Tue, Jul 23, 2019 11:44होमपेज › Kolhapur › जिल्ह्यातील 79 सराईत होणार तडीपार?

जिल्ह्यातील 79 सराईत होणार तडीपार?

Published On: Jul 12 2018 1:41AM | Last Updated: Jul 11 2018 11:31PMकोल्हापूर : प्रतिनिधी

कोल्हापूरपाठोपाठ इचलकरंजी, शहापूर, जयसिंगपूर, कुरूंदवाड परिसरात बोकाळलेल्या गुंडागर्दीसह काळ्याधंद्यांचे साम्राज्य रोखण्यासाठी गंभीर गुन्ह्यांतील रेकॉर्डवरील 79 सराईतांना दोन वर्षांसाठी जिल्ह्यातून तडीपारीच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. इचलकरंजी, जयसिंगपूर उपविभागातील 4 संघटित टोळ्यांवरील ‘मोका’सह 79 जणांच्या तडीपारीचे प्रस्ताव पोलिस अधीक्षकांकडे दाखल झाले आहेत. त्यामुळे गुन्हेगारी वर्तुळात खळबळ उडाली आहे. 

खून, खुनाचा प्रयत्न, गर्दी-मारामारीसह खंडणी वसुली, अपहरण, खासगी सावकारी आणि घातक शस्त्रांच्या वाढत्या तस्करीमुळे इचलकरंजी, जयसिंगपूर उपविभाग संवेदनशील बनतो आहे. त्यात परप्रांतीय तस्करांच्या वर्दळीमुळे घातक शस्त्रांचीही रेलचेल वाढली आहे. स्थानिक पोलिस यंत्रणेच्या बेफिकिरीचा पुरेपूर फायदा सराईत टोळ्या घेऊ लागल्या आहेत. पोलिस यंत्रणेचा नामचिन गुन्हेगार, काळेधंदेवाल्यांवर धाक आहे की नाही? अशीच शंकास्पद स्थिती निर्माण झाली आहे.

वरिष्ठांच्या आदेशाला कोलदांडा

वरिष्ठांच्या आदेशाला कोलदांडा देण्याची प्रथा जिल्ह्यात नव्याने सुरू झाली आहे. ‘चिरीमिरी’ला सोकावलेल्या झारीतील शुक्राचार्यांकडून वरिष्ठांच्या आदेशाची केवळ तात्पुरत्या स्वरूपात मलमपट्टी केली जाते. कारवाईचा देखावा मांडला जातो. ‘पुन्हा ये रे माझ्या मागल्या...’ या स्थितीमुळेच इचलकरंजीसह जयसिंगपूर उपविभागात शांतता व सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजले आहेत. ही वस्तुस्थिती वरिष्ठाधिकारी नाकारत नाहीत.

5 दिवसांत 79 तडीपारीचे प्रस्ताव

पोलिस उपअधीक्षक कृष्णांत पिंगळे यांनी अवघ्या पाच दिवसांत दोन्ही उपविभागातील संघटित टोळ्यांतील गुंडापुंडांसह काळेधंदेवाल्यांविरुद्ध विशेष मोहीम राबविली आहे. इचलकरंजीतील 44, जयसिंगपुरातील 35 सराईतांसह चार संघटित टोळ्यांतील साथीदारांविरुद्ध कारवाईचे प्रस्ताव विशेष पोलिस महानिरीक्षक, पोलिस अधीक्षकांकडे दाखल केले आहेत. तब्बल 79 गुन्हेगारांना दोन वर्षांसाठी कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातून तडीपारीच्या प्रस्तावाचा अंतर्भाव आहे. तर चार टोळ्यांतील 15 जणांवर ‘मोकां’तर्गत कारवाईचा प्रस्ताव आहे.

तडीपार सप्‍ताहाचा दणका!

जयसिंगपूर विभागातील तडीपार प्रस्तावांतर्गत नावे पुढीलप्रमाणे-शिवराज पोवार, जावेद दानवडे, शशिकांत सुतार, अल्‍लाबक्ष शेख, विष्णू कलगुटगी, नामदेव शिंदे, वैभव नाईक, अश्‍विन निर्मळे, जयसिंग बुधवले, प्रकाश माने, संभाजी नंदीवाले, धनेश बनपट्टी, विश्‍वास धनगर, प्रताप माने यांचा समावेश आहे.

महिलांवरही बडगा

इचलकरंजी येथील प्रस्तावित यादीत टोळीप्रमुख विशाल माछरे, नरेश नवले, शशिकांत घारुंगे, सतीश भाट, बाळू कोळी, सदाशिव कोरवी (कोरवी गल्‍ली), टोळीप्रमुख दीपक नेतले, विक्रम नगरकर, संध्या नेतले, रंजिता घमंडे, कला गागडे, नंदा नेतले, शोभा गागडे, टोळीप्रमुख ओंकार डकरे, राजेंद्र तळकर, राहुल माने, जीवन जाधव, दत्तात्रय डकरे, आनंद जाधव, दीपक कडगावे, किरण मोरे, महेश व्हनाळ, कुरूंदवाड येथील आनंदा पाटील, संगीता तराळ, कल्पना निकम, विजय कांबळे, प्रकाश कांबळे, शहापूर येथील प्रियांका संतोष बागडी, धर्मेश मिणेकर यांचा समावेश आहे.

देसाई, मकोटेसह  8 संशयित ‘रडार’वर

महाराष्ट्र पोलिस अधिनियम 1951 चे कलम 56 प्रमाणे इचलकरंजी येथील अभिजित देसाई, समरजित पाटील, हुसेन मेहबुब शेख, तानाजी कांबळे, विकी ऊर्फ विकास मकोटे, रियाज सावळगी, दादाखान मोकाशी, मनोज जगदाळे हे ‘रडार’वर आहेत