होमपेज › Kolhapur › ‘थर्टी फर्स्ट’ला सात हजार बकरी, ४० हजार कोंबड्या फस्त

‘थर्टी फर्स्ट’ला सात हजार बकरी, ४० हजार कोंबड्या फस्त

Published On: Jan 01 2018 1:55AM | Last Updated: Jan 01 2018 1:55AM

बुकमार्क करा
कोल्हापूर : प्रतिनिधी

सात हजारांवर बकरी, 40 हजारांवर कोंबड्या अन् 4 टन मासे फस्त करत जिल्ह्यातील नागरिकांनी रविवारी ‘थर्टी फर्स्ट’ साजरा केला. रविवार असल्याने मांसाहारावर ताव मारणार्‍यांची संख्या अधिक राहिली. रात्री उशिरापर्यंत ‘थर्टी फर्स्ट’चा जल्लोष सुरू होता.

सुट्टी आणि त्यात रविवार आल्याने अनेकांनी ‘थर्टी फर्स्ट’चे सेलिब्रेशन जल्लोषात केले. त्याची लगबग सकाळपासूनच दिसत होती. मटण-मासे खरेदीसाठी सकाळपासूनच गर्दी झाली होती. अनेक दुकानांसमोर रांगा लागल्याचेही चित्र होते. मटण-मासे खरेदीसाठी झालेली गर्दी नियंत्रित करताना दुकानदारांचीही चांगलीच दमछाक होत होती. दिवसभरात जिल्ह्यात सुमारे 7 हजारांवर बकरी, 40 हजारांवर कोंबड्यांची विक्री झाल्याचे सांगण्यात आले. दोन दिवसांत जिल्ह्यात सुमारे साडेचार टन माशांची आवक झाली होती, रात्रीपर्यंत सुमारे 4 टन मासे संपल्याचे सांगण्यात आले. आठवडी बाजारातही कोंबड्या खरेदीला मोठी गर्दी झाली होती.

मटणाची मागणी आज अधिक वाढली. मागणीच्या तुलनेेत पुरवठाही झाला. यामुळे गर्दी असली तरी मटणाचे दर वाढवण्यात आले नाहीत. पूर्वीच्या दरानेच बहुतांश सर्वच ठिकाणी मटणाची विक्री झाल्याचे खाटिक समाजाचे अध्यक्ष जयदीप घोटणे यांनी सांगितले.

मटण-मासे याबरोबरच मद्य विक्रीचीही मोठी उलाढाल झाली. जिल्ह्यात ‘थर्टी फर्स्ट’साठी एक लाखापेक्षा अधिक लोकांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून परमिट घेतल्याचे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकार्‍याने सांगितले.