Sun, Feb 23, 2020 17:46होमपेज › Kolhapur › ‘सीपीआर’मधील पूरग्रस्त आपत्कालीन कक्षाची डॉ. योगेश जाधव यांच्याकडून पाहणी

‘सीपीआर’मधील पूरग्रस्त आपत्कालीन कक्षाची डॉ. योगेश जाधव यांच्याकडून पाहणी

Published On: Aug 20 2019 1:45AM | Last Updated: Aug 20 2019 1:48AM
कोल्हापूर : प्रतिनिधी

येथील सीपीआर रुग्णालयातील पूरग्रस्त नागरिकांवर उपचार करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या आपत्कालीन कक्षाची  उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास मंडळाचे अध्यक्ष  व दैनिक ‘पुढारी’चे  व्यवस्थापकीय संपादक डॉ. योगेश जाधव यांनी पाहणी केली. रुग्णांची विचारपूस करत सीपीआरमध्ये आवश्यक त्या  आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी योग्य ते सहकार्य करण्याची ग्वाही त्यांनी दिली. 

कोल्हापूर शहर व जिल्ह्यात पुरामुळे अनेक नागरिकांना स्थलांतर करावे लागले. पुराचे पाणी ओसरल्यानंतर आरोग्याच्या अनेक समस्यांना नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. त्यांच्यावर तत्काळ उपचार व्हावेत, यासाठी सीपीआरमध्ये स्वतंत्र कक्ष उभारण्यात आला असून त्यासाठी स्वतंत्र कर्मचारीवर्ग व डॉक्टर नेमले आहेत. डॉ. जाधव यांनी रुग्णांची भेट घेऊन त्यांच्या आरोग्याची चौकशी केली. यावेळी सीपीआरचे अधिष्ठाता डॉ. अजित लोकरे यांनी आपत्कालीन कक्षात देण्यात येणार्‍या आरोग्य सुविधांची माहिती डॉ. जाधव यांना  दिली. पूरग्रस्त स्थितीमुळे रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. नजीकच्या काळात ही संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांना तातडीची सुविधा देण्यासाठी खाटांची संख्या अपुरी पडत आहे. रुग्णांना खाली गादीवर ठेवून उपचार करावे लागतील. भविष्यात रुग्णसंख्येत वाढ झाल्यास त्यांच्यावर आरोग्य सुविधेअभावी उपचार करताना अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नवीन आपत्कालीन कक्षासाठी  आवश्यक साहित्याचा पुरवठा होणे आवश्यक आहे. यामध्ये शंभर फाऊलर बेड, रेग्युलर बेड, सलाईन स्टँड, गाद्या, पूरग्रस्त कक्ष स्थापन करण्यास आवश्यक साहित्य अथवा निधीची उपलब्धता करून देण्याची मागणी केली. डॉ. जाधव यांनी आपत्कालीन विभाग, नूतनीकरण व विस्तारीकरणासाठी योग्य ते सहकार्य करण्याची ग्वाही दिली. 

यावेळी डॉ. एस. टी. हिरुगडे, डॉ. शिरीष शहानबाग, डॉ. अपराजित वालावलकर, डॉ. पवन खोत, डॉ. एम. व्ही. बनसोडे, डॉ. बारटक्के, डॉ. सुदेश गंधम, डॉ. अनिता सैब्बनवार, वैद्यकीय अधीक्षक डॉ. सांगरूळकर, बंटी सावंत आदी उपस्थित होते.