Mon, Jun 01, 2020 05:21होमपेज › Kolhapur › कोल्हापूर : गडहिंग्लजला खरेदीसाठी झुंडीच्या झुंडी

कोल्हापूर : गडहिंग्लजला खरेदीसाठी झुंडीच्या झुंडी

Last Updated: Apr 01 2020 6:05PM

कर्फ्युनंतर खरेदीसाठी लोकांनी केलेली गर्दीगडहिंग्लज : प्रवीण आजगेकर

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी देशभरामध्ये संचारबंदी लागू केली असून अत्यावश्यक सेवांसाठीच फक्त रस्त्यावर येण्यासाठी परवानगी देण्यात आली होती. गडहिंग्लज पालिकेने गेल्या तीन दिवसांपासून शहरामध्ये पालिका कर्फ्यू लावला होता. यामध्ये औषध दुकाने वगळता अन्य कशालाही परवानगी देण्यात आली नव्हती. या कर्फ्युला लोकांनी अतिशय चांगला प्रतिसाद देत चांगले नागरीक असल्याचा पुरावा दिला होता. आज मात्र बाजारासाठी सायंकाळी ४ ते ८ मुभा देताच या सगळ्यांवर पाणी फिरले असून शहरात खरेदीसाठी झुंडीच्या झुंडी आल्या. त्यामुळे गेल्या तीन दिवसांपासून पाळलेल्या कर्फ्यूवर लोकांनी पाणी फेरल्याचा प्रकार घडला आहे. यामध्ये सोशल डिस्टीक्शनही पाळण्यात आले नसून शहरामध्ये एकच तोबा गर्दी झाल्याने प्रशासनही हतबल झाले.

दिल्लीतील तबलिगी जमातीत गेलेल्या कोल्हापुरातील २१ जणांचा शोध लागला 

गेल्या तीन दिवसांपासून सामसूम असलेल्या शहरामध्ये आज सायंकाळी चार वाजता अचानक गर्दीचे लोंढेचे लोंढेच दिसून आले. दुचाकी वाहनांच्याबरोबरच चारचाकी वाहनांची फार मोठी वर्दळ रस्त्यावर दिसून आली. यामुळे शहरामध्ये तीन दिवसांपूर्वी कर्फ्यू होता का? अशीच विचारणा करण्याची वेळ आली आहे. प्रशासनाची हतबतलताही यानिमित्ताने दिसून आली असून कारवाई करायची तर कोणावर असा प्रश्नही प्रशासनाला पडला आहे.

गेल्या तीन दिवसांपासून पालिका कर्फ्यू लावल्याने केवळ आजचाच दिवस संध्याकाळच्या सत्रामध्ये खरेदसाठी दिला असून पुन्हा उद्यापासून तीन दिवसांचा पालिका कर्फ्यू लावण्याचा पालिकेचा निर्णयच जणू चुकीचा ठरल्याचे यामुळे दिसत आहे. तीन दिवसांच्या कर्फ्यूनंतर किमान दोन दिवसांसाठी किराणा व भाजीपाला खरेदसाठी वेळ देणे आवश्यक होते. मात्र केवळ चार तासांसाठीच बाजारपेठ खुली केल्यामुळे नागरीकांनी तोबा गर्दी करत पालिकेच्या प्रयत्नांवर पाणीच फिरवले आहे. 

कोल्हापूर : तबलिगी जमातीचे 'ते' २१ जण अजूनही दिल्लीतच; एकालाही कोरोनाची लागण नाही

मुळातच शहरांमध्ये केवळ माणसांचीच नाही तर आज वाहनांचीही मोठया प्रमाणात गर्दी झाली होती. त्यामुळे खरेदीसाठी एकाच घरातील दोघे-तिघे बाहेर पडल्याचे चित्र पहावायास मिळाले. काल नगराध्यक्षांनी आवाहन करताना बाजारासाठी घराबाहेर एकटेच पडा. वाहनांचा वापर करू नका असे स्पष्ट केले होते. नागरीकांना याचा उलटा अर्थ घेत घरातील सर्वाचेच पाय मोकळे करून घेतले आहेत.

पालिकेच्या मुख्याधिकार्‍यांनी हा सगळा गोंधळ पाहून बाजारात येवून नागरीकांना सूचना देण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचा काहीही उपयोग झाला नाही. याशिवाय पालिकेच्या कर्मचार्‍यांनी भाजी विक्रेत्यांवर कारवाई करण्याचाही प्रयत्न केला मात्र लोकांच्या झुंडीसमोर सर्वकाही निष्प्रभ ठरले.

कोल्हापूर : 'होम क्वॉरंटाईन असणाऱ्या व्यक्तींवर लक्ष ठेवा'  

तीन दिवस कमावले चार तासांत घालवले...

गडहिंग्लज शहरामध्ये गेल्या तीन दिवसांपासून पालिकेने लावलेल्या कर्फ्युला गडहिंग्लजकरांनी अतिशय चांगला प्रतिसाद दिला. मात्र आज अवघ्या चार तासात सारे शहरच रस्त्यावर आल्याने तीन दिवसांत कमावलेले चार तासांत घालवले. संसर्गापासून बचावासाठी केलेली तीन दिवसांची मेहनत आज मात्र झुंडीने गायबच केली.

सोशल डिस्टीक्शनही पायदळी...

तीन दिवसांच्या कर्फ्यूनंतर आज खरेदीसाठी चार तासांची मुदत पालिकेने दिली असली तरी यामध्ये नागरीकांना सोशल डिस्टन्स पाळून खरेदी करता आली असती. याशिवाय वाहनांचा वापर न करताना ही खरेदी करता आली असती. मात्र नागरीकांना हे सर्व पायदळी तुडवत सगळयालाच हरताळ फासला आहे.