Fri, Jul 19, 2019 05:13होमपेज › Kolhapur › ‘डॉ. आंबेडकर कृषी स्वावलंबन’साठी पाच कोटींची तरतूद  

‘डॉ. आंबेडकर कृषी स्वावलंबन’साठी पाच कोटींची तरतूद  

Published On: Aug 14 2018 1:10AM | Last Updated: Aug 14 2018 12:08AMकोल्हापूर : प्रतिनिधी

अनुसूचित जाती, नवबौद्ध शेतकर्‍यांचे उत्पन्‍न वाढवून त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी यापूर्वी राबविण्यात येत असलेली अनुसूचित जाती उपाययोजना (विशेष घटक योजना)  सुधारित करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अस्तित्वात आली आहे. यासाठी कोल्हापूर जिल्ह्यासाठी 5 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या योजनेत 2018-19 या वर्षात नवीन सिंचन विहीर खुदाईसाठी 2.50 लाख, जुनी विहीर दुरुस्तीसाठी 50 हजार रुपये, बोअर मारण्यासाठी 20 हजार रुपये, इलेक्ट्रिक मोटारीसाठी 20 हजार रुपये, वीज जोडणीसाठी 10 हजार रुपये, शेततळ्यात प्लास्टिक अस्तरीकरणासाठी 1 लाख रुपये, ठिबक सिंचन खरेदीसाठी 50 हजार रुपये व तुषार सिंचनसाठी 25 हजार रुपये इतके अनुदान देण्यात येणार आहे.

याबाबत अटी व शर्थी पूर्ण करणार्‍याला वरीलपैकी कोणत्याही एका पॅकेजचा लाभ घेता येणार आहे. जलसंधारण विभागाच्या मागेल त्याला शेततळे योजनेतून ज्यांनी शेततळे घेतले आहे त्याच लाभार्थींना प्लास्टिक अस्तरीकरण पॅकेजचा लाभ मिळणार आहे. योजनेसाठी लाभार्थी हा अनुसूचित जाती व नवबौद्ध शेतकरी व 7/12 व 8 अ असलेला असावा. त्याच्याकडे जातीचे प्रमाणपत्र असावे. दारिद्य्ररेषेखालील लाभार्थीस प्रथम प्राधान्य देण्यात येणार आहे. त्या शेतकर्‍याचे उत्पन्‍न 1 लाख 50 हजारांपेक्षा जास्त नसावे. सामूहिक शेतजमीन 1 एकर क्षेत्र धारण करणारे एकत्रित कुटुंब नवीन विहिरीचा  लाभ घेण्यासठी पात्र असेल. ग्रामसभेचा ठराव यासाठी आवश्यक आहे. त्यासाठी 500 फुटांवर दुसरी विहीर नसल्याचा तलाठ्याचा दाखला आवश्यक आहे. 

या योजनेंअतर्गत लाभ घेऊ इच्छिणार्‍या अनुसूचित जातीमधील शेतकर्‍यांनी आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन अर्ज 10 ऑगस्ट ते 9 सप्टेंबरपर्यंत संकेतस्थळावर दाखल करावेत. त्यानंतर ऑनलाईन अर्ज सादर केलेली प्रत आवश्यक कागदपत्रांच्या स्वसाक्षांकीत छायांकीत प्रतीसह कृषी अधिकारी (विघयो) पंचायत समिती यांच्याकडे पोहोच करावी.