Thu, Jul 18, 2019 06:17होमपेज › Kolhapur › ‘गाईड्स’साठी 8 प्रकाशकांची बालभारतीकडे नोंदणी

‘गाईड्स’साठी 8 प्रकाशकांची बालभारतीकडे नोंदणी

Published On: Jun 19 2018 1:32AM | Last Updated: Jun 19 2018 12:20AMकोल्हापूर : डी. बी. चव्हाण 

पाठ्यपुस्तकावरील मार्गदर्शक पुस्तके, गाईड्स यांना शिक्षण खात्याने अधिकृत स्वरुप बहाल केले आहे. ही पुस्तके प्रकाशित करण्यासाठी प्रकाशन संस्थांकडून परवानगी देण्यात येणार आहे. त्यासाठी बालभारती या शिक्षण खात्याच्या संस्थेकडे ऑनलाईन अर्ज मागवून घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. आतापर्यंत आठ प्रकाशकांनी नोंदणी केली आहे.

ऑनलाईन अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया 20 दिवसांपूर्वी सुरू झाली आहे. आतापर्यंत 8 प्रकाशकांनी अर्ज सादर केले आहेत, तर 25 हून अधिक प्रकाशकांनी  माहिती करून घेतली  आहे, अशी माहिती बालभारतीचे अधीक्षक सामंत यांनी दिली.

 दरम्यान, या प्रकाशनासाठी बालभारतीने अव्वाच्या सव्वा शुल्क आकारले असल्याने प्रकाशकांतून नाराजी व्यक्‍त केली जात आहे. तसेच शुल्क कमी करा, अशी मागणी प्रकाशकांनी शिक्षण विभागाकडे केली आहे. 

 विद्यार्थ्यांना अभ्यासाचा ताण न देता पत्र लेखन, निबंधापासून ते क्षेत्र अभ्यासाच्या बेतीव आणि एकसुरी उत्तरे पुरविणार्‍या गाईड्सवर अनेक विद्यार्थी आणि पालकांचा भर असतो. गेल्या काही दशकांमध्ये अशी गाईड्स पुरविणार्‍या प्रकाशन संस्थांमध्ये मोठी वाढ झाली आहे. यातून या संस्था बेकायदेशीररित्या लाखो रुपये मिळवतात. शासनाला यातून काही मिळत नाही. यामुळे या प्रकाराला आळा घालण्यासाठी बालभारतीने गाईड्सना मान्यता देण्याचे धोरण जाहीर केले आहे. त्यामुळे पाठ्यपुस्तकावर आधारित ही मार्गदर्शक पुस्तके किंवा गाईड्स आता उपलब्ध होणार आहे. गाईड्सला पूर्वी बंदी होती. आता तर शिक्षण खात्याच्या अधिकृत मान्यतेने ही गाईड्स मिळणार आहे. 

यामुळे आतापर्यंत घरी बसून टाचण काढून वर्गात गेल्यानंतर त्या टाचणप्रमाणे शिक्षकाने विद्यार्थ्यांना शिकवायची पध्दत होती. आता मात्र शिक्षकांना घरी टाचण काढण्याचे खूप कष्ट घेण्याची गरज उरणार नाही. थेट वर्गात गाईड्स घेऊन शिकवता येणार आहे. तसेच त्या गाईड्समध्ये पाहून शिक्षक विद्यार्थ्यांना प्रश्‍न सांगू शकणार आहे,  प्रश्‍न उत्तरे सांगू शकणार आहे. 

शुल्क भरण्यास प्रकाशकांचा विरोध

एकीककडे मार्गदर्शक पुस्तिका म्हणून गाईड्सला मान्यता देण्यात येत आहे. दुसर्‍या बाजूला आजवर चोरीछुपे गाईड्सचे प्रकाशन करणार्‍या संस्थातून शुल्क भरण्याबाबत विरोध होताना दिसत आहे. त्यामुळे शुक्रवारपासून शाळा सुरू होऊनही विद्यार्थ्यांना पहिली आणि दहावी या वर्गाची बदलेली पुस्तके आणि पहिलीपासून दहावीपर्यंतची गाईडस बाजारात उपलब्ध झालेली 
नाहीत. 
 

परवानगी न घेणार्‍या प्रकाशकांवर कारवाईचा बडगा

 जी गाईडस बाजारात येतात, ती बालभारतीच्या पुस्तकाच्या आधारावर असतात, त्यामुळे अशी गाईडस छापण्यापूर्वी कॉपी राईट अ‍ॅक्टनुसार प्रकाशकांनी बालभारतीची परवानगी घेणे आवश्यक होते. पण एकही प्रकाशक तशी परवानगी घेत नव्हते, असे बालभारतीचे अधिकारी सामंत यांनी सांगितले. 

त्यामुळे कॉपी रायटर अ‍ॅक्टनुसार गाईड्स प्रकाशित करण्यासाठी परवानगी देण्यात येणार आहे. जे प्रकाशक परवानगी न घेता मार्गदर्शक पुस्तके प्रकाशित करणार आहेत, अशा संस्थांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे बालभारतीकडून जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे गाईड्स प्रकाशित करणार्‍यांची मोठी पंचायत झाली आहे.

बालभारतीने जाहीर केलेले धोरण....

•     पुस्तके छापील स्वरुपात प्रकाशित करण्यासाठी प्रत्येक इयत्तेच्या प्रत्येक माध्यमाच्या प्रत्येक पुस्तकासाठी दरवर्षी 63 हजार रुपये शुल्क प्रकाशकांना द्यावे लागणार आहे.
•    प्रश्‍नावली प्रकाशित करण्यासाठी हे शुल्क दरवर्षी प्रत्येक पुस्तकासाठी 31 हजार रुपये असेल, तर डिजिटल साहित्यासाठी हे मूल्य दरवर्षी प्रत्येकी 35 हजार रुपये असणार आहे.
•    प्रकाशकांना दरवर्षी परवान्यांचे नूतनीकरण करावे लागणार आहे. 
•    वार्षिक उलाढाल 10 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या प्रकाशकांना शुल्क भरावे लागणार नाही.