Mon, May 20, 2019 20:16होमपेज › Kolhapur › कोल्हापूरच्या लाचलुचपत कारवाईत ७० टक्के वाढ

कोल्हापूरच्या लाचलुचपत कारवाईत ७० टक्के वाढ

Published On: Jul 19 2018 1:37AM | Last Updated: Jul 19 2018 1:37AMकोल्हापूर : विजय पाटील

कोल्हापुरातील विविध सरकारी विभागांत लाचखोरी मोठ्या प्रमाणावर वाढत चालली आहे. अख्खी कार्यालयेच संगनमताने लाच घेतल्याशिवाय सामान्य माणसांचा कागद पुढे सरकवत नाहीत, हे यापूर्वी झालेल्या कारवाईवरून स्पष्ट झाले आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई अत्यंत सरस असून तुलनेेने ही वाढ 70 टक्के इतकी आहे. हक्‍कासाठी लाच का घेताय, असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे.

काम कुणाचेही असो! लाच दिल्याशिवाय करायचं नाही, असं बहुतांश सरकारी अधिकारी व कर्मचार्‍यांनी पक्‍कं ठरवलं आहे की काय, अशी शंका येण्यासारखे प्रकार समोर येत आहेत. लाच दिली तरच काम; अन्यथा त्रुटी काढून ते  रद्द करण्यासारख्या गंभीर तक्रारी  होत आहेत. भारत बटालियनच्या पोलिस उपअधीक्षकासह सहा संशयितांवर नुकतीच कारवाई केली. या प्रकरणाने खळबळ उडाली. कारण, जवानांकडून कोणत्याही कारणावरून लाच मागितली जात असल्याचे यावरून समोर आले. एकाच विभागातील सहा जण बिनधोकपणे लाच मागतात आणि स्वीकारतात हे अनाकलनीय आहे. यापूर्वी पन्हाळा येथील दुय्यम निबंधक अधिकार्‍यासह अख्खं कार्यालय लाच घेताना सगळ्यांनी पाहिलेले आहे. या घटनेनंतर आता भारत बटालियन विभागातही लाचेचे सामूहिक प्रकरण समोर आले.

तंत्रज्ञानान वाढलं, लोकांना कायदे माहीत झाले, असं म्हणताना लाचखोरी कमी होईल असं एक सकारात्मक चित्र जाणकांराना दिसत होतं; पण लाचेचा राक्षस अधिकच मोठा होऊ लागला आहे.

कोल्हापूरचा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने यंदा जोरदार कारवाई केली आहे. गतवर्षी म्हणजे 1 जानेवारी 17 ते  17 जुलै  2017 या  कालावधीत एसीबीचे 12 सापळे यशस्वी झाले होते. यंदा हाच आकडा 20 इतका वाढला आहे. राज्यात कारवाईच्या अनुषंगाने कोल्हापूरचा एसीबी विभागाचा वेग सतत वाढत आहे. कारवाई वाढत असूनही लाचखोरांनी मात्र यातून फारसं शहाणपण घेतलेलं दिसत नाही

सामूहिक कारवाईचे रेकॉर्ड? 

एसीबीच्या एका कारवाईत शक्यतो एक जण लाच स्वीकारताना रंगेहाथ सापडतो, असे चित्र असते; पण एसीबीच्या यापूर्वी झालेल्या कारवाईवर नजर टाकली, तर पन्हाळा दुय्यम निबंधक अधिकार्‍यासह अख्ख्या कार्यालयावर कारवाई करण्यात आली आहे. कागल तहसीलदारांसह तलाठी व इतर सहकार्‍यांवर कारवाई करण्यात आली आहे. भारत बटालियनमधील डीवायएसपीसह सहा जणांना मंगळवारी अटक करण्यात आली. एकाच सापळ्यात अनेक जणांवर कारवाई करण्याचे यंदा कोल्हापूर विभागाचे रेकॉर्ड झाले असल्याची चर्चा सुरू आहे.