होमपेज › Kolhapur › जिल्ह्यात 8 नव्या पुलांना मंजुरी

जिल्ह्यात 8 नव्या पुलांना मंजुरी

Published On: Mar 16 2018 12:45AM | Last Updated: Mar 16 2018 12:45AMकोल्हापूर : सुनील सकटे 

सार्वजनिक बांधकाम विभागाने नाबार्ड पाठविलेली जिल्ह्यातील रस्ते आणि पुलांची 26 कोटी 94 लाख 35 हजार रुपयांच्या कामांना मंजुरी दिली आहे. पहिल्या टप्प्यात चार कोटी 18 लाख 39 हजार रुपयांची तरतूद केली झाली आहे. या निधीतून जिल्ह्यातील 3 रस्ते आणि 8 नवीन पूल अशी 11 कामे केली जाणार आहेत. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रयत्नातून या निधीवर शिक्‍कामोर्तब होण्यास मदत झाली आहे. 

सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे जिल्ह्यातील रस्ते आणि पुलांच्या कामांसाठी नाबार्डकडे प्रस्ताव पाठविण्यात आले होते. नाबार्डकडून 11 कामांचे प्रस्ताव मंजूर केले आहे. मंजूर प्रस्तावामध्ये रस्त्यांचे तीन आणि पुलांचे आठ प्रस्तावांचा समावेश आहे. या कामामुळे जिल्ह्यातील पुलांचा बहुतांशी प्रश्‍न मार्गी लागला आहे. आजरा तालुक्यातील उत्तूर धामणे प्रजिमा 81 रस्त्यावर सहा लाख 28 हजार रुपयांचा लहान पूल बांधण्यात येणार आहे. त्यासाठी 97 हजार 500 रुपयांची तरतूद केली आहे. आजरा तालुक्यातील आंबोली-आजरा- गडहिंग्लज संकेश्‍वर या मार्गावरएक कोटी 47 लाख 30 हजार रुपये खर्चाचा लहान पूल बांधण्यास मान्यता दिली आहे. यासाठी 22 लाख 87 हजार रुपयांची तरतूद केली आहे.करवीर तालुक्यातील घोडतळी, आंबेडकर कॉलनी, ते रामा 194 खुपीरे पाणंद, खडक भोगावती धरण, प्रजिमा 85 या रस्त्याच्या सुधारणेसाठी दीड कोटीचा प्रस्ताव मंजूर असून 23 लाख 29 हजार रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.  

आजरा तालुक्यातील कडगाव, ममदापूर, देवकांडगाव या मार्गावर एक कोटी 76 लाख 40 हजार खर्चाचा पूल बांधण्यात येणार असून त्याकरिता 27 लाख 39 हजार रुपयांची तरतूद केली आहे. आजरा तालुक्यातील चंदगड, इब्राहिमपूर, महागाव, चितळे, जेऊर आजरा या मार्गावर एक कोटी 88 लाख 60 हजार खर्चाचा लहान पूल बांधण्यात येणार आहे. त्यासाठी 29 लाख 29 हजार रुपयांची तरतूद आहे. गडहिंग्लज तालुक्यातील आजरा महागाव वैरागवाडी, हलकर्णी या मार्गावर एक कोटी 90 लाख 50 हजार रुपयांचा पूल बांधण्यात येणार आहे. त्यासाठी तीस लाख रुपयांची तरतूद आहे.  भुदरगड तालुक्यातील गारगोटी, पुष्पनगर, सोनारवाडी, मदूर, शेणोली, ममदापूर, वेसरडे, बागेवाडी, उकीरभटाळे, शिरगाव या मार्गावर एक कोटी 94 लाख 30 रुपये खर्चाचा लहान पूल बांधण्यात येणार आहे. त्यासाठी तीन लाख 17 हजार रुपयांची तरतूद केली आहे. 

राधानगरी तालुक्यातील गुडाळ करंजफेण, शिरोली, राधानगरी, फराळे या मार्गाच्या दुरुस्तीसाठी एक कोटी 94 लाख 40 हजार रुपयांचा प्रस्ताव मंजूर असून  30 लाख 19 हजार रुपयांची तरतूद झाली आहे. शिरोळ तालुक्यातील कुरुंदवाड, शिरोळ या मार्गावर दोन कोटी 39 लाख 70 हजार रुपयांचा प्रस्ताव मंजूर असून 37 लाख 22 हजार रुपयांची तरतूद आहे. करवीर तालुक्यातील निगवे, कावणे, वडकशिवाले,इस्पुर्ली, दिंडनेर्ली, दर्‍याचे वडगांव, कोगील, कणेरी, गोकुळ शिरगांव औद्योगिक वसाहत नेर्ली, हलसवडे, पट्टणकोडोली,  या रस्त्याची दुरुस्तीचा तीन कोटींचा प्रस्ताव मंजूर केला आहे. पहिल्या टप्प्यात 46 लाख 59 हजार रुपयांची तरतूद आहे. राधानगरी तालुक्यात शिरगाव आमजाई व्हरवडे, चक्रेश्‍वरवाडी  मार्गावर भोगावती नदीवर आठ कोटी 50 लाख 35 हजार रुपयांचा मोठ्या पुलाचा प्रस्ताव मंजूर आहे. त्यासाठी एक कोटी 32 लाख पाच हजार रुपये मंजूर आहेत.