Wed, Mar 20, 2019 12:43होमपेज › Kolhapur › महालक्ष्मी तीर्थक्षेत्र आराखडा ८० कोटींवर

महालक्ष्मी तीर्थक्षेत्र आराखडा ८० कोटींवर

Published On: Jan 31 2018 2:03AM | Last Updated: Jan 31 2018 2:03AMकोल्हापूर : सतीश सरीकर

श्री महालक्ष्मी तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील 65 कोटींच्या पहिल्या टप्प्याला मुख्य सचिव समितीने मान्यता दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वाक्षरीने त्यावर बुधवारी शिक्‍कामोर्तब होईल. परंतु, आता आराखड्यातील विकासकामांनाही ‘जीएसटी’ लागू होईल. त्यामुळे 65 कोटींच्या आराखड्यात 18 ते 28 टक्के ‘जीएसटी’ वाढ धरल्यास तो 14 कोटी 30 लाखांनी वाढून 80 कोटींवर जाणार आहे. महापालिका प्रशासनाला त्याशिवाय निविदा प्रक्रिया राबविता येणार नाही.

श्री महालक्ष्मी तीर्थक्षेत्र विकास आराखडा 255 कोटींचा असून, त्यात टप्पे करण्यात आले आहेत. त्यांतर्गत पहिला टप्पा 65 कोटींचा झाला असून, त्याला मान्यता मिळाली आहे. आराखड्यातील 65 कोटींच्या विकासकामांत ‘जीएसटी’चा समावेश नाही. परिणामी, निविदा प्रसिद्ध करताना दर अधिक 18 ते 28 टक्क्यांपर्यंत ‘जीएसटी’ एकत्रित करून निविदा काढावी लागणार असल्याने पहिल्या टप्प्यातील आराखड्यांतर्गत करण्यात येणार्‍या कामांची किंमत वाढणार आहे.

अंतिम मंजुरीनंतर निविदा काढताना आणि प्रशासकीय मान्यता घेताना त्यात ‘जीएसटी’चा अंतर्भाव करूनच निविदा प्रसिद्ध केली जाईल. त्याबाबत बुधवारी होणार्‍या सादरीकरणावेळीच मुख्यमंत्री फडणवीस यांना माहिती देण्यात येणार असल्याचे महापालिका अधिकार्‍यांनी सांगितले.