Sat, Apr 20, 2019 16:20होमपेज › Kolhapur › ऑनलाईन खत विक्रीला ‘सर्व्हर डाऊन’चा ब्रेक

ऑनलाईन खत विक्रीला ‘सर्व्हर डाऊन’चा ब्रेक

Published On: Dec 22 2017 1:26AM | Last Updated: Dec 21 2017 11:56PM

बुकमार्क करा

कोल्हापूर : प्रतिनिधी  

रासायनिक खतांच्या अनुदानातील बोगसगिरी रोखण्यासाठी म्हणून शासनाने पॉस मशीनद्वारेच ऑनलाईन खतविक्री करण्याचे बंधन कृषी सेवा केंद्रांना घातले आहे. पण रोगापेक्षा ईलाज भयंकर अशी अवस्था झाली असून दिवसातून बहुतांश वेळ इंटरनेटचा सर्व्हर डाऊनच राहत असल्याने बिलासाठी ताटकळत बसण्याची वेळ शेतकर्‍यांवर आली आहे. शासनाने मशीन मोफत उपलब्ध करून दिले असले तरी त्यासाठी लागणार्‍या इंटरनेटचा खर्च मात्र विक्रेत्यांनाच सोसावा लागत आहे. इंटरनेट सेवा नसलेल्या ठिकाणी तर शेतकर्‍यांची पंचाईत होत आहे. 

जिल्ह्यात उसाचे क्षेत्र सर्वाधिक असल्याने खरिपाच्या तुलनेत रब्बीसाठी रासायनिक खतांची मागणी जास्त असते. जि.प. कृषी विभागाने ऑक्टोबर ते एप्रिल या कालावधीकरिता 1 लाख 80 हजार मेट्रिक टन खतांचे नियोजन केले आहे. त्यापैकी नोव्हेंबरअखेरपर्यंत 30 हजार मेट्रिक खत उपलब्ध झाले आहे. खरिपातील 25 हजार मेट्रिक टनाचा बफर स्टॉक शिल्‍लक असल्याने सद्यस्थितीत जिल्ह्यात कुठेही खतांचा तुटवडा नाही. 

खते मुबलक असली तरी ती शेतकर्‍यांना देण्याच्या व्यवस्थेत मात्र गेल्या महिन्यापासून बदल केल्याने पारंपरिक साखळी विस्कळीत झाली आहे. पॉस मशीनद्वारे आधार कार्डच्या सहाय्यानेच विक्री करण्याचा निर्णय शासनाने घेतला असून त्याची अंमलबजावणी गेल्या महिन्यापासून काटेकोरपणे सुरू झाली आहे. हे मशीन वापरण्याचे प्रशिक्षणही दिले आहे. पण यासाठीची इंटरनेटच्या सर्व्हरची नीट व्यवस्था केलेली नाही. आधार कार्डचा नंबर मशीनवर डायल करून थम्ब इंम्प्रेशन केल्याशिवाय बिल निघत नाही. त्यामुळे जोपर्यंत इंटरनेटची रेंज येत नाही तोवर बिल निघत नाही, बिल घेतल्याशिवाय विक्रेता खत देत नाही. त्यामुळे शेतकरी खते घेऊन बिलाची पावती येण्याची वाट पाहत बसतात. 

इंटरनेट कनेक्शन व्यवस्थित नसल्याच्या तक्रारी कृषी सेवा केंद्र चालक सातत्याने करत आहेत.  वायफाय अथवा डोंगा वापरावा, असे कंपन्यांकडून सांगण्यात येत आहे. या इंटरनेटच्या जोडणीचा खर्चही विक्रेत्यांनाच करावा लागत आहे. सुरुवातीला 52 रुपये असणारा इंटरनेटचा पॅक आता 98 रुपये झाला आहे. सकाळच्या सत्रात सुरळीत चालणारा सर्व्हर जसे काम वाढत जाईल तसा मंदावत जातो. दुपारनंतर अनेक कृषी सेवा केंद्रारवर बिल येण्यासाठी शेतकर्‍यांना किमान दोन दोन तास ताटकळत बसावे लागत आहे. शेतीची कामे वाढली असताना नाहक वेळ घालवावा लागत आहे.

जिल्ह्यात निम्मेच पॉस मशीन उपलब्ध

जिल्ह्यात 1800 कृषी सेवा केंद्रे आहेत. त्यापैकी 1892 जणांकडे रासायनिक खत विक्रीचे परवाने आहेत. बियाण्यांचे 1198 तर कीटकनाशकांचे 919 परवानाधारक आहेत. या सर्वांना पॉसमशीन देण्यात येणार होते. पण गेल्या तीन महिन्यांत यापैकी केवळ 943 जणांनाच हे मशीन मिळाले आहेत. अजून निम्म्या सेवा केंद्रांपर्यंत मशीन पोहोचलेलीच नाहीत. उर्वरितांना अजून पंधरा दिवसांनी मिळतील, असे जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी सांगितले.