Fri, Jul 10, 2020 08:17होमपेज › Kolhapur › ‘दोषसिद्धी’साठी 78 केस अधिकारी नियुक्‍त

‘दोषसिद्धी’साठी 78 केस अधिकारी नियुक्‍त

Last Updated: Nov 18 2019 1:26AM
कोल्हापूर : दिलीप भिसे

खून, दरोड्यासह महिलांवरील अत्याचार, सावकारीतून होणारी पिळवणूक, संघटित टोळ्यांवर वचक ठेवण्यासाठी प्रभावी कारवाईच्या उपाययोजनांसह न्यायप्रविष्ट संवेदनशील खटल्यांत दोषसिद्धीचा आलेख वाढवून समाजकंटकांना कठोर प्रायश्‍चित्त होण्यासाठी कोल्हापूर पोलिसांनी ‘अभिनव’ उपक्रमाचा अंमल सुरू केला आहे. जिल्ह्यात अतिसंवेदनशील ठरलेल्या तब्बल 318 खटल्यांत आरोपींविरुद्ध भक्‍कम पुरावे, तांत्रिक बाबींच्या पाठपुराव्यासाठी 78 केस अधिकार्‍यांच्या नियुक्‍तींचे फर्मान काढण्यात आले आहे.

मुंबई, ठाणे पोलिसांच्या धर्तीवर पश्‍चिम महाराष्ट्रात प्रथमच कोल्हापूर पोलिस दलामार्फत हा अभिनव प्रयोग साकारण्यात येत आहे. प्रभावी क्षमतेने उपाययोजनांचा अंमल झाल्यास वर्षात सरासरी 16 टक्क्यांवरून 45 ते 50 टक्क्यांवर दोषसिद्धीचे प्रमाण अपेक्षित आहे, असा विश्‍वास वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांनी व्यक्‍त केला आहे. पोलिस अधीक्षक, अप्पर अधीक्षक व उपअधीक्षक दर्जाच्या अधिकार्‍यांचे त्यावर नियंत्रण राहणार आहे.

अत्याचारासह संवेदनशील गुन्ह्यांचा समावेश

संवेदनशील गुन्ह्यांच्या तपासाची प्रक्रिया पूर्ण करून आरोपपत्र झालेल्या जिल्ह्यातील एकूण खटल्यांपैकी  318 गुन्हे अतिगंभीर म्हणून निश्‍चित करण्यात आले आहेत. राजकीय वैमनस्य, गँगवार, आर्थिक वाद, अनैतिक, खंडणी वसुलीसह अपहरणातून झालेले अमानुष खून, युवतींचे अपहरण, अत्याचार, अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण, खासगी सावकारीतून पिळवणूक, खंडणी वसुली, जमीन वादातील भीषण घटना, दरोड्यासह लूटमार, ठकबाजी, चेनस्नॅचिंग गुन्ह्यांचा संवेदनशील खटल्यांत समावेश करण्यात आला आहे. 

आजपासूनच अधिकार्‍यांवर जबाबदारीची निश्‍चिती!

कोल्हापूर पोलिस दलातील 78 वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांवर 318 खटल्यांची कायदेशीर पूर्तता, भक्‍कम पुराव्यांसह तांत्रिक बाबींच्या पूर्ततेची  जबाबदारी निश्‍चित करण्यात आली आहे. दैनंदिनी कामाचा व्याप हाताळून खटल्यावर ‘केस अधिकार्‍यांना’ खटल्यांवर लक्ष केंद्रित करावे लागणार आहे. वरिष्ठस्तरावर झालेल्या निर्णयाच्या अंमलबजावणीला उद्या, सोमवारी (दि. 18) सुरुवात होत आहे. कायदेशीर बाबींच्या पूतर्तेसाठी विधि अधिकार्‍यांचे सहाय्य होणार आहे.
तांत्रिक उणिवांमुळे सराईत

गुंड-पुंड पुन्हा मोकाट!

कोल्हापूर, सांगलीसह परिक्षेत्रात गुन्हे सिद्धीकरणाचे प्रमाण अत्यल्प होते. दोन वर्षांत 16 ते 18 टक्क्यांवर प्रमाण गेले आहे. तपासातील तांत्रिक उणिवा, सबळ पुराव्यांअभावी अनेक महत्त्वाच्या, गाजलेल्या खटल्यांतही संशयितांना त्याचा फायदा मिळू शकतो. हे प्रकार टाळून गुन्हे सिद्धतेचे प्रमाण अधिकाधिक वाढविण्यासाठी पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच भाग म्हणून केस अधिकार्‍यांच्या नियुक्‍तीचा महत्त्वाकांक्षी निर्णय घेण्यात आला आहे.

ठाणे जिल्ह्यात प्रभावी अंमल

अप्पर पोलिस अधीक्षक श्रीनिवास घाटगे ठाणे जिल्ह्यात कार्यरत असताना त्यांनी ‘केस अधिकारी’ हा उपक्रम प्रभावीपणे राबविला. वर्ष, दीड वर्षात त्याचे परिणाम जाणवू लागले. गुन्हे सिद्धतेच्या प्रमाणात झपाट्याने वाढ होत असताना संघटित गुन्हेगारांसह समाजकंटकांना कारावास भोगावा लागतो आहे. भूखंड माफियांच्या दहशतीला आळा बसला. कारवाईच्या धास्तीने ठाण्यातील सराईत टोळ्या अन्य जिल्ह्यांत आश्रयाला गेल्याच्या घटना आहेत. त्याच धर्तीवर हा उपक्रम कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात राबविण्यात येत आहे.

शहर, जिल्ह्यातील गुन्हेगारीला रोखण्यासह समाजकंटकांवर कायद्याचा वचक ठेवण्यासाठी ‘केस अधिकारी’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. प्रलंबित गुन्ह्यांचा निपटारा आणि संशयितांना कठोर प्रायश्‍चित्त होण्यासाठी महत्त्वाचे पुरावे, तांत्रिक बाबींची उपलब्धतता करणे सोयीचे ठरणारे आहे. जिल्ह्यात हा उपक्रम प्रभावीपणे राबविण्यात येईल.
- डॉ. अभिनव देशमुख, पोलिस अधीक्षक