Fri, Jul 19, 2019 05:01होमपेज › Kolhapur › लाचप्रकरणी दुय्यम निबंधकासह सहा जेरबंद

लाचप्रकरणी दुय्यम निबंधकासह सहा जेरबंद

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

पन्हाळा : प्रतिनिधी

पन्हाळा येथील दुय्यम निबंधक श्रेणी एक कार्यालयात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी सापळा रचून दुय्यम निबंधकासह सहा कर्मचार्‍यांना अटक केली. यात तीन शासकीय सेवक, तर तीन खासगी कर्मचार्‍यांचा समावेश आहे. दुय्यम निबंधक यशवंत चव्हाण, लिपिक सौ. गौरी बोटे, शिपाई प्रकाश सणगर, डाटा ऑपरेटर नितीन काटकर, सुशांत वणिरे व शहाजी पाटील यांचा अटक केलेल्यांमध्ये समावेश आहे. या कारवाईमुळे जिल्ह्यातील सरकारी कार्यालयांत खळबळ उडाली आहे. पन्हाळ्यात लाचलुचपत विभागाने एकाच धाडीत एकाच कार्यालयातील सहा जणाना रंगेहाथ पकडण्याचा हा बहुधा देशातील पहिलाच प्रकार आहे. 

या कारवाईमुळे बरेच दिवस चर्चेत असणार्‍या निबंधक कार्यालयातील लाचखोरी चव्हाट्यावर आली आहे. याबाबत दै.‘पुढारी’तून सर्वप्रथम सविस्तर वृत प्रसिद्ध करण्यात आले होते. त्यानंतर काही काळ लाचखोरी थांबल्याचे चित्र होते. मात्र, या कारवाईत एकाचवेळी अधिकार्‍यापासून शिपायापर्यंत सहा जणांना लाच घेताना रंगेहाथ पकडल्यामुळे जिल्ह्यात दुय्यम निबंधक कार्यालयाचा कारभार चर्चेचा विषय झाला आहे.

सविस्तर माहिती अशी : बांदिवडे (ता. पन्हाळा) येथील अभिमन्यू पाटील हे कणेरी येथील तानाजी रामू जानकर यांची गट नंबर 534 मधील चार गुंठे शेत जमीन खरेदी करणार होते. खरेदी खत करण्यासाठी आवश्यक खर्चाची चौकशी करण्यास पन्हाळा दुय्यम निबंधक कार्यालयात निबंधक यशवंत चव्हाण यांना मंगळवारी पाटील हे भेटण्यास गेले. चव्हाण याने दस्त करण्यास अडचण असल्याचे सांगून 1500 रुपयांची मागणी केली. तसेच लिपिक, शिपाई, डाटा ऑपरेटर यांना भेटून ते काय मागतात ते त्यांना द्या, असे सुचवले. त्यानुसार अभिमन्यू पाटील हे सर्वांना भेटले. सर्वांनी मिळून पाच हजार रुपयांची मागणी केली.  तडजोडीनंतर साडेतीन हजार रुपये द्यायचे ठरले. 

त्यानंतर पाटील यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कोल्हापूर कार्यालयात भेटून तक्रार दाखल केली. बुधवारी लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयाने पोलिस निरीक्षक प्रविण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचला व दुय्मम निबंधक यशवंत सदाशिव चव्हाण (रा.  हरिओमनगर, कोल्हापूर) यास दीड हजार रुपये, तर लिपिक सौ. गीता पांडुरंग बोटे, (रा. राजोपाध्येनगर, कोल्हापूर), शिपाई प्रकाश यशवंत सणगर (रा. नवे पारगाव), डाटा ऑपरेटर नितीन  कोंडिबा काटकर (रा. ड्रायव्हर कॉलनी कोल्हापूर), सुशांत दत्तात्रय वणिरे (रा.  कोल्हापूर) व खासगी उमेदवार शहाजी बळवंत पाटील (रा. उत्रे) या पाच जणांनी तक्रारदार अभिमन्यू पाटील (रा. बांदिवडे, ता. पन्हाळा) यांच्याकडून ठरल्यानुसार प्रत्येकी पाचशे रुपये लाच घेतली. दरम्यान, दबा धरून बसलेल्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्यांना रंगेहाथ पकडले.

Tags : 


  •