापूर्वीच दिली असल्याने येत्या दोन दिवसात या यादींची तपासणी पूर्ण होण्याची शक्यता आहे.  याशिवाय 2,434 शेतकर्‍यांची आणखी यादी तपासणीसाठी आली आहे. या यादीतील शेतकर्‍यांची जिल्हा बँकेकडील माहिती भरल्यानंतर  तपासणी होणार आहे. पहिल्या टप्प्यात दोन्ही याद्यांची तपासणी झाल्यानंतर या याद्या वित्त विभागाकडे पाठविण्यात येणार आहेत. या तिन्हीही यादींतील शेतकर्‍यांच्या खात्यावर 25 जूनपर्यंत कर्जमाफीची रक्कम जमा होण्याची शक्यता आहे.  कर्जमाफी योजनेत जिल्ह्यातील 2 लाख 57 हजार शेतकर्‍यांनी अर्ज  केले आहेत. आतापर्यंत यापैकी 1 लाख 68 हजार 204  शेतकर्‍यांना कर्जमाफी झाली आहे. अजून या योजनेतील 95 हजार शेतकरी कर्जमाफीच्या प्रतीक्षेत आहेत. 

राधानगरी तालुका

नियमित कर्जदारांसाठी शासनाने जाहीर केलेल्या प्रोत्साहनपर कर्जमाफी योजनेतील लाभार्थी निवडीचा घोळ अद्यापही सुरूच आहे. गेल्या वर्षभरात 17 हजार 56 खातेदारांना 28 कोटी 77 लाख रुपयांची कर्जमाफी मिळाली आहे. तर 6,854 शेतकरी अपात्र ठरले आहेत. तालुक्यातून 24,600 अर्ज दाखल झाले होते. त्यापैकी 14,437 लाभार्थ्यांना 20 कोटी 57 लाख रुपयांची कर्जमाफी मिळाली आहे. ही रक्कम संबंधितांच्या बँक खात्यावर वर्ग झाली आहे. 1,700 खातेदार कर्जमाफीस पात्र ठरूनही त्यांच्या खात्यावर अद्याप पैसे जमा झालेले नाहीत.

कर्जमाफीतील याद्यांमध्ये घोळ उडून असंतोष निर्माण झाल्यानंतर शासनाने दि. 1 एप्रिल 2009 ते 31 मार्च 2016 च्या दरम्यान केलेले कर्जवाटप आहे. मात्र, 30 मार्च 2016 व 31 जुलै 2017 पर्यंत थकबाकीत असणार्‍या दीड लाख रुपयांपर्यंतच्या कर्जासाठी माफी योजना जाहीर केली होती. यांतर्गत 2,548 खातेदारांना 7 कोटी 42 लाख रुपये माफ झाले असून, ही रक्कम संबंधित सेवा संस्थांच्या खात्यावर वर्ग झाली आहे. शासनाने थकीत कर्जासाठी वन टाईम सेटलमेंट योजनाही लागू केली होती. या योजनेंतर्गत दीड लाख रुपयांपर्यंतचे कर्जमाफ केले जाणार होते. त्यापेक्षा अधिक रक्कम संबंधित कर्जदाराने भरल्यानंतर शासन दीड लाख रुपये माफ करणार होते. यांतर्गत 71 कर्जदारांना 78 लाख रुपये माफ झाले आहे.

कर्जमाफीची वर्षपूर्ती झाली, तरी अद्याप याद्यांचा घोळ सुरूच आहे.  तालुक्यातील अनेक शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहिले आहेत. तालुक्यात बहुतांशी शेतकरी हे अल्प व अत्यल्प भूधारक आहेत. ते दरवर्षी नियमितपणे कर्जफेड करतात. मात्र, ते या कर्जमाफीपासून पूर्णपणे वंचित राहिले आहेत. त्यामुळे त्यांच्यात मोठा असंतोष आहे. तर अनेक शेतकर्‍यांनी कागदपत्रांचे झंझट नको म्हणून कंटाळून कर्जमाफीकडे पाठच फिरवली होती. 

सरसकट अनुदानाची मागणी

नियमित कर्जफेड करणारे शेतकरीच कर्जमाफीपासून वंचित राहिले आहेत. त्यामुळे अशा कर्जमाफीऐवजी प्रत्येक खातेदार शेतकर्‍याला प्रतिएकरी अनुदानरूपी कर्जमाफी करण्याची मागणी होत आहे.

शिरोळ तालुका 35.35 कोटी माफ

शिरोळ तालुक्यातील 26 हजार शेतकरी सभासदांपैकी आजअखेर 17 हजार 209 सभासद शेतकर्‍यांना कर्जमाफी मिळाली आहे. त्यामध्ये ग्रीन लिस्टमधील 835 पैकी 772, तर प्रोत्साहनपर योजनेतील 18 हजार 808 पैकी 16 हजार 374 शेतकरी सभासदांचा समावेश आहे. या शेतकर्‍यांना 35 कोटी 35 लाख 16 हजार 671 इतकी रक्कम कर्जमाफीपोटी मिळाली आहे. 

तालुक्यातील ग्रीन लिस्टमध्ये थकीत शेतकर्‍यांपैकी 835 शेतकर्‍यांची मंजुरीची यादी आली. त्यामध्ये 4 कोटी 75 लाख 70,343 अशी कर्ज रकमेसाठी अर्ज दाखल होते. त्यापैकी 772 शेतकर्‍यांना 4 कोटी 41 लाख 39, 677 इतक्या रकमेची कर्जमाफी मंजूर झाली. प्रोत्साहनपर कर्जमाफी ही 35 कोटी 85 लाख 62,077 इतकी मिळायला पाहिजे होती. मात्र, 18 हजार 808 सभासद शेतकर्‍यापैकी 16,374 शेतकरी यासाठी पात्र ठरले. यांना 30 कोटी 93 लाख 76,994 इतकी रक्कम कर्जमाफी म्हणून मंजूर झाली. थकीत कर्जदारांपैकी कर्जमाफी न मिळालेले 63 शेतकरी हे  34 लाख 30 हजार 666, तर प्रोत्साहनपर कर्जमाफी न मिळालेल्या 2,434 शेतकरी हे 4 कोटी 91 लाख 85,482 इतक्या कर्जमाफीपासून वंचित राहिले. एकूण 5 कोटी 8 लाख 14,517 इतकी रक्कम शेतकर्‍यांना अद्याप मिळालेली नाही. 

संपूर्ण कर्जमाफी मिळावी : यड्रावकर

30 जून हा दिवस शेतकर्‍यांसाठी वर्षअखेर मानला जातो. त्याला नव्याने कर्जमाफी घ्यावी लागते. त्यामुळे सरकारने संपूर्ण कर्जमाफीची अंमलबजावणी करावी व शेतकर्‍यांना न्याय द्यावा, अशी मागणी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी केली.

निकषाप्रमाणे अंमलबजावणी नाही ः शहापुरे

सेवा संस्थेचे कर्जमाफीचे आकडे बोगस आहेत. एकाच घरात पती-पत्नीला कर्जमाफी मिळाली आहे. मुदतीनंतरही अर्ज दाखल केलेल्यांना कर्जमाफी मिळाली. काही संस्थांच्या संचालकांनाही कर्जमाफी मिळाली आहे, असे  बुबनाळचे शेतकरी सुरेश शहापुरे यांनी सांगितले.

गडहिंग्लज तालुका व्याज आकारणी सुरू

राज्य शासनाने जाहीर केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान 2017 या कर्जमाफी योजनेंतर्गत गडहिंग्लज तालुक्यातील 12 हजार 21 खातेधारकांना 23 कोटी 1 लाख 67 हजार 532 रुपये 29 पैसे इतकी कर्जमाफी जाहीर झाली आहे. मात्र, याव्यतिरिक्त अजूनही शेकडोच्या घरातील शेतकरी कर्जमाफीच्या प्रतीक्षेतच आहेत. त्यांच्याच मागे विविध कागदपत्रांच्या चौकशांचा ससेमिरा लागला असल्याने कर्जमाफी मिळणार कधी, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. कर्जमाफीसाठी पात्र असलेल्या शेतकर्‍यांच्या कर्जावर मात्र बँकांनी व्याज आकारणी सुरू केली आहे. 

वास्तविक, राज्य शासनाने आदेश दिले असतानाही अशाप्रकारची व्याज आकारणी होत असल्याने अनेक शेतकर्‍यांनी थेट बँक अधिकार्‍यांनाच जाब विचारण्याचा प्रयत्न केला आहे. गडहिंग्लज तालुक्यातील अनेक बँकांत अधिकारी व शेतकरी यांच्यात वादावादीचे प्रसंग घडले आहेत.  कर्जमाफी यादीतील शेतकर्‍यांनी आपल्यावरील अन्यायाचा पाढा वाचला असून, राज्य सरकारचेे बँकांनी व्याज आकारणी करू नये, असे आदेश असतानाही बँकांनी व्याजाची आकारणी जमा करण्यास सुरू केली आहे. त्यामुळे वर्षभराचे व्याज या शेतकर्‍यांना भरावे लागणार आहे. 

या सगळ्या घडामोडीत सेवा संस्थांच्या सचिवांनाही काम करताना समस्याच अधिक प्रमाणात येत आहेत. एकीकडे, उसाच्या भावामुळे समस्येत असलेला शेतकरी येत्या 30 जूनला पैशाअभावी बँका व सेवा संस्थांकडे थकबाकीदार बनला आहे. त्यातच पुन्हा वर्षभराची व्याज आकारणी व कर्जमाफीच्या अडचणीमध्ये सापडल्याने शेतकरी चिंतातूर झाला आहे. मान्सून चांगला होणार, असा अंदाज व्यक्त होत असताना ऐन पेरणीच्या काळात शेतकर्‍यांच्या हातात पैशाची उपलब्धता न झाल्याने तो हवालदिल झाला आहे.