Thu, Apr 25, 2019 14:20होमपेज › Kolhapur › महालक्ष्मी तीर्थक्षेत्र विकासासाठी ८० कोटी

महालक्ष्मी तीर्थक्षेत्र विकासासाठी ८० कोटी

Published On: Feb 01 2018 1:41AM | Last Updated: Feb 01 2018 12:51AMमुंबई : विशेष प्रतिनिधी

कोल्हापूर येथील महालक्ष्मी (अंबाबाई) देवस्थान मंदिर परिसराच्या सुमारे 80 कोटी रुपयांच्या विकास आराखड्यास बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील शिखर समितीने तत्त्वतः मान्यता दिली. विकास आराखड्यांतर्गत उभारण्यात येणार्‍या तीनही वाहनतळांवर पार्किंगची अद्ययावत माहिती देणारे डिजिटल फलक उभारून स्मार्ट वाहनतळ उभारण्याची सूचना मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी केली.

नव्या आरखड्यामुळे अंबाबाई देवस्थानी येणार्‍या लाखो भाविकांना अधिक चांगल्या सुविधा आणि सुरक्षा मिळणार असल्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी ‘पुढारी’शी बोलताना सांगितले.

मुंबईतील ‘सह्याद्री’ शासकीय अतिथीगृहात झालेल्या शिखर समितीच्या बैठकीस महसूलमंत्री तथा कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, गृह राज्यमंत्री (ग्रामीण) दीपक केसरकर, नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील, खा. धनंजय महाडिक, आ. अमल महाडिक, आ. राजेश क्षीरसागर, आ. सतेज पाटील, महापौर स्वाती यवलुजे, मुख्य सचिव सुमित मलिक, सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रधान सचिव आशिषकुमार सिंह, जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार, महापालिका आयुक्‍त डॉ. अभिजित चौधरी, पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, बिंदू चौक वाहनतळ ते मंदिर परिसर या पादचारी मार्गावर इलेक्ट्रिकल वाहने वापरण्यात यावीत. तसेच भक्‍तनिवासामध्ये सौरऊर्जेचा वापर होण्यासाठी सोय करावी. तसेच मंदिर परिसरात प्लास्टिक मुक्‍तीसाठी विशेष यंत्रणा उभारण्यात यावी. जेणेकरून हा परिसर स्वच्छ राहील. तसेच मंदिरात निर्माण होणार्‍या निर्माल्याचे तेथेच विलगीकरण करून त्यावर प्रक्रिया करण्याची यंत्रणा उभारण्यात यावी. विकास आराखड्यातील कामांवर संनियंत्रणासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.

सुविधा निर्मितीचा मार्ग मोकळा

दरम्यान, या विकास आरखड्याबाबत ‘पुढारी’शी बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, अंबाबाई मंदिरात दररोज किमान एक लाख भाविक दर्शनासाठी येतात. दिवाळी आणि नवरात्र उत्सवावेळी तर भाविकांची संख्या 9 ते 10 लाखांवर जाते. त्यामुळे मंदिर आणि आजूबाजूच्या परिसरावर ताण येतो. भक्‍तांच्या सुविधेचाही प्रश्‍न निर्माण होतो. त्यामुळे मंदिर परिसराचा विकास आराखडा तयार करण्यात आला. या आराखड्याला मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत मान्यता मिळाली असून आता या परिसराचा विकास आणि सुविधा निर्मितीचा मार्ग मोकळा झाला आहे. भाविकांना आता उन्हात दर्शनासाठी उभे रहावे लागणार नाही. दर्शन रांगेवर मंडप उभारण्यात येणार असून तेथे स्वच्छतागृहे, चप्पल स्टँड, मुलांसाठी हिरकणी कक्ष सुविधा उभारण्यात येणार आहेत.

या ठिकाणी पार्किंगची मोठी समस्या होती. विकास आराखड्यात मोठ्या प्रमाणावर पार्किंगची समस्या सुटणार आहे. तसेच बिंदू चौक ते मंदिरापर्यंत वाहनांना बंदी घालण्यात येणार आहे. तेथून भाविकांना पायी जावे लागेल. त्यामुळे या परिसरातील वाहतूक कोंडी टाळता येणार आहे. कचर्‍याचीही शास्त्रोक्‍त विल्हेवाट लावण्यात येणार असल्याने परिसर स्वच्छ राहण्यास मदत होणार आहे. जोतिबा देवस्थानाचा 25 कोटी रुपयांचा आराखडा मंजूर झाला असून कोल्हापूरच नव्हे, तर राज्यभरातून अंबाबाईच्या दर्शनासाठी येणार्‍या भाविकांना अधिक चांगल्या सुविधा नव्या आराखड्यामुळे मिळतील, असेही चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. 

गती देणार

हा आरखडा तत्काळ अंमलात आणला जाणार असून लवकरच निविदा प्रक्रिया पूर्ण केली जाईल. या आराखड्याच्या अंमलबजावणीसाठी मुख्यमंत्र्यांनी आपल्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आहे. या आराखड्याला गती देण्यात येईल. त्यामध्ये काही अनुषंगिक बदल करायचे असल्यास ते देखील करण्याचे अधिकार समितीला देण्यात आले आहेत. त्यामुळे विकास आराखडा गतीने राबविला जाईल, अशी ग्वाहीदेखील त्यांनी दिली.

दै.‘पुढारी’चे वृत्त तंतोतंत खरे ठरले...

श्री महालक्ष्मी तीर्थक्षेत्र आराखड्यातील पहिला टप्पा 65 कोटींचा आहे. परंतु, केंद्र शासनाने जीएसटी लागू केल्याने आराखड्यातील विकास कामांतही त्याचा समावेश करण्याशिवाय पर्याय नाही. परिणामी, जीएसटी लागू केल्याशिवाय महापालिकेला निविदा प्रसिद्ध करणे अशक्य आहे. त्यामुळे जीएसटीचे 14 कोटी 30 लाख जादा धरून पहिल्या टप्प्यातील आराखडा 80 कोटींवर असे वृत्त दै.‘पुढारी’मध्ये बुधवारी प्रसिद्ध करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 65 कोटींच्या आराखड्याला जीएसटीसह 80 कोटींची मंजुरी दिली. दै.‘पुढारी’तील वृत्त तंतोतंत खरे ठरले.

अंबाबाई मंदिर परिसरात ही विकास कामे होणार 

महानगरपालिका आयुक्‍त चौधरी यांनी आराखड्याचे सादरीकरण केले. हा परिसर विकास आराखडा 80 कोटी रुपयांचा आहे. यामध्ये मंदिर परिसरात सुमारे 1250 भाविक क्षमतेचा दर्शन मंडप (8.73 कोटी) उभारण्यात येणार असून त्यामध्ये शौचालय, पिण्याचे पाणी, पादत्राणे ठेवण्याची व्यवस्था असणार आहे. व्हीनस कॉर्नरजवळ 8500 चौ.मी. क्षेत्रावर भक्‍तनिवास (21.48 कोटी) उभारण्याचे प्रस्तावित असून यामध्ये 138 खोल्या, 10 सूट, 18 हॉल (डॉरमेटरी) असणार आहेत. तसेच 240 क्षमतेचे बहुमजली वाहनतळ (11.03 कोटी), डायनिंग हॉल, दुकाने आदींचाही समावेश आहे. बिंदू चौक (4.89 कोटी) येथे 4841 चौ.मी. बहुमजली वाहनतळ उभारण्यात येणार असून यामध्ये 170 चारचाकी व 315 दुचाकी पार्क करण्याची क्षमता असेल. तर सरस्वती थिएटर (7.01 कोटी) येथे 2200 चौ.मी. क्षेत्राचे बहुमजली वाहनतळ उभारण्यात येणार आहे. यामध्ये 140 चारचाकी व 145 दुचाकी वाहने पार्किंगची क्षमता आहे. याशिवाय मंदिराभोवताली पादचारी मार्ग व बिंदू चौक ते भवानी मंडपापर्यंत पादचारी मार्ग (2.65 कोटी), शहरात दिशादर्शक फलक (0.06 कोटी), शौचालय, पिण्याचे पाणी आदी सार्वजनिक सुविधा (1.87 कोटी), मंदिरच्या आसपासच्या क्षेत्राचे सौंदर्यीकरण (0.94 कोटी), आपत्ती व्यवस्थापन सुविधा (1.60 कोटी), सार्वजनिक परिवहन व्यवस्थेसाठी (1.31 कोटी), सेवा वाहिनी स्थलांतर (2.91 कोटी), आरोग्य सुविधा (52 लाख) आदींचा विकास आराखड्यात समावेश आहे.