Fri, Apr 26, 2019 17:42होमपेज › Kolhapur › टोप ग्रामस्थ दाखल करणार पुनर्विचार याचिका

टोप ग्रामस्थ दाखल करणार पुनर्विचार याचिका

Published On: May 18 2018 1:21AM | Last Updated: May 18 2018 1:00AMटोप : वार्ताहर

कोल्हापूर महानरपालिकेचा कचरा हातकणंगले तालुक्यातील टोप येथील खाणीत टाकण्याच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालासंदर्भात आज झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करण्याचे सर्वानुमते ठरले. टोप खाण बचाव कृती समितीच्या माध्यमातून तीव्र लोकलढा उभारून कोणत्याही परिस्थितीत महापालिकेचा कचरा टोप खाणीत पडू नये, यासाठी प्रसंगी मोठे जनआंदोलन उभारण्याचा निर्णय घेण्यात आला.

टोप येथील गट नं 520 व 565 अ मधील साडेसोळा एकर क्षेत्रातील दगडखणीत शहरातील कचरा टाकण्यासाठी महापालिका प्रशासन प्रयत्नशील असून टोप ग्रामपंचायतीने कोल्हापूरच्या कचरा खाणीत पडू नये, यासाठी सर्वोच्च न्यायालयापर्यंतची लढाई लढली आहे. 

प्रसंगी कचर्‍याच्या गाड्या अंगावरून गेल्या तरी बेहत्तर अथवा कोणतीही  दडपशाही केली तरी ती मोडून काढू व 16 एकर काय सोळा इंच जागेत देखील कोणत्याही किमतीवर कचरा टाकू द्यायचा नाही, असा ठाम निर्धार बैठकीत करण्यात आला. येत्या दोन दिवसांत खाणीत कचरा पडू नये, यासाठी कराव्या लागणार्‍या प्रयत्नांची दिशा ठरविण्यासाठी टोपसह संभापूर, शिये, नागाव, कासारवाडीमधील ग्रामस्थ तसेच या कचर्‍याची झळ पोहोचणार असलेल्या औद्योगिक वसाहतीमधील उद्योजक, कामगार यांची व्यापक बैठक टोप खाण बचाव कृती समितीच्या माध्यमातून आयोजित करण्याचे आजच्या बैठकीत ठरविण्यात आले. दरम्यान, कचरा प्रश्‍न गावाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असल्याने गावातील तरुणाईने सोशल मीडियाच्या माध्यमातून जागृती सुरू केली आहे. 

यावेळी धनाजी पाटील, तानाजी पाटील, विठ्ठलपंत पाटील, पं. स. सदस्य डॉ. प्रदीप पाटील, उपसरपंच विठ्ठल पाटील, एम. टी.पाटील, बाळासो चव्हाण, श्रीरंग तावडे, बाळासो कोळी, दामोदर पाटील, नितेश नलवडे,  सदस्य विजय पाटील, शिवाजी पाटील, डी. एस. पाटील, कृष्णात शिंदे, राजू कोळी, संग्राम लोहार, बाजीराव पोवार, दौलत पाटील आदी उपस्थित होते.

गावच्या अस्तित्वाचा प्रश्‍न : सरपंच तावडे 

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा आम्ही आदर करतो. तथापि, महापालिकेचा कचरा खाणीत पडल्यास आरोग्याचा गंभीर प्रश्‍न निर्माण होणार असून गावाच्या अस्तित्वाचा प्रश्‍न निर्माण होणार असल्याने गावाच्या हिताच्या दृष्टीने सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करणार असल्याची प्रतिक्रिया सरपंच रूपाली तावडे यांनी व्यक्त केली.

शिये ग्रामस्थांचाही विरोध : सरपंच कदम

कोल्हापूर शहराचा कचरा शिये फाट्यावरील टोप खाणीत आणल्यास शिये ग्रामस्थ याला तीव्र विरोध करतील, असे शियेचे सरपंच रणजित कदम यांनी सांगितले. शिये गावचा जलस्रोत टोपच्या खाणीवर अवलंबून आहे. यामुळे गावच्या प्रवेशद्वारावर दुर्गंधी होऊन भटक्या कुत्र्यांचा त्रास होणार आहे. शिवाय आरोग्याचा प्रश्‍नही निर्माण होणार असल्याने प्रस्तावित लँडफिल साईटला आमचा विरोध राहणार असल्याचे कदम यांनी सांगितले. महापालिकेने शहरातील टाकाळासारख्या खाणीत कचरा टाकावा, आपली घाण दुसर्‍याच्या गावात टाकू नये, असेही ते म्हणाले. तरीही महापालिकेने कचरा टाकण्याचा प्रयत्न केल्यास संघर्ष अटळ आहे, असे कदम यांनी सांगितले.