Sun, Nov 17, 2019 09:04होमपेज › Kolhapur › गणवेशाचे ७ कोटी शाळा व्यवस्थापन समितीकडे वर्ग

गणवेशाचे ७ कोटी शाळा व्यवस्थापन समितीकडे वर्ग

Published On: Jul 06 2018 1:32AM | Last Updated: Jul 05 2018 11:36PMकोल्हापूर : प्रतिनिधी

शासनाच्या वतीने समग्र शिक्षण अभियानांतर्गत जिल्हा परिषद शाळांमधील पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी देण्यात येणार्‍या गणवेशाची रक्‍कम शाळा समितीकडे वर्ग करण्यात आली आहे. यावर्षी 1 लाख 15 हजार 938 विद्यार्थ्यांना गणवेश देण्यात येणार आहेत. येत्या दोन, तीन दिवसांत या गणवेशाचे वितरण होण्याची शक्यता आहे.

जिल्हा परिषदेच्या शाळांमधील मुलांना समग्र शिक्षा योजनेंतर्गत दोन गणवेश देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पूर्वी शासनातर्फे गणवेश खरेदी करून ते जिल्हा परिषद शाळांना पाठविण्यात येत असत. यामध्ये कपड्याच्या दर्जासंदर्भात शंका उपस्थित करण्यात आल्याने शासनाने गणवेश खरेदी बंद केली आणि मुलांच्या नावावर थेट एका गणवेशासाठी 300 रुपये याप्रमाणे 600 रुपये जमा करण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेत राज्यातील 36 लाख 23 हजार 881 विद्यार्थ्यांना गणवेश देण्यात येणार असून, त्यासाठी 217 कोटी  43 लाख 29 हजार इतका निधी मंजूर करण्यात आला आहे. 

कोल्हापुरातील 1 लाख 15 हजार 938 विद्यार्थ्यांची निवड गणवेशासाठी झाली आहे. याकरिता 6 कोटी 95 लाख 62 हजार 800 रुपये मंजूर झाले आहेत. गणवेश योजनेची रक्‍कम केंद्र,  तालुका किंवा जिल्हा पातळीवर खर्च करण्यात येऊ नये. शाळा व्यवस्थापन समितीच्या स्तरावरून व समितीच्या मान्यतेनेच हा खर्च करावा, असे शासनाने काढलेल्या परित्रकात म्हटले आहे. पहिलीच्या वर्गात प्रवेेश घेतलेल्या विद्यार्थ्याला तातडीने गणवेश वाटप करण्याच्या सूचना दिल्या आहेत. 

गणवेश वाटपातील गतवर्षीची काही रक्‍कम शिल्लक असेल तर ती रक्‍कमही यावेळी खर्च करायची आहे. गणवेशाचा रंग, प्रकार आदी बाबी ठरविण्याचे पूर्ण अधिकार शाळा समितीचे असल्याने यामध्ये कोणी हस्तक्षेप करू नये, अगर त्याबाबत निर्णय घेऊ नयेत. मंजूर तरतुदीपेक्षा अधिक खर्च होणार नाही, याची दक्षता घेण्याची जबाबदारीही शाळा समितीवर आहे. गणवेश वाटपाची माहिती प्राथमिक शिक्षणाधिकार्‍यांनी महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेला 30 ऑगस्टपर्यंत पाठविणे बंधनकारक आहे. शासनाने सुधारित धोेेरणाबाबत निर्देश दिले असले तरी यापूर्वी ज्या पालकांनी गणवेश खरेदी केली असेल तर त्या पालकांनी त्याची पावती सादर केल्यास नियमानुसार मंजूर रक्‍कम लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात येणार आहे.

1 लाख 15 हजार 938  विद्यार्थ्यांमध्ये 91 हजार 740 मुलींचा समावेश आहे. 14 हजार 808 अनुसूचित जाती-जमातीतील तर 660 मुले भटक्या विमुक्‍त जातीमधील आहेत. दारिद्य्र रेषेखालील विद्यार्थ्यांची संख्या 8 हजार 7330 इतकी आहे. हातकणंगले तालुक्यात सर्वाधिक 19 हजार 949 विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. त्यापाठोपाठ करवीर तालुुक्याचा क्रमांक लागतो. या तालुक्यातील 17 हजार 272 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. 9 हजारपेक्षा अधिक विद्यार्थ्यांची वरील दोन तालुक्यांसह शाहूवाडी, पन्हाळा, शिरोळ व  कागल तालुक्यांचा समावेश आहे.