Mon, Apr 22, 2019 12:19होमपेज › Kolhapur › नऊ ऑगस्टला कोल्हापूर जिल्हा बंद

नऊ ऑगस्टला कोल्हापूर जिल्हा बंद

Published On: Jul 28 2018 1:55AM | Last Updated: Jul 28 2018 1:55AMकोल्हापूर : प्रतिनिधी

मराठा आरक्षणासाठी अनेक वर्षे सनदशीर मार्गाने आंदोलने सुरू आहेत. महाराष्ट्रभर आरक्षणासाठी मोर्चे निघाले. मुंबईत सकल मराठा समाजाने धडक देऊनही आरक्षणाबाबत सरकारने व मंत्र्यांनी गांभीर्याने घेतले नाही. त्यांच्यामुळे आता सरकारच्या कोणत्याही प्रतिनिधींना भेटायचे नाही. मराठा आरक्षणाबाबत ठोस निर्णय घ्या, अन्यथा सरकारला जाग आणण्यासाठी आणि सुबुद्धी प्राप्तीसाठी 31 जुलैला श्री अंबाबाई देवीला साकडे घालून, जागर करू या आणि 9 ऑगस्ट क्रांतिदिनी जिल्हा बंदच ठेवू या, यामध्ये सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन मराठा क्रांती संघटनेच्या बैठकीत करण्यात आले.

बैठकीच्या अध्यक्षस्थानी महापौर सौ. शोभा बोंद्रे होत्या. शिवाजी पेठेतील शिवाजी तरुण मंडळाच्या सभागृहात ही बैठक झाली. मराठा क्रांती संघटनेचे सुरेशदादा पाटील म्हणाले, मुंबईतील मोर्चाने सरकारला धडकी भरली होती. त्यांनी ओबीसींप्रमाणे सवलती देऊ, असे आश्‍वास देऊन मराठा समाजाची बोळवण केली. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाला निधी देऊ, असे सांगितले. या मंडळाकडून गरजूंना सवलती मिळाल्या नाहीत. मराठा समाजाने सनदशीर मार्गाने मूक मोर्चे काढले, याची नोंद गिनिज बुकात झाली. 72 हजार पदांची शासकीय नोकरभरती केली जाणार आहे. जोपर्यंत आरक्षणाचा प्रश्‍न सुटत नाही, तोपर्यंत नोकर भरती थांबवा, तरुणांनी तोडफोड करू नये, शांततेच्या मार्गाने आंदोलन यशस्वी करण्याचे आवाहन पाटील यांनी केले.

माजी आमदार सुरेश साळोखे म्हणाले, सरकारने वेळीच विचार करावा, मराठा समाजाचा अंत पाहू नये. शांतता मोर्चाने सरकारला धडकी भरली आहे. ठोक मोर्चा सुरू झाल्यावर काय होईल, हे सांगाता येत नाही. छावा संघटनेचे राजू सावंत म्हणाले, तरुणांनी तोडफोड करू नये, इतरांना त्रास होईल, असे कृत्य मुळीच करू नये. आत्महत्येचा विषयदेखील मनात आणू नका. सुजित चव्हाण म्हणाले, आंदोलनाबाबत ज्येष्ठांकडून ज्या सूचना देतील, त्याचे तंतोतंत पालन करा. 31 जुलै रोजी श्री अंबाबाईला साकडे घालण्यासाठी आणि 9 ऑगस्टला जिल्हा बंदमध्ये पेठेची ताकद दाखवू.

महापौर सौ. शोभा बोंद्रे म्हणाल्या, आरक्षणाबाबत शासनाने तातडीने निर्णय घ्यावा. मराठा समाज आक्रमक झाला आहे. 31 जुलै रोजी आरक्षणाबाबत श्री अंबाबाईला साकडे घातले जाणार आहे. यामध्ये कोल्हापूरवासीयांनी सहभागी व्हावे. तसेच महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे.

बैठकीला छावा संघटनेचे परेश भोसले, राहुल इंगवले, माजी उपमहापौर रवीकिरण इंगवले, मोहन मालवणकर, बाबा महाडिक, श्रीकांत भोसले, भारत पाटील, मोहन साळोखे, आबाजी जगदाळे, जिजाऊ ब्रिगेडच्या सुनीता पाटील, सुधाताई सरनाईक, सुमन वाडेकर, विद्याताई पोवार, रूपाली कुराडे, कांचन पाटील, स्नेहल कुराडे, अलका शिंदे, साक्षी अतिग्रे, स्मिता हराळे, रेश्मा पोवार यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.