होमपेज › Kolhapur › नगरपालिकांचा आठ कोटींचा निधी परत

नगरपालिकांचा आठ कोटींचा निधी परत

Published On: Jun 21 2018 1:36AM | Last Updated: Jun 20 2018 11:45PMकोल्हापूर : अनिल देशमुख

एकीकडे निधी नाही म्हणून विकासकामे रेंगाळल्याचे चित्र असताना, दुसरीकडे आलेला निधी वेळेत खर्च न करता आल्याने तो परत करण्याची वेळ जिल्ह्यातील सहा नगरपालिकांवर आली आहे. विशेष म्हणजे, 2012 ते 2015 या कालावधीतील हा निधी असून, तो अद्याप खर्च झाला नव्हता. आठ नगरपालिकांनी असा 8 कोटी 4 लाख रुपयांचा निधी राज्य शासनाला परत केला आहे.

राज्य शासनाने विविध योजनांतर्गत विकासकामांसाठी नगरपालिकांना निधी दिला होता. त्यासाठी खर्च करण्याची मुदतही देण्यात आली होती. मात्र, हातात आलेला निधी विकासकामांवर खर्च करण्यात नगरपालिका प्रशासनाला अपयश आले. पाच-दहा लाखांच्या निधीतूनही विकासकामे होतात, त्याद‍ृष्टीने नगरपालिकांचा परत गेलेला निधी पाहता विकासाबाबत नगरपालिका किती गंभीर आहेत, हे स्पष्ट होते. खर्च न केलेला निधी तत्काळ परत करण्याचे आदेश नगरविकास विभागाने दिले होते. त्यानुसार निधी परत करण्याची कार्यवाही सुरू आहे.

निधी खर्च न होण्याची तांत्रिक, प्रशासकीय अशी काही कारणे आहेत. मात्र, निधी परत जातो, हे वास्तव आहे. एकीकडे, विकासकामांसाठी निधी मिळवताना प्रचंड कसरत करावी लागत आहे. विविध योजनांद्वारे निधी मिळवण्यासाठी अनेक महिने खर्च करावे लागत आहेत. असे असतानाही आलेला निधी परत जात असेल, तर याबाबत प्रशासनासह लोकप्रतिनिधींनी गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे.
इचलकरंजी नगरपालिकेचा 1 कोटी रुपयांचा वैशिष्ट्यपूर्ण योजनेचा, तर 15 लाख रुपये अल्पसंख्याक विकासकामांचे परत गेले आहेत. कुरूंदवाड नगरपालिकेचा तीर्थक्षेत्र विकासाचा 29 लाख, अल्पसंख्याकचा 12 लाख, वैशिष्ट्यपूर्ण योजनेचा 66 लाख, तर अग्‍निशमनचा 11 लाख रुपयांचा निधी परत गेला आहे.

जयसिंगपूर नगरपालिकेचा दलित वस्ती सुधार योजनेंतर्गत 2013-14 चा 19 लाख, तर 2014-15 चा 18 लाख असा सलग दोन वर्षांचा, तर वैशिष्ट्यपूर्ण योजनेचा 26 लाख रुपयांचा निधी खर्च न होता परत गेला आहे. वडगाव नगरपालिकेला राज्यस्तरीय योजनेतून अग्‍निशमन दलासाठी 20 लाखांचा निधी आला होता, तो खर्च न झाल्याने परत गेला आहे. मलकापूर नगरपालिकेचाही वैशिष्ट्यपूर्ण योजनेसाठी आलेला 50 लाखांचा निधी परत करावा लागला आहे.

सर्वाधिक 4 कोटी 38 लाखांचा निधी गडहिंग्लज नगरपालिकेचा परत गेला आहे. अल्पसंख्याक, वैशिष्ट्यपूर्ण योजना आणि तीर्थक्षेत्र विकासासाठी 2013 ते 15 या दोन वर्षात आलेला हा निधी खर्च झाला नाही. तो राज्य शासनाला परत करण्यात आला आहे. दरम्यान, कागल नगरपालिकेचाही निधी अद्याप खर्च झालेला नाही. हा निधी खर्च करण्यासाठी कागल नगरपालिकेने मुदतवाढ मागितल्याचे नगरपालिका प्रशासन विभागाकडून सांगण्यात आले.