Sun, Dec 16, 2018 23:02



होमपेज › Kolhapur › पुढील वर्षाचा ८,२७६ कोटींचा संभाव्य वित्तपुरवठा आराखडा

पुढील वर्षाचा ८,२७६ कोटींचा संभाव्य वित्तपुरवठा आराखडा

Published On: Dec 03 2017 1:29AM | Last Updated: Dec 03 2017 1:00AM

बुकमार्क करा





कोल्हापूर : प्रतिनिधी 

जिल्ह्याचा पुढील आर्थिक वर्षाचा (2018-19) 8,276 कोटी 9 लाख रुपयांचा संभाव्य वित्तपुरवठा आराखडा शनिवारी जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी जाहीर केला. जिल्हास्तरीय सल्लागार समितीच्या बैठकीमध्ये नाबार्डचे जिल्हा विकास अधिकारी नंदू नाईक यांनी याबाबतची अधिक माहिती दिली. 

नाबार्डद्वारे दरवर्षी देशातील प्रत्येक जिल्ह्यासाठी तयार केला जाणारा संभाव्य वित्त आराखडा हा महत्त्वाचा दस्तऐवज असून, केंद्र शासन, विविध शासकीय, निमशासकीय कार्यालये वित्त आराखड्याचा सुयोग्य वापर करून जिल्ह्याची पत योजना तयार केली जाते, असे सुभेदार यांनी सांगितले. 

संभाव्य वित्तपुरवठा आराखड्यामध्ये शेती व शेतीपूरक क्षेत्रासाठी 4,685 कोटी, सूक्ष्म-लघु आणि मध्यम उद्योगांसाठी 2,646 कोटी 43 लाख आणि प्राथमिक क्षेत्रासाठी 944 कोटी 46 लाख रुपये प्रस्तावित करण्यात आले आहेत. शेतीपूरक क्षेत्रासाठी प्रामुख्याने पीक कर्जासाठी 2,857 कोटी 58 लाख, सिंचनासाठी 561 कोटी 40 लाख, शेती यांत्रिकीकरणासाठी 388 कोटी, दुग्ध व्यवसायासाठी 426 कोटी 48 लाख, कुक्कुटपालनासाठी 35 कोटी, शेळी-मेंढी पालनासाठी 38 कोटी, गोदामे आणि शीतगृहांसाठी 117 कोटी 49 लाख, भूविकास आणि जमीन सुधारणेसाठी 60 कोटी 55 लाख, शेतीमाल प्रक्रिया उद्योगासाठी 100 कोटी प्रस्तावित करण्यात आले आहेत. 

इतर प्राथमिक क्षेत्रामध्ये प्रामुख्याने गृह कर्जासाठी 567 कोटी, शैक्षणिक कर्जासाठी 162 कोटी इतका वित्तपुरवठा प्रस्तावित करण्यात आला आहे. तर महिला बचतगटांसाठी सुमारे 62 कोटींचा विशेष वित्तपुरवठा प्रस्तावित केला आहे. यावेळी आमदार डॉ. सुजित मिणचेकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार, भारतीय रिझर्व्ह बँकेचे सहायक महाप्रबंधक पी. एस. पराते, जिल्हा अग्रणी बँकेचे प्रबंधक एस. जी. किणिंगे प्रमुख उपस्थित होते.