Sun, Jul 21, 2019 07:59होमपेज › Kolhapur › राजाराम बंधार्‍यावरील नवा रस्ता गेला वाहून

राजाराम बंधार्‍यावरील नवा रस्ता गेला वाहून

Published On: Jul 02 2018 1:51AM | Last Updated: Jul 02 2018 1:36AMकसबा बावडा ः प्रतिनिधी

पंचगंगा नदीवरील राजाराम बंधार्‍यावर सुमारे 17 लाख रुपये खर्च करून केलेला नवा रस्ता पहिल्याच पावसात वाहून गेला. आज धरणावरील पाणी ओसरल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. दोन महिन्यांपूर्वीच हे काम केले होते; पण पहिल्याच पावसात रस्ता पाण्यात गेल्याने या कामाच्या दर्जाबाबतच प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे.
दरम्यान, बंधार्‍यावरील पाणी ओसरले असले, तरी नव्या रस्त्याचा बहुंताशी भाग वाहून गेल्याने खबरदारीचा उपाय म्हणून या बंधार्‍यावरील वाहतूक पोलिसांनी बॅरिकेटस् लावून बंद केली.

कसबा बावडा व औद्योगिक वसाहतीला वडणगे, निगवे, कुशिरेबरोबरच कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गाला जोडणारा प्रमुख बंधारा अशी या बंधार्‍याची ओळख होती. मूळ बंधार्‍यावरील रस्ता खराब झाल्याने एप्रिल 2018 मध्ये 17 लाख रुपये खर्च करून पाटबंधारे महामंडळामार्फत बंधार्‍यावरच सिमेंटचा स्लॅब टाकला होता. पंचगंगा घाटाची डागडुजी, बंधार्‍याच्या दोन्हीही बाजूला रेलिंग व दोन्ही बाजूला अवजड वाहने जाऊ नयेत म्हणून कमानी, असे या कामाचे स्वरूप होते. यातील एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात स्लॅब टाकला होता, तो पहिल्याच पावसात वाहून गेला. 26 जून रोजी हा रस्ता वाहून गेल्याचे लक्षात आले; पण बंधार्‍यावर पाणी असल्यामुळे नेमका किती भागवाहून गेला, हे समजत नव्हते. गेली दोन दिवस पावसाने उघडीप दिल्याने आज बंधार्‍यावरील पाणी ओसरले. त्यामुळे बंधारा खुला झाला; पण स्लॅब यापूर्वीच वाहून गेल्याचे निदर्शनास आल्याने दोन्ही बाजूने वाहतूक बंद करण्यात आली.

देशातील पहिला बंधारा

कोल्हापूर पद्धतीचा बंधारा म्हणून देशभर ओळख निर्माण झालेला राजाराम बंधारा हा देशातील पहिला बंधारा आहे. 1928 साली राजाराम महाराजांनी हा बंधारा बांधला. परिसरातील शेतीला सिंचनासाठी पाणी उपलब्ध व्हावे, म्हणून हा बंधारा बांधण्यात आला. मूळ संकल्पना शाहू महाराजांची होती; पण बांधकाम राजाराम महाराजांनी पूर्ण केले.