Fri, Jul 19, 2019 01:05होमपेज › Kolhapur › ...अन्यथा मुंबईचे दूध रोखणार : राजू शेट्टी

...अन्यथा मुंबईचे दूध रोखणार : राजू शेट्टी

Published On: Jul 02 2018 1:51AM | Last Updated: Jul 02 2018 1:27AMकोल्हापूर ः प्रतिनिधी 

कर्नाटक सरकारच्या धर्तीवर महाराष्ट्र शासनाने 15 जुलैपर्यंत गायीच्या दुधाला प्रतिलीटर पाच रुपयांचे अनुदान देण्याचा निर्णय घ्यावा, अन्यथा 16 जुलैपासून मुंबईला जाणारे दूध रोखून धरू. आंदोलन मोडून काढण्याचा प्रयत्न झाल्यास शेतकर्‍यांसाठी प्रसंगी कायदा हातात घेऊ, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिला. 

खा. शेट्टी म्हणाले, कर्नाटकात गेल्या चार वर्षांपासून हे अनुदान दिले जाते. त्यामुळे महाराष्ट्रात ते अशक्य नाही. यापूर्वी दूध पावडर तयार करणार्‍या संघांना महाराष्ट्र शासनाने 53 कोटी रुपयांची मदत केली; पण त्याचा उपयोग झाला नाही. या संकटातून बाहेर पडायचे असेल तर शेतकर्‍यांच्या खात्यावरच प्रतिलीटर पाच रुपयांचे अनुदान थेट जमा व्हायला पाहिजे. 

दोन-तीन महिन्यांचा हा प्रश्‍न आहे. रोज 1 कोटी लीटर गायीचे दूध संकलित होते. प्रतिलीटर पाच रुपयांनी दिवसाला पाच तर महिन्याचे 150 कोटी होतात. तीन महिन्यांसाठी 450 कोटी लागतात. तेवढी तरतूद करायला सरकारला अडचण नाही, असेही खा. शेट्टी म्हणाले. 

ते म्हणाले, या संकटाची पूर्वसूचना यापूर्वीच मी केंद्रीय कृषी मंत्री व दूध संघांनाही दिली होती. पण, त्याकडे साफ दुर्लक्ष करण्यात आले. आता दुधाला अनुदान मिळण्यावर आम्ही ठाम आहोत. त्याचा निर्णय 15 जुलैपर्यंत कोणत्याही स्थितीत व्हायला हवा. तसा निर्णय न झाल्यास मुंबईला जाणारे तीन मार्ग शेतकरी संघटना रोखून धरेल. आंदोलन आम्हाला नवीन नसल्याने हे काम अवघड नाही. यापूर्वी हा प्रयोग आम्ही केला आहे. त्यातून सरकार आंदोलन मोडण्याचा प्रयत्न करणार असेल तर शेतकर्‍यांसाठी आम्हीही कायदा हातात घ्यायला तयार आहे. 

जागतिक बाजारपेठेत दूध पावडरचे दर कोसळल्याने देशांतर्गत पावडरचे दर उतरले. निर्यातीलाही प्रतिसाद नाही. युरोपीय राष्ट्रांनी यावर मार्ग काढण्यासाठी आपल्या देशातील पावडर काही देशांना मोफत निर्यात केली. त्याचप्रमाणे केंद्र सरकारने देशातील पावडर खरेदी करून, ती इतर देशांत निर्यात करावी, असेही शेट्टी म्हणाले.पत्रकार परिषदेला जिल्हाध्यक्ष भगवान काटे, प्रा. जालंदर पाटील, सावकर मादनाईक,  निवृत्त पोलीस उपअधीक्षक पी. जी. मांढरे, सागर शंभुशेटे आदी उपस्थित होते.

कोल्हापुरात शुक्रवारी बैठक 

16 जुलैपासून सुरू होणार्‍या आंदोलनाच्या तयारीसाठी 6 जुलै रोजी कोल्हापुरात बैठक आयोजित करण्यात आली आहे. दुपारी 2 वाजता मार्केट यार्ड येथील शाहू सांस्कृतिक सभागृहात होणार्‍या या बैठकीत जिल्हानिहाय आंदोलनाची रुपरेषा निश्‍चित होईल, अशी माहिती शेट्टी यांनी दिली.