Tue, Mar 19, 2019 05:09होमपेज › Kolhapur › सरकारी कर्मचार्‍यांचा भव्य मोर्चा

सरकारी कर्मचार्‍यांचा भव्य मोर्चा

Published On: Aug 08 2018 1:49AM | Last Updated: Aug 08 2018 12:39AMकोल्हापूर : प्रतिनिधी

सातवा वेतन आयोग व जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी शासकीय कर्मचार्‍यांनी पुकारलेल्या तीन दिवसांच्या संपास मंगळवारी भव्य मोर्चाने प्रारंभ झाला. या संपात जिल्ह्यातील सुमारे एक लाख कर्मचारी सहभागी झाल्याचा दावा समन्वय समितीने केला आहे. संपात शासकीय, निमशासकीय कर्मचार्‍यांबरोबरच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाले आहेत. दरम्यान, संपात फूट पाडण्याचा प्रयत्न करणार्‍यांचा आजच्या सभेत निषेध करण्यात आला. संपाची दखल न घेतल्यास ऑक्टोबरपासून बेमुदत संपाचा इशारा दिला आहे.

केंद्रातील कर्मचार्‍यांप्रमाणे निवृत्तीचे 

वय 60 करावे, 5 दिवसांचा आठवडा करावा, सर्व संवर्गातील रिक्त पदे त्वरित भरावीत, शासनाच्या विविध विभागांतील खासगीकरण व कंत्राटी धोरण रद्द करावे, शिक्षण क्षेत्रातील विनाअनुदान धोरण रद्द करावे, शिक्षकांची वेठबिगारी थांबवावी, ऑगस्ट 2015 चा संचमान्यतेचा शासन आदेश रद्द करावा, अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन होईपर्यंत त्यांचे वेतन सुरू ठेवावे, शासकीय सेवेतील कर्मचार्‍यांच्या जातपडताळणी प्रकरणांचे निर्णय त्वरित घ्यावेत आदी मागण्यांसाठी शासकीय, निमशासकीय कर्मचार्‍यांनी दि. 7, 8 व 9 ऑगस्ट रोजी संपाची नोटीस दिली होती. यासंदर्भात सोमवारी मंत्रालयात बैठक झाली; पण चर्चा फिसकटल्याने ठरल्याप्रमाणे संप करण्याचा निर्णय कर्मचारी संघटनांनी जाहीर केला. 

टाऊन हॉल गर्दीने फुलला

या संपाची गेल्या काही दिवसांपासून तयारी सुरू होती. आज सकाळी दहा वाजता टाऊन हॉल येथे एकत्र जमण्याचे आवाहन सरकारी, निमसरकारी कर्मचारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समितीने केले होते. त्यानुसार सकाळपासूनच टाऊन हॉलमध्ये कर्मचारी आपापल्या कार्यालयापासून मोर्चाने घोषणा देत येत होते. त्यामुळे संपूर्ण टाऊन हॉल गर्दीने फुलून गेला होता. 

दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास टाऊन हॉल येथून मोर्चास सुरुवात झाली. मोर्चात 36 शिक्षकांच्या संघटना व 39 शासकीय कर्मचारी संघटना सहभागी झाल्या होत्या. महापालिका, शिवाजी पुतळामार्गे हा मोर्चा बिंदू चौकामध्ये विसर्जित करण्यात आला. यावेळी ‘आमच्या मागण्या मान्य करा, नाहीतर खुर्च्या खाली करा’, ‘कर्मचार्‍यांना फसविणार्‍या सरकारचा धिक्कार असो’, ‘वेतन आयोगासाठी तरतूद केलेली रक्कम मंत्र्यांच्या दौर्‍यावर खर्च करणार्‍या सरकारचा धिक्कार असो’, ‘हमारी युनियन, हमारी ताकद’ आदी घोषणा देण्यात येत होत्या. 

वाहतूक विस्कळीत

मोर्चामुळे भाऊसिंगजी रोड, शिवाजी पुतळा या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. मोर्चामध्ये महिला कर्मचार्‍यांची संख्यादेखील अधिक होती. पोलिस दलातील व कारागृहातील कार्यालयीन कर्मचारीदेखील आजच्या मोर्चात सहभागी झाले होते. 

मोर्चाच्या समारोपाप्रसंगी बोलताना राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे राज्य सहसचिव अनिल लवेकर म्हणाले, 30 वर्षांपूर्वी कर्मचार्‍यांनी 54 दिवसांचा संप केला. त्यानंतर बर्‍याच वर्षांनी सर्व राज्य कर्मचारी एकत्र येऊन लाक्षणिक संपाची वज्रमूठ बांधली आहे. एकजूट नसेल, तर शासन काहीच देणार नाही. वसंतदादा पाटील, शंकरराव चव्हाण यांना मुख्यमंत्री असताना कर्मचार्‍यांकडे लक्ष न दिल्याने पायउतार व्हावे लागले. तुमच्यावर ही वेळ आणायला वेळ लागणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. राज्य सरकारी कर्मचारी व शिक्षकांसह विविध संघटनांनी आंदोलन, संप केल्यानंतर सरकार आश्‍वासनांचे गाजर दाखविण्याचे काम करते. वरून आदेश आल्यानंतर मोठे गाजर दाखविले जाते. प्रत्यक्षात हातात काहीच पडत नाही, अशी परिस्थिती आहे. तेव्हा या सरकारला गाजर दाखविण्याची वेळ आली आहे, असा टोला लवेकर यांनी लगावला. राजपत्रित अधिकारी महासंघाने संपात सहभागी न होण्याच्या घेतलेल्या निर्णयाबाबत  लवेकर म्हणाले, शासन नेहमीच कर्मचार्‍यांच्या संपात फूट पाडण्याचा प्रयत्न करत असते. आताही ते सुरू आहे. अधिकार्‍यांना संपात उतरता येत नाही. मात्र, संप करायचा कर्मचार्‍यांनी आणि त्याचा फायदा मात्र अधिकार्‍यांना, असे होत आले आहे. महासंघाच्या पत्रकावर सही करणारे ग. दी. कुलथे हे मुख्यमंत्र्यांचे एजंट आहेत. त्यांचा आपण निषेध करतो.

यावेळी विविध संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. त्यात वसंत डावरे, अनिल घाटगे, राजेश वरक, भरत रसाळे, सुरेश संकपाळ, प्रसाद पाटील, दादासाहेब लाड, संजय क्षीरसागर, रमेश भोसले, असमत हवेरी, पल्लवी रेणके, अंजली दरेकर, सचिन जाधव, धनंजय जाधव, नीलेश म्हाळुंगेकर, गजानन पवार, युवराज चाळके, बी. एस. खोत, अनिल खोत, रमेश पाटील, नितीन कांबळे, सतीश ढेकळे, ज्ञानेश्‍वर मुठे, नुरमहमद बारगीर, संंजय शिंदे, अजय शिंदे, शिवराज आगाव, अमित खाडे आदींचा समावेश होता.

टाऊन हॉलमध्ये आज सभा

संपाच्या दुसर्‍या दिवशी उद्या (बुधवारी) सकाळी सभा आयोजित करण्यात आली आहे. तरी सर्व कर्मचार्‍यांनी टाऊन हॉल येथे उपस्थित राहावे, असे आवाहन लवेकर यांनी केले आहे.