Thu, May 23, 2019 15:30
    ब्रेकिंग    होमपेज › Kolhapur › एकाच ऊसक्षेत्राची नोंद अनेक कारखान्यांना!

एकाच ऊसक्षेत्राची नोंद अनेक कारखान्यांना!

Published On: Jun 29 2018 12:55AM | Last Updated: Jun 28 2018 11:41PMसुळकूड : एम. वाय. भिकाप्पा पाटील

आगामी 2018 - 19 च्या गळीत हंगामातील उसाचे सुमारे 20 ते 25 टक्के संभाव्य बंपर उत्पादन विचारात घेऊन, बर्‍याच शेतकर्‍यांनी एकाच ऊसक्षेत्राची नोंद 2-3 कारखान्यांना देऊन ऊस योग्य वेळेत गाळप होण्याचे नियोजन केल्याचे चित्र या परिसरात दिसून येत आहे. 

साखर कारखान्यांच्या सन 2018 - 19 च्या गळीत हंगामासाठी राहिल्या सवरलेल्या उसाच्या नोंदी घेण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. सामान्यत: लागण केलेल्या उसाच्या नोंदी लागणीनंतर त्वरित दिल्या जातात. कारखान्यांच्या शेती खात्याकडील कर्मचारी वर्गाकडून प्रत्यक्ष पाहणी करून त्या नोंदी कायम केल्या जातात. तर खोडवा उसाच्या नोंदी लागण तुटून गेल्यानंतर दिल्या जातात. मात्र, शेतकर्‍यांनी त्यानंतर नोंदी दिल्यास, शेतकर्‍यांनी दिलेल्या तारखांची प्लॉटवर जाऊन खातरजमा करूनच नोंदी केल्या जातात. काही कारखाने तर अशाप्रसंगी शेतकर्‍यांनी दिलेल्या तारखानंतरची एक महिनाभर राहिलेल्या उशिराच्या तारखेची नोंद घेतात. विस्मरणाने राहिलेल्या किंवा कोणत्या कारखान्यास ऊस द्यावयाचा यासंबंधी द्विधा मनस्थितीत असलेल्या शेतकर्‍यांच्या नोंदीही कारखाने जून महिन्याच्या अखेरीपर्यंत स्वीकारतात.
गेल्या चार - पाच वर्षांपासून शेतकरी वर्गास एफ. आर. पी. नुसार ऊसदर मिळत आहे. हा दर गतवर्षीच्या हंगामातील रिकव्हरीवर अवलंबून असतो. प्रत्येक कारखान्याची रिकव्हरी भिन्‍न-भिन्‍न असल्याने साहजिकच एफ. आर. पी. च्या रकमेतही फरक असतो.

बरेच कारखाने, सभासद व बिगर सभासद, कार्यक्षेत्रातील ऊस आणि गेटकेन ऊस यांचा समतोल साधत गळीत हंगाम पार पाडतात. इतकेच नव्हे तर, लागण व खोडवा उसासाठी समांतर क्रमपाळी तयार करून त्यानुसार गाळप करून शेतकर्‍यांचे नुकसान होऊ देत नाहीत.

तथापि काही कारखाने मात्र, को 671 जातीचा ऊस संपेपर्यंत अन्य वाणाचा ऊसच गळितास नेत नाहीत. तर काही कारखाने गळिताचे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी गळीत हंगामाच्या सुरुवातीसच कार्यक्षेत्राबाहेरील ऊस गळितास आणण्यासाठी आणि गेटकेन ऊस खरेदीसाठी निम्म्याहून अधिक तोडणी वाहतूक यंत्रणा कामास लावतात. परिणामी सभासद व कार्यक्षेत्रातील बिगर सभासद शेतकर्‍यांच्या नोंदलेल्या उसाचे गाळप मागे पडून नुकसान होते.

आगामी गळीत हंगामात ऊसक्षेत्र वाढल्याची व त्यामुळे आपण निष्काळजी राहिल्यास ऊस गाळपास विलंब होण्याची शक्यताही शेतकर्‍यांना जाणवली आहे. तसेच गेल्या हंगामात ऊस 16-17 महिन्यानंतर ऊस गाळपास गेल्यामुळे, काही शेतकर्‍यांनी नुकसानीचाही अनुभव घेतला आहे. त्यामुळे आपण सभासद असलेल्या कारखान्यास ठराविक ऊसक्षेत्राची नोंद देऊन अन्य शिल्लक क्षेत्राची नोंद गतवर्षी एफ. आर. पी. चांगला असणार्‍या कारखान्यांना देण्याचा पवित्रा काही शेतकर्‍यांनी घेतला आहे. अशापैकी शेतकर्‍यांनी एकाच ऊस क्षेत्राची नोंद 2 - 3 कारखान्यांना देण्यासही मागेपुढे पाहिलेले नाही. बिगर सभासद, शेतकरी वर्गाने तर आपल्या संपूर्ण ऊस क्षेत्राची नोंद सर्रासपणे 2 - 3 कारखान्यांना दिली आहे. तर लागण ऊस क्षेत्राची नोंद एका कारखान्यास व खोडवा उसाची नोंद गेटकेन ऊस नेणार्‍या कारखान्यास देणार्‍या शेतकर्‍याचाही एक वर्ग आहे. एकंदरीत ऊस वेळेत गाळपासही गेला पाहिजे व दरही चांगला मिळाला पाहिजे. यासाठी शेतकरी वर्ग सजग बनला आहे.
मात्र, एकाच ऊस क्षेत्राची दुबार, तिबार नोंद झाल्यामुळे पोकळ ऊस क्षेत्राची वाढ होऊन निश्‍चित ऊसक्षेत्र किती आहे? याबाबत निश्‍चित माहिती मिळणे कठीण होणार आहे.